स्टार्ट अपची कल्पना प्रत्यक्षात कशी आणावी, त्यापूर्वी नेमके काय करावे, याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आपण मागच्या लेखात पाहिले की, स्टार्ट अप उद्योग हा चांगल्या कल्पनेतून जन्माला येत असतो. मात्र तेवढेच पुरेसे नाही तर त्याची अंमलबजावणी चोख असली पाहिजे. नाहीतर चुकीच्या पद्धतींमुळे, अभ्यासाअभावी चांगल्या कल्पनांची माती होऊ शकते किंवा उत्साहात सुरू झालेले स्टार्ट अप्स अध्र्यावर बंद होऊ शकतात. तसे होऊ नये यासाठी उद्योजकाने काही पायऱ्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

स्पर्धा आणि बाजारपेठ अभ्यास

आपण जे करणार ते नावीन्यपूर्ण आहे का आणि नसेल तर त्यात पूर्वसुरींपेक्षा वेगळे काय असेल जेणेकरून ग्राहक आपल्याकडे वळतील, याचा निश्चित विचार व्हायला हवा. समान क्षेत्रातील इतर उद्योगांवर लक्ष असावे, त्यांच्यापेक्षा आपल्या सेवेचा, उत्पादनाचा दर्जा कैक पटींनी चांगला असणे आवश्यक आहे. जर आपली कल्पनाच नवी असेल आणि त्यावर कोणी विचार, काम केलेच नसेल तर बाजारपेठेत मक्तेदारी निर्माण करण्याची सुसंधी मिळते. आता बाजारपेठेचा इतका सखोल विचार एकतर अभ्यासपूर्वक स्वत:ला करावा लागतो किंवा त्यासाठी व्यावसायिक कंपन्यांची मदत घेता येते. त्यासाठी ज्यांच्याकडे सुरुवातीलाच चांगले भांडवल आहे त्यांना पसे देऊन बाजारपेठेचा अभ्यास करता येतो किंवा वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त लोकांशी बोलणे, वेगवेगळ्या अभ्यासगटांत, समविचारी वर्तुळांत सहभागी होणे, विश्वासार्ह संकेतस्थळांवरून माहिती गोळा करणे या मार्गानी शक्य होते. बाजारपेठेच्या अभ्यासाचे मुख्य फायदे असे-

  • आपल्या सेवेसाठी / उत्पादनासाठी बाजारपेठ किती अनुकूल आहे याचा अंदाज येतो.
  • आपल्या सेवेच्या / उत्पादनाच्या बाजारपेठ व्याप्तीचा अंदाज येतो.
  • संभाव्य अडीअडचणी समजल्यास आपल्या सेवेत / उत्पादनात गरजेनुसार बदल करता येऊ शकतात.

आपला ग्राहक ओळखणे

आपल्या स्टार्ट अपचा अपेक्षित ग्राहक कोण आहे, हे माहीत असणे आवश्यक आहे. ग्राहकांची गरज, आवडनिवड लक्षात घेऊन त्याला अनुसरून आपली सेवा किंवा उत्पादन असावे. आपल्या सेवेमुळे किंवा उत्पादनामुळे ग्राहकाला काय फायदा होणार आहे, त्याला ते किफायतशीर किमतीत कसे मिळेल, हा विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्राहकांचा वयोगट, िलग, व्यवसाय, आíथक स्तर इत्यादी गोष्टींची माहिती असावी. संभाव्य ग्राहकांशी बोलून आपल्या सेवा किंवा उत्पादनावर त्यांचा मिळणारा अभिप्राय प्रगतीसाठी उपकारक ठरतो.

प्रोटोटाइप (उत्पादनाचे आदिरूप) तयार करणे

काही स्टार्ट अप्स हे एखाद्या नव्या उत्पादनाशी निगडित असतात. त्यासाठी आवश्यक असतो प्रोटोटाइप. त्याच्या बळावर भांडवल, गुंतवणूकदार मिळवणे सोपे होते. ज्या मूळ कारणामुळे स्टार्ट अप सुरू केलाय ती समस्या प्रोटोटाइपमुळे सोडवली जातेय का हे पाहणे गरजेचे आहे.

एकदा का