रोज सकाळी उठल्यावर गंभीरपणे पेपर वाचन करणे हा मोरूचा गेल्या कैक वर्षांपासूनचा दिनक्रम आहे. असे वाचन केले की जगभरात काय चालले ते कळते हे त्याच्या वडिलांनी सांगितलेले. मोरू आज्ञाधारकाच्या जातकुळीतला असल्याने त्याने ही सवय अजून पाळली आहे. मोरू आधी पेपर वाचून ताजातवाना व्हायचा, आजकाल त्याला वाचता वाचता असंख्य प्रश्न पडायला लागले आहेत. स्वभावाने भिडस्त असल्याने, पडणारे हे प्रश्न कुणाला तरी जाऊन विचारावे असे मोरूला वाटत नाही. मात्र, सध्या तो या प्रश्नांनी अस्वस्थ व्हायला लागला आहे. ही अस्वस्थता पत्रलेखनातून व्यक्त करावी, असेही त्याला कधी कधी वाटते, पण पत्र छापून आले नाही तर आणखी अस्वस्थ व्हायला होईल या कारणांनी त्याने नाद सोडून दिला आहे. मनातून पत्राचा विचार बाद झाला तरी प्रश्नांचा उगम काही थांबायला तयार नाही. सकाळी मोरूने रामटेकचे सेनेचे खासदार कृपाल तुमानेंचे वक्तव्य वाचले. त्यांच्याच पक्षाच्या एका खासदाराने विमान कंपनीच्या अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचे अप्रत्यक्ष समर्थन करताना हे महाशय पेपरवाल्यांवर घसरले, अशा आशयाची ती बातमी होती. अशा बातम्यांना महत्त्व देणारे पेपरवाले सामाजिक दायित्व विसरत चालले आहेत. ते पक्के व्यावसायिक झाले आहेत, हे तुमानेंचे मत वाचून मोरूच्या डोक्यात अनेक प्रश्नांनी एकाचवेळी गर्दी करायला सुरुवात केली. हे महाशय मारहाणीचा साधा निषेधही करत नाहीत, उलट मारहाणीच्या कारणाचा शोध घ्या असे सांगतात, ही फारच अरेरावी झाली. खासदार झाले म्हणजे थेट मारण्याचा हक्क मिळाला का? मारामारी करणे व वरून त्याचे समर्थन करणे कसे काय योग्य ठरू शकते? पक्षहिताच्या मुद्यावर गैरप्रकाराची तळी उचलून धरण्याचे हे प्रकार बंद का होत नाहीत? अशी मारामारी करणारी माणसे निवडूनच कशी येतात, असा प्रश्न मोरूला पडतो व लगेच तो भानावर येतो. शेवटी मतदान करणारे आपणच आहोत याची जाणीव होताक्षणी त्याची जिभ चावते. मग तो दुसऱ्या बातमीकडे वळतो. आजकाल प्रश्नांनी भंडावून सोडायला लागलं की त्याची नजर आपसूकच दुसरीकडे वळते. शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, यासाठी विरोधक सिंदेवाहीजवळील पळसगाव जाट या गावातून संघर्ष यात्रा काढणार अशी ती बातमी असते. वाचता वाचता शेवटाला आलेला मोरू थबकतोच. या यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या आमदारांना वातानुकूलित वाहने मिळावी म्हणून संयोजकांची चाललेली जुळवाजुळव, या नेत्यांच्या भोजनासाठी आलिशान फार्म हाऊसमध्ये केलेली सोय, त्यांना विदर्भातील तापमानाचा त्रास होऊ नये म्हणून चाललेली धावपळ हा सारा तपशील वाचून मोरूची कानशिले गरम व्हायला लागतात. प्रश्नांच्या कल्लोळाने त्याचे डोके बधिर होते. घरात खायला काही नाही, जगण्याची ऐपत नाही म्हणून आत्महत्या करणारा विदर्भातला शेतकरी त्याच्या डोळ्यासमोर येतो. आधी कर्जमाफी मिळूनही फारसे काही हाती न लागलेल्या या बळीराजाच्या नावावर नेत्यांचा चाललेला थाट योग्य कसा, असा प्रश्न मोरूला अस्वस्थ करू लागतो. शेतकऱ्याच्या दु:खाला वाचा फोडणारी ही यात्रा एवढी पंचतारांकित कशी? शेतकऱ्यांच्या नावावरचे हे राजकारण किती काळ चालणार? हेच विरोधक सत्तेत असताना कर्जमाफी झाली होती. त्याने काहीही फरक पडलेला नसताना पुन्हा यात्रेचे सोंग कशासाठी? त्यापेक्षा हे नेते एकेका शेतकऱ्यांसोबत किमान एक दिवस तरी शेतात राबत का नाहीत? काही नाही, राजकारणाचा बाजार मांडलाय या साऱ्यांनी, अगदी हताशपणे मोरूच्या तोंडून हे शब्द निघून जातात. आपण जोरात तर बोललो नाही ना, अशी शंका येऊन मोरू आजूबाजूला बघतो. घरातले व्यवहार सुरळीत आहेत हे बघून त्याला हायसे वाटते. मध्येच बायको दाराच्या आडून आपल्याकडे बघून हसते आहे, असा भास त्याला होतो. आजकाल पेपर वाचताना तुम्ही फारच चिंताक्रांत दिसता, स्वत:शीच पुटपुटता असे रात्रीच ती म्हणाल्याचे मोरूला आठवते. त्याची नजर मग वाहतूक शिपाई ‘कॅशलेस’ होणार या बातमीकडे वळते. शीर्षक वाचूनच मोरूला हसू येते. मेंदूवरचा ताण हलका होतो. मग तो जसजसा वाचत जातो तसतसे त्याला प्रश्न पडायला लागतात, स्वानुभव आठवायला लागतात. वाहतूक शिपाई पैशाशिवाय कसा राहील हा प्रश्न त्याला थेट आयुक्ताला जाऊन विचारावासा वाटतो. ई-चालानचे कितीही प्रयोग केले तरी चिरीमिरी देणारे जोवर आहेत तोवर शिपायाचा खिसा फुगतच जाणार हे साधे गणित आयुक्तांना कळू नये याचे त्याला आश्चर्य वाटते. एकदा हेल्मेट विसरलो, तेव्हा घासघीस करत शंभरची नोट देताना आपल्याला कसा घाम फुटला होता हे आठवून मोरूला पुन्हा हसायला येते. आजकाल मोरूला न्यायालयाच्या बातम्या काळजीपूर्वक वाचण्याचा छंद जडला आहे. पती किंवा पत्नीची क्रूरता ठरवताना न्यायालयाची प्रकरणागणिक निरीक्षणे बघून मोरूला समाजातील बदलासंबंधी अनेक प्रश्न पडत असतात. घटस्फोटासाठी दिली जाणारी कारणे बघून पती-पत्नीतील नाते एवढे ठिसूळ का झाले असावे, असा प्रश्न त्याला पडतो. नात्यातील वादाला समाजमाध्यमे जबाबदार ठरू लागली आहेत, हे वाचून मोरूचा हात हळूच खिशात ठेवलेल्या मोबाईलवर जातो. या माध्यमांचा वापर कसा करायचा हे कुणीतरी शिकवेल का, असा भाबडा प्रश्नही त्याच्या मनात क्षणकाळ डोकावून जातो. उपराजधानीतील वाहतूक कोंडीने सध्या मोरू बेजार झाला आहे. त्याचे महिन्याचे पेट्रोलचे बजेट बिघडून गेले आहे. त्यामुळे या कोंडीच्या बातम्या दिसल्या की तो अधाशासारखा वाचून काढतो. नव्या रस्त्यासाठी ही कोंडी किती काळ सहन करायची? वेळेत काम न करणाऱ्या या कंत्राटदारांना जाब विचारायला हवा असा विचार येताच मोरूच्या मस्तकात तिडीक जाते. निवडून आल्यापासून वार्डाच्या नगरसेवकाचे तोंड दिसले नाही, त्याला गाठून जरा खडसावूनच विचारायला हवे असे मोरू मनाशी ठरवून टाकतो. तेवढय़ात डॉक्टरांच्या संपकाळात सरकारी रुग्णालयात ५१ जणांचा मृत्यू ही बातमी त्याच्या नजरेत येते व तो अस्वस्थ होतो. डॉक्टरला मारणारे व संपावर जाणारे हे दोघेही तेवढेच दोषी अशी मोरूची धारणा आहे. डॉक्टर जर देव असतील तर त्यांना संपावर जाण्याचा अधिकार कसा, असा प्रश्न त्याला पडतो.

डॉक्टरांच्या या कृत्याचा व्यसनाधीनतेशी संबंध जोडण्याचा प्रकारही मोरूला आवडलेला नाही. शेतकरी आत्महत्या, डॉक्टर संप याला व्यसनच कारणीभूत ही मांडणी मोरूच्या मध्यमवर्गीय मनाला पटत नाही. जिथे दारूबंदी आहे तिथे संप व आत्महत्या होत नाहीत का? तिथल्या समाजात समस्याच नाहीत का? असे प्रश्न त्याला पडू लागतात. प्रश्नांचे हे मोहोळ थांबायलाच तयार नसते, तेवढय़ात मोरूची नजर घडय़ाळावर जाते. त्याची ऑफिसला जायची वेळ झालेली असते.

devendra.gawande@expressindia.com