‘‘आपल्याला आणखी बाळ नको असं वाटेल तेव्हा माझीच नसबंदी शस्त्रक्रिया करायची हे आधीच ठरलं होतं. स्वत:चं बाळ जन्माला घालण्याच्या प्रयत्नात अनेक गर्भपात होऊन आधीच स्वातीच्या शरीराचे बरेच हाल झाले होते. मी आणखी एक शस्त्रक्रिया तिच्यावर लादू इच्छित नव्हतो. नसबंदीच्या निमित्ताने प्रजननविषयक वेदना सहन करण्याची एकमेव भूमिका पुरुष पार पाडू शकतो.’’कृष्णात यांचं हे  मत.

दत्तक मूल असताना आणखी एक मूल व्हायची एक टक्कासुद्धा शक्यता नष्ट करायची असेल आणि बायकोला त्यासाठी वेदना देऊ नये असे वाटत असेल तर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणं भागच होतं. मला भेटलेला एक बाबा अशी शस्त्रक्रिया करून घेणारा निघाला म्हणूनच तो माझ्यासाठी आगळावेगळा ठरला.

कृष्णात आणि माझी ओळख तशी नवीनच पण माझे लेख वाचून ते संपर्कात आले आणि आपला हा प्रवास सगळ्यांसोबत शेअर करायला तयार झाले. कृष्णात आणि स्वाती (कोरे) कोल्हापूरला शिक्षक आहेत. कृष्णात आणि स्वाती दोघेही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. कृष्णात विचाराने प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आणि भाषेवर प्रभुत्व. त्यांनी त्यांचा प्रवास सहजसुंदर भाषेत लिहून मला पाठविला, त्यामुळे त्यांचा प्रवास कृष्णात यांच्याच शब्दात –

‘‘लग्नानंतर अकरा वर्षे आम्ही स्वत:चं बाळ जन्माला घालण्याचा प्रयत्न केला. पहिलं आपलं स्वत:चं बाळ, नंतर दुसरं एक दत्तक बाळ हे आमचं लग्नानंतर काही महिन्यांतच ठरलं होतं. पण अकरा वर्षांत अनेकदा नैसर्गिक गर्भपाताला सामोरे जायला लागल्यावर दोघांनी मिळून आधी बाळ दत्तक घेण्याचा आमचा निर्णय पक्का केला. दोन्ही कुटुंबीयांची संमती मिळवली. तरीही अनेक मित्र, नातेवाईक एवढय़ा लवकर दत्तकचा निर्णय का घेताय? लगेच काय तुम्ही म्हातारे झालात का? अजून काही काळ वाट पाहा.. डॉक्टर बदलून पाहा.. अमुक ठिकाणी चांगलं आयुर्वेदिक औषध मिळतंय.. तमुकच्या हाताला चांगला गुण आहे.. एकदा प्रयत्न करून पाहा.. असे अनेक काळजीयुक्त सल्ले मिळत होते. पण आम्ही दोघं निर्णयावर ठाम होतो. नाही म्हणायला प्राचार्य

डॉ. सुनीलकुमार लवटे सरांनी ‘हा निर्णय घ्यायला आधीच तुम्ही खूप उशीर केलाय. पण आता जो निर्णय घेतला आहे तो नक्कीच चांगला आहे,’ असा आधार दिला.

आमचं विविध ठिकाणी माहिती मिळवणं सुरू झालं. सुरुवातीला वाटलं होतं अशा संस्थांमध्ये किती तरी बाळं असतात. आम्ही तिथे गेल्यावर ते आपली वाटच बघत असतील. बाळाला आईबाबा आणि एका दाम्पत्याला बाळ मिळवून दिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लगेच पाहायला मिळेल. पण पहिल्याच संस्थेत मिळालेली कागदपत्रांची जंत्री आणि कमीत कमी एक ते दीड वर्ष लागणारच असं स्पष्टपणे मिळालेलं उत्तर यानं आम्ही जमिनीवर आपटलो. एका बाजूला कागदांची जुळवाजुळव आणि दुसरीकडे इतरत्र कुठे कमी कागदांत आणि लवकर बाळ मिळतंय का याचा शोध जारी ठेवला.

दरम्यान एका मित्रांकडून असा एक पत्ता मिळाला. तेथे जाऊन मी बाळ पाहिलं (नंतर कळलं कायदेशीरपणे असं पहिल्या भेटीत बाळ दाखवता येत नाही.). कायदेशीर कागदपत्रे आणि वकील असे मिळून दोनेक लाख रुपये खर्च येईल हे ऐकताच बाळ दत्तक घेण्याच्या आमच्या निर्णयाला धक्का बसला. त्यामुळे पुन्हा नव्याने शोध सुरू झाला. दरम्यान, आमच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. शैला दाभोलकर यांनी आम्हाला ‘भारतीय समाज सेवा केंद्र’ या संस्थेची माहिती दिली. आम्ही लगेच तिथे भेट दिली. तिथे दत्तक प्रक्रियेतील आणखी तपशील आणि कायदेशीर बाबी नव्याने कळल्या.

बाळ दत्तक घेण्याचा निर्णय झाल्यापासून चिरंतनी घरी यायला दोन-अडीच वर्षांचा काळ गेला. चिरंतनी घरी आल्या क्षणापासूनच तिनं सर्वाची मनं जिंकली. घर आनंदात न्हाऊन गेलं. आमच्या दोघांच्या नोकऱ्या आणि पारंपरिक संगोपनापलीकडच्या आमच्या कल्पना यामुळे एक बाळ बस्स! या निर्णयाप्रत आम्ही येऊन पोहोचलो.

