मोशीतील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच २६०० कोटींच्या निविदा दोन भागात काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काळेवाडी येथे बोलताना दिली.
कासारवाडी-नाशिकफाटा येथील उड्डाणपुलास भारतरत्न जेआरडी टाटा, तर काळेवाडी येथील उड्डाणपुलास महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले; या दोन्ही पुलांचे उद्घाटन झाल्यानंतर काळेवाडीतील जाहीर सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, महापौर मोहिनी लांडे, आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, बापू पठारे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ राव, आयुक्त राजीव जाधव, अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे, प्राधिकरणाचे मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या कार्यक्रमासाठी येणार होते. मात्र, त्यांची वेळ जुळून आली नाही. तसेच, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा परदेशात असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी सुरूवातीलाच दिले. टाटा यांचे नाव पुलाला दिल्याबद्दल कंपनीच्या वतीने कामगार संघटनेचे अध्यक्ष विष्णू नेवाळे यांच्या हस्ते अजितदादांचा सत्कार करण्यात आला.
पवार म्हणाले,‘‘मोशीतील २४० एकर जागेतील नियोजित प्रदर्शन केंद्रामुळे पिंपरी-चिंचवडचे नाव जगाच्या नकाशावर येईल. मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. वाल्हेकरवाडी येथे ९०० घरे होणार असून रावेतला सव्वा कोटीचे हॉकर्स झोन करण्यात येणार आहे. काळाची गरज असलेला मेट्रो प्रकल्प पूर्णत्वाला आला आहे. खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे व राष्ट्रवादीचे आमदार त्यादृष्टीने पाठपुरावा करत आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडे रेडझोनचा पाठपुरावा सुरू आहे.’’ महापालिका व प्राधिकरणाच्या विकासकामांचा आढावा घेतानाच पवार यांनी, नदीप्रदूषण रोखा, लोकसहभाग वाढवा. शहर बकाल करू नका, असे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र देखणे व अण्णा बोदडे यांनी केले. उपमहापौर राजू मिसाळ यांनी आभार मानले.
 
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा विचार
पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करावे, अशी मागणी शहरातील तीनही आमदार आपल्याकडे सातत्याने करत आहेत, त्याचा निश्चितपणे विचार सुरू आहे. नवे आयुक्तालय झाल्यास शहरातील कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखण्यात यश मिळेल, अशी ग्वाही अजित पवार यांनी या वेळी दिली.
 
गाडीला लिंबू-मिरची कशासाठी?
काळेवाडी उड्डाणपुलाला नानासाहेबांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे, अशी भावना अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. मनुष्य ही एकच जात असून मानवता हाच धर्म असल्याचे त्यांनी नमूद केले. गाडय़ांवर िलबू-मिरची कशासाठी बांधली जाते, त्या वस्तू तर खाण्याच्या आहेत. उच्चशिक्षित माणसेही विचित्र वागतात आणि अंधश्रध्देला खतपाणी घालतात, त्याचा उपयोग नाही. देशाने आपल्यासाठी काय केले, यापेक्षा आपण देशासाठी काय करतो आहोत, हा विचार महत्त्वाचा आहे, असे म्हणाले.