शालेय विद्यार्थ्यांची माहिती युनिक आयडेंटिटी कोडच्या माध्यमातून नियंत्रित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत. आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी शाळानिहाय शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची माहिती, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, शिष्यवृत्ती या सर्व बाबी आधार कार्डला किंवा युनिक आयडेंटिटी कोडला जोडण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच घेतला होता. मात्र, आधार कार्ड नोंदणीची मोहीम मध्यंतरीच्या काळात बारगळली. त्यानंतर आता पुन्हा शालेय विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणीची मोहीम शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. सध्या किती विद्यार्थ्यांकडे आधार कार्डचे क्रमांक आहेत त्याची पाहणी करून हे क्रमांक संकलित करण्यात यावेत. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नसतील, त्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रत्येक शाळेत शिबिरे घेण्यात यावीत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी याबाबत पत्रे पाठवण्यात आली आहेत.
याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी सांगितले, ‘विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक संकलित केल्यामुळे त्यांची उपस्थिती, राबवण्यात येणाऱ्या योजना यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.’