अमली पदार्थ मिळत नसल्याने आणि घरातील मांजर मेल्याने निराश झालेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मालवणी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. मालाडच्या मालवणी येथे राहणारा इजाज बिडीवाला (१७) असे या तरुणाचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याला एमडी या अमली पदार्थाचे व्यसन लागले होते. घरच्यांनी त्याचे हे व्यसन सोडविले होते. त्यातच पोलिसांनी या अमली पदार्थाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे त्याची खुली विक्री बंद झाली होती. ड्रग्ज माफिया ते अत्यंत महाग दरात छुप्या पद्धतीने विकत होते. इजाजला ते घेणे परवडत नव्हते. त्यामुळे तो निराश  झाला होता.  मंगळवारी रात्री त्याने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सांगितले.