अर्थात ज्या वेळी आपल्याला आणखी बाळ नको असं वाटेल तेव्हा माझीच नसबंदी शस्त्रक्रिया करायची हे आमचं आधीच ठरलं होतं. स्वत:चं बाळ जन्माला घालण्याच्या प्रयत्नात अनेक गर्भपात होऊन आधीच स्वातीच्या शरीराचे बरेच हाल झाले होते. मी आणखी एक शस्त्रक्रिया तिच्यावर लादू इच्छित नव्हतो. बाळ जन्माला घालण्याची देणगी निसर्गाने केवळ स्त्रीलाच दिल्यामुळे त्याचे चटके ती दरमहा भोगतच असते. आणखी तिने काही सहन करावे असे वाटत नव्हते. शिवाय  नसबंदीच्या निमित्ताने प्रजननविषयक वेदना सहन करण्याची एकमेव भूमिका पुरुष पार पाडू शकतो.

सुरुवातीला कोल्हापुरातील एका सरकारी रुग्णालयात याविषयी चौकशीसाठी गेलो. सुरुवातीला पुरुष स्वत: होऊन स्वत:च्या नसबंदीविषयी विचारतोय हे पाहून तेथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसले. सगळी तपशीलवार माहिती त्यांनी विचारली. शेवटी तुम्ही अमुक वेळेत येऊन केसपेपर काढा. तेव्हा डॉक्टर तुम्हाला भेटतील, ते काही तपासण्या करायला सांगतील आणि त्यानंतर शस्त्रक्रियेची तारीख मिळेल अशी मला हवी असलेली माहिती दिली. यापूर्वी ही शस्त्रक्रिया केवळ काही मिनिटांत होते आणि साधारण दोनेक तासांनी रुग्ण स्वत:च्या पायांनी चालत घरी जाऊ  शकतो इतकेच ऐकले होते. आता मिळालेली माहिती त्यापेक्षा बरंच काही अधिक सांगत होती.

एक रजा वाचवण्याच्या दृष्टीने एखाद्या शनिवारी शाळा सुटल्यावर शस्त्रक्रिया करून शनिवार, रविवारी निवांत विश्रांती घ्यायची आणि सोमवारी नेहमीप्रमाणे शाळेत हजर व्हायचे असा काही व्यवहारी प्रयत्न करण्याच्या नादात मी होतो. खासगी दवाखान्यात पटकन शस्त्रक्रिया करून घ्यावी या निर्णयावर आलो. पण अंदाजे दहा हजार रुपये म्हटल्यावर तो विचार सोडून दिला.

दरम्यान, मागे एकदा माझा मित्र कपिल याच्यासोबत याविषयी बोलणे झाल्याची आठवण जागी झाली. त्यांना फोन केला व त्यांनी संबंधित डॉक्टरांना विचारले. नेमके दुसऱ्याच दिवशी शनिवारी १३ मे २०१७ रोजी तेथे शिबीर होते. ते लगेच या म्हणाले. लगेच दुपारी चार वाजता कोल्हापुरातून गडहिंग्लजला निघालो. डॉक्टरांना भेटलो त्यांनी काही औपचारिक माहिती घेतली. तपासण्या केल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता नसबंदी शस्त्रक्रियेसाठी सज्ज झालो. मला वाटत होतं माझ्यासारखे आणखी काही पुरुष नसबंदीसाठी आले असणार, पण माझा हा अंदाज खरा नव्हता. सहा स्त्रिया आणि मी एक पुरुष एवढेच रुग्ण होते.

त्या सर्वच जणी बहुधा ओल्या बाळंतिणी होत्या. बाळंतपणाच्या असह्य़ वेदना सहन करून त्या पुन्हा एकदा या शस्त्रक्रियेच्या वेदनांना सामोरे जायला आल्या होत्या. त्यातल्या एक, दोन जणी खूपच घाबरलेल्या होत्या. नर्स त्यांना आधार द्यायचा प्रयत्न करत होत्या. काही मिनिटांत सगळं व्यवस्थित होईल हे पुन:पुन्हा सांगत होत्या. तरीही त्या बिचाऱ्यांचं भेदरलेपण काही जात नव्हतं. असो. तर शस्त्रक्रियागृहाच्या बाहेर पूर्वतयारी म्हणून दिलेली दोन इंजक्शनं घेऊन मी मला आत घेण्याची वाट पाहत पडलो होतो.

आणि तो क्षण आला. डॉक्टरांनी मला आत बोलावले. काही क्षणांतच डॉक्टरांनी तेवढय़ा जागेपुरती भूल दिली. सुई टोचल्याची वेदना मेंदूत पोहोचली. अवघ्या सात-आठ मिनिटांत डॉक्टरांनी नसबंदी शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. मला काहीच त्रास होत नव्हता. प्रसन्न मनाने टेबलवरून उतरून बाहेर पडलो. दवाखान्यात माझ्यासाठी बेड तयार होता. तशी मला सक्तीच्या विश्रांतीची गरज वाटत नव्हती तरीही मी ती घेतली. एक महत्त्वाचं काम पूर्ण केल्याचे समाधान होते. माझ्या लेकीच्या सुखात आता कधीच दुसरं कुणी बहीण-भाऊ वाटेकरी म्हणून येणार नव्हतं आणि स्वातीचाही वेदनेचा भार मी हलका केला होता.’’

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org