मराठी साहित्यविश्वातील वर्तमान स्थिती-गतीची, घटना-घडामोडींची आस्थेने अन् आस्वादक चिकित्सा करणारे सदर..

जेव्हा एखादा लेखक काही लिहितो, कवी कविता करतो तेव्हा त्याला कुठल्या जबाबदारीचे भान असते? तर- ते असतेच. म्हणजे सृजनाचा क्षण, त्या क्षणीचा आनंद, त्या क्षणीची उत्स्फूर्तता वगैरे असतेच; पण त्याच वेळी एका पातळीवर आपण काय लिहितोय, कशासाठी लिहितोय, कुणासाठी लिहितोय याचे जाणते-अजाणते भान त्याला असतेच. ते भान किती, याची टक्केवारी मात्र ठोकताळ्यासारखी नाही सांगता येणार. प्रत्येकासाठी ते निरनिराळे. लेखक, कवींची जबाबदारी हीच ती. जेव्हा एखादा कुणी साहित्याचे संकलन करतो, संपादन करतो, त्याला ठाशीव छापील रूप देतो, ते सजवतो, त्यावेळी त्याला जबाबदारीचे भान असते? या प्रश्नाचे उत्तर अगदी नि:संदिग्ध ‘होय’ असेच. आणि हे भान लेखक-कवींच्या भानापेक्षा खूपच अधिकचे. कारण संकलन, संपादन या गोष्टीही सृजनशीलतेशिवाय घडणे अशक्यच. मात्र, त्यातील जबाबदारीचे भान निश्चितच अधिक. आणि त्याला व्यावहारिक पातळीची जोडही! नियत/अनियतकालिकांबाबत आपली- वाचकांची  काय जबाबदारी आहे, काय असू शकते, यावर बोलून झाले. अशीच जबाबदारी त्यांचीही आहेच. ते म्हणजे कोण? तर ही नियत/अनियतकालिके प्रसिद्ध करणारी मंडळी. अनुक्रमणिकेत संपादक वा इतर जबाबदारी दर्शविणारे बिरुद ज्यांच्या नावापुढे वा मागे लागलेले आहे अशी मंडळी.

loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
unlisted firms donate electoral bonds
नफ्यापेक्षा दुप्पट रोखे दान; आठ कंपन्यांचा प्रताप
95 percent ofh maayutis seat allotment problem was solved says girish mahajan
“महायुतीतील जागा वाटपाचा तिढा ९५ टक्के सुटला, पण…” गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य

मराठीमधील नियत/अनियतकालिकांना जणू शाळेतील मुलांसारखे रांगेत उभे करायचे आणि ‘अमुक अमुक हे तुमचे काम आहे’ हे सांगायचे, असा या लेखनामागील हेतू नाहीच. कारण ही नियत/अनियतकालिके म्हणजे शाळेतील मुले नव्हेत. ती त्यांची त्यांची स्वायत्त असतात.  विचार करण्यास, त्या विचाराबरहुकूम मजकूर उभा करण्यास, तो प्रसिद्ध करण्यास त्यांची त्यांची मुखत्यारही. काय छापायचे, काय छापायचे नाही याचा निर्णय सर्वस्वी त्यांचाच. त्यांच्या या स्वातंत्र्याविषयी कुणाचा काही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण..

..आक्षेप नावाची गोष्ट स्वत:सोबत अपेक्षाही आणते. अनेकदा आक्षेपांपेक्षाही अपेक्षांचे मूल्य अधिक. येथे बोलायचे आहे ते अशाच अपेक्षांविषयी. अधिक चांगले काही हाती लागो या उद्देशाने व्यक्त केलेल्या अपेक्षांविषयी. तर आपल्या मराठीत नियत/अनियतकालिके यांची एकूण परिस्थिती काय आहे, याची कल्पना आहे आपल्याला- म्हणजे वाचकांना. त्या संदर्भात आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, यावर बोललोय आपण.

नियत/अनियतकालिकांचा घाट घालणे हा तसा हौसेचा, कळकळीचा मामला असला तरी तो चालतो शेवटी पैशांवर, वाचकांच्या प्रतिसादावर. त्यामुळे त्या पातळीवर काही भव्य-दिव्य व अचाट अपेक्षा बाळगणे सध्या तरी अशक्यच. म्हणजे युरोप-अमेरिकेत इंग्रजी साहित्यिक मासिके बघा कशी छान चाललीयेत.. हजारो, लाखो लोक वाचतात ती. इंग्रजी कशाला, आपल्याच देशात हिंदीमध्येही किती छान मासिके निघतायत. आपली मराठी नियत/अनियतकालिकेही तशीच खपली पाहिजेत, असे दटावण्यात काहीही अर्थ नाही. या व्यावहारिक बाबी थोडय़ा बाजूला ठेवल्या तरी नियत/अनियतकालिकांतील मजकुराबाबत मात्र काही अपेक्षा जरूर बाळगता येतील.

साहित्यातील नव्या प्रवाहांस स्थान देणे हा नियत/अनियतकालिकांचा गाभा. मराठीत ते घडते आहेच. पण ही स्थान देण्याची प्रक्रिया पूर्णपणे निरपेक्ष आहे काय? तर अनेकदा तसे दिसत नाही. म्हणजे प्रत्येक नियतकालिक आपापल्या मगदुराप्रमाणेच निघणार, त्याचा स्वत:चा असा चेहरा असणार, त्याची स्वत:ची अशी वैचारिक भूमिका असणार, हे ओघाने आलेच. साहित्यातील नवा प्रवाह असे ढोबळमानाने आपण म्हणत असलो तरी हा प्रवाह एकसंध असा नसतोच कधी. त्यातही वेगवेगळे उपप्रवाह असतातच. ते तसे असण्यात काहीच गैर नाही. उलट, त्यामुळे वैविध्यात भर पडून साहित्य अधिक समृद्ध होते. मेख आहे ती इथे. मराठीतही असे उपप्रवाह आहेतच; पण ते अनेकदा एकमेकांशी फटकून वागताना दिसतात. या वागण्यामागे काही वेळा उभे असतात साहित्यिक पूर्वग्रह, तर काही वेळा वैयक्तिक पूर्वग्रहदेखील. त्यातून प्रवाहांची घुसळण होणे थांबण्याची भीती मोठी. असा गटातटाचा मामला सुरू झाला की मग अमक्या नियत/अनियतकालिकात असेच साहित्य असणार, तमक्या नियत/अनियतकालिकात तसेच साहित्य असणार, हे जणू ठरूनच जाते. त्यात नुकसान आपले.. वाचकांचे.

ज्या उपप्रवाहाचे प्रतिबिंब आमच्या नियत/अनियतकालिकात उमटते आहे तोच प्रवाह सर्वश्रेष्ठ, या उपप्रवाहातील लेखक-कवीच श्रेष्ठ, अशीही भावना काही वेळा दिसून येते. म्हणजे नियत/अनियतकालिकाचे संपादकीय लिहिताना त्यात वैचारिक घुसळणीचे तत्त्वज्ञान मांडायचे, त्याचे महत्त्व अधोरेखित करायचे, त्याची बाजू ठामपणे उचलून धरायची आणि प्रत्यक्षात नियत/अनियतकालिकात स्थान द्यायचे ते ठरावीक विचारांनाच, अशी ही बाब. त्यात नुकसान आपले.. वाचकांचे.

परदेशातील साहित्यात काय चांगले चालले आहे, कोण काय नवीन लिहितो आहे, मांडतो आहे, याची माहिती मराठी वाचकांना करून देणे इष्टच. साहित्याचे.. खरे तर जगण्याचे भान अधिक व्यापक होण्यासाठी हे आवश्यकच. म्हणजे हंगेरीमधील एखादा कवी सीरियामधील उलथापालथीवर, तेथील अरिष्टावर काय बोलतो आहे, हे मराठी वाचकांना समजणे योग्यच. पण त्याच वेळी आपल्या परभणीतील एखादा नवा साहित्यिक नोटाबंदीवर काय लिहितो आहे, मालवणचा एखादा कवी राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडला त्यावर काय लिहितो आहे, हेही मराठी वाचकांपर्यंत पोहोचणे तितकेच आवश्यक. अफगाणिस्तानमधील अत्याचारांबाबत मराठी वाचकांना कळायला हवे, ग्वांटानामा बेमधील दमनशाहीबाबत मराठी वाचकांना कळायला हवे, तसेच कोपर्डीविषयीही कळायला हवे, इथल्या दमनशाहीविषयीही कळायला हवे. प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या लेखकांच्या, कवींच्या, विचारवंतांच्या, चित्रकारांच्या मुलाखती मराठी वाचकांना वाचायला मिळायला हव्यातच; पण त्याचसोबत इथे.. या मातीत राहून काही चांगले लिहिणाऱ्यांचे, चित्र काढणाऱ्यांचेही विचार त्यांना कळायला हवेत. जगाकडे नजर ठेवायलाच हवी; पण त्याच वेळी स्वत:च्या पायांखालच्या भुईवरही ती ठेवायला हवी. ती ठेवली गेली नाही तर त्यात नुकसान आपले.. वाचकांचे.

जगाकडे बघताना दृष्टी विस्तारते, नजर अधिक पारखी होते. पण या प्रक्रियेत त्या दृष्टीवर ‘आपले ते त्याज्य.. इतरांचे ते स्वीकारार्ह’ अशा भूमिकेची झापडे चढत नाहीत ना, याचेही भान ठेवायला हवे. प्रत्येक भूमीचा स्वत:चा असा एक पोत असतो, परिसर असतो, जातकुळी असते. त्यातून जे उगवून येते ते त्याच भूमीची तत्त्वे अंगी बाणवून येणार. प्रत्येक भाषेतील साहित्याचेही तसेच. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे फ्रेंचमध्ये जे साहित्य उगवते ते मराठीत का नाही, क्रोएशियात जसे साहित्य निर्माण होते तसे मराठीत का नाही, असा प्रश्न डोळ्यांवर पट्टी बांधून विचारणे तितकेसे योग्य नाही. अशा प्रकारचे प्रश्न केवळ टीकेच्या हेतूने विचारत राहण्यात नुकसान आपले.. वाचकांचे.

साहित्य म्हणजे मुक्काम नव्हे, तर अखंड प्रवास. या प्रवासात सतत काही ना काही मागे सुटणार, सतत काही ना काही नवे समोर येणार. समोर येणाऱ्याचे नीट पारखून योग्य ते स्वागत करायलाच हवे. पण ते करताना मागे जे सुटले त्याचे भान सोडणे अयोग्यच. साहित्यातील कालच्या, परवाच्या प्रवाहांवर साधकबाधक टीका आजच्या नियत/अनियतकालिकांतून जरूर व्हावी; मात्र त्या टीकेच्या मुळाशी खिल्ली उडवण्याचा हेतू असता नये. खिल्लीच्या सुरात साधकबाधक चर्चा विरून जातात आणि मग हाती काही लागत नाही. त्यात नुकसान आपले.. वाचकांचे.

..तर अशी ही यादी मराठी नियत/अनियतकालिकांकडून असलेल्या अपेक्षांची. त्यांची पूर्तता करणे हे व्यावहारिक मुद्दे व इतर अडचणी लक्षात घेता वाटते तितके सोपे नाही, हे नक्कीच. पण तरीही त्यांच्या पूर्ततेचे शक्य तेवढे प्रयत्न संबंधितांनी करावेत, हीदेखील सोबतची जोडअपेक्षा. त्यात फायदा सगळ्यांचाच- त्यांचा.. नियत/अनियतकालिकांच्या अध्वर्युचा आणि आपला.. वाचकांचाही.

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com