मराठा आरक्षण व मोर्चावरून राज्यातील वातावरण तापले असताना आर्थिक दुर्बलांना आरक्षणासाठी मागणी करण्याचा किंवा त्यासाठी आग्रह धरण्याचा विचार शिवसेना करीत आहे. मराठा मोर्चाना पाठिंबा देऊन आर्थिक दुर्बलांना आरक्षण दिल्यास मराठा समाजासह अन्य समाजातील गरजूंना लाभ होईल. मराठा मोर्चावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेचात अडकले असताना शिवसेनेने आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाची मागणी पुढे रेटल्यास त्यांची व भाजपची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

ठाकरे यांनी मराठा आरक्षण व मोर्चाच्या मुद्दय़ावरून काही शिवसेना नेत्यांबरोबर शिवसेना भवनात मंगळवारी चर्चा केली व परिस्थिती समजावून घेतली. हे मोर्चे प्रामुख्याने मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात निघत असून कोकण व विदर्भात ते अजूनपर्यंत फारसे झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह काँग्रेस नेत्यांचीही फूस असल्याची चर्चा आहे. राजकीय नेते मोर्चाचे नेतृत्व करीत नसले तरी सर्वपक्षीय नेते त्यात सहभागी होत आहेत आणि खर्चाचा वाटा उचलत आहेत. परिस्थिती फार गंभीर असल्याने शिवसेनेने मराठा समाजाच्या मागण्यांना व मोर्चाना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका या बैठकीत सहभागी नेत्यांनी मांडल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मात्र मोर्चाना पाठिंबा दिला तरी आर्थिक दुर्बलांना आरक्षण देण्यासाठी सरकारने पावले टाकावीत, अशी भूमिका मांडण्याचा विचार ठाकरे करीत आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनीही तीच भूमिका मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येही आर्थिक दुर्बलांना आरक्षण दिले होते. ते न्यायालयाने पुढे रद्दबातल केले. मात्र मराठा समाजाला आरक्षणाची मागणी होत असताना त्याला विरोध न करता आर्थिक दुर्बलांना आरक्षण दिले गेल्यास त्याचा लाभ मराठा समाजासह सर्व जातिधर्मातील गरजूंना होईल, अशीच शिवसेनाप्रमुखांची भूमिका पुन्हा मांडण्याचा विचार ठाकरे करीत आहेत. त्यादृष्टीने चर्चाच्या फेऱ्या सुरू आहेत.

विशेष अधिवेशनाची मागणी

मराठा समाजाच्या प्रश्नांवर व अ‍ॅट्रोसिटीच्या दुरुपयोगाबाबत चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या भूमिका अधिकृतपणे सभागृहात मांडल्या जातील. त्यानंतर योग्य निर्णय व्हावा, अशी रणनीती शिवसेनेने आखली आहे. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यासाठी अनुकूलता दाखविलेली नाही. सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेनेच आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षणाची मागणी सुरू केल्यावर आणि सरसंघचालकांचीही तशीच भूमिका असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसही रिंगणात

मुंबई : मराठा समाजाच्या मोर्चावरून वातावरण ढवळले असतानाच, मराठा आणि मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरून काँग्रेसनेही वादात उडी घेतली आहे. या समाजांचे आरक्षण न्यायालयात टिकावे म्हणून योग्य तो लढा देण्याचे आवाहन पक्षाने राज्य सरकारला केले आहे. तसेच या प्रश्नावर आंदोलन करण्याची तयारी पक्षाने केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. काँग्रेस सरकारने मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या अंमलबजावणीसाठी पक्षानेच पुढाकार घ्यावा, असे बैठकीत ठरले. मुस्लीम आरक्षणाबाबत भाजप सरकार गंभीर नसल्याची टीकाही चव्हाण यांनी केली. दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा  रद्द करू नये, पण त्याचा दुरुपयोग टाळावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.

मुंबईच्या मोर्चासाठी हालचाली वेगात

मुंबई : मुंबईतही मराठा समाजाचा राज्यव्यापी मोर्चा काढला जाणार असून, हा मोर्चा शिवाजी पार्कपर्यंत काढण्याची योजना आहे.

मुंबईतील मोर्चा कुठे, कधी आणि कसा काढायचा यावर विविध पर्यायांचा विचार संयोजकांकडून सुरू आहे. मोर्चा कुठून सुरू करायचा हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी दादरच्या शिवाजी पार्कपर्यंत तो काढला जाणार आहे. शिवाजी पार्कमध्ये मोर्चाची समाप्ती होईल. तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन चर्चा करावी, अशी संयोजकांची भूमिका आहे. पाच-सहा लाख लोक एकत्र आले तरी मुंबईची सारी वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल. यामुळे दक्षिण मुंबईत मोर्चाला परवानगी मिळणार नाही. वांद्रे-कुर्ला संकुल किंवा शिवाजी पार्क या दोन पर्यायांचा विचार करण्यात आला. तेव्हा शिवाजी पार्कला सर्वाचीच पसंती असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले. मुंबईतील मोर्चा २० ऑक्टोबरच्या दरम्यान काढण्याची योजना आहे. शक्यतो शनिवार किंवा रविवारी मोर्चा काढावा, असा विचार सुरू आहे.

मुंबईतील मोर्चाच्या तयारीकरिता विविध पातळ्यांवर बैठका सुरू झाल्या आहेत. राजकीय नेते बैठकांमध्ये सहभागी होत असले तरी त्यांना महत्त्व दिले जात नसल्याचे समजते.