पुण्यात सातत्याने दौरे करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाच्या कार्यक्रमासाठी जराही उत्सुकता दाखवलेली नाही, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांचीच तक्रार आहे.  शहर काँग्रेसने मोठा गाजावाजा करत जनजागरण यात्रेचे आयोजन केले. उद्घाटन करताना समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल, असे प्रदेशाध्यक्षांनीच जाहीर केले. मात्र, सातत्याने तगादा लावूनही मुख्यमंत्र्यांनी समारोपासाठी वेळ दिली नसल्याचे सांगण्यात येते.
सत्तेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात जनजागरण रथयात्रा सुरू करण्यात आल्या होत्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या पुढाकाराने िपपरी-चिंचवड शहरात सर्वात पहिली जनजागरण रथयात्रा १७ सप्टेंबरला घेण्यात आली, त्याचा आरंभ प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हस्ते काळेवाडीत झाला. तेव्हा मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर ४७ ठिकाणी ही रथयात्रा नेण्यात आली, तेथे पथनाटय़ाद्वारे सादरीकरणही झाले, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पथनाटय़ासाठी तयार केलेल्या कलापथकात १४ कलाकार होते. यानिमित्ताने जवळपास ५० हजार माहितीपुस्तिकांचे वाटप करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येते. उद्घाटनप्रसंगी माणिकरावांनी या उपक्रमाचे कौतुक करतानाच रथयात्रेचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यानुसार, दसऱ्यानंतर नेहरूनगर येथे समारोपाचा कार्यक्रम होईल, असे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले, तसे नियोजनही करण्यात आले. जनजागरण रथयात्रेचा अहवाल याच वेळी मुख्यमंत्र्यांना सादर करू, असे स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात, सातत्याने प्रयत्न करूनही मुख्यमंत्र्यांनी रथयात्रेच्या समारोपासाठी वेळ दिलेली नाही. मुख्यमंत्री अनेकदा पुण्यात व िपपरी-चिंचवडला आले. मात्र, या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिली नाही. त्याचप्रमाणे, काँग्रेस नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, तिकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कार्यकर्ते सांगतात.

बालेकिल्ला गेला कुठे?
पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाचा ज्या पध्दतीने कारभार चालतो, त्यावर मुख्यमंत्री तीव्र नाराज असल्याचे सांगण्यात येते. शहरातील अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांशी संपर्कात असून येथे नेमके काय चालते, याची खडा न खडा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. एकेकाळी िपपरी बालेकिल्ला असलेल्या काँग्रेसची दुरावस्था दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत, अशीच अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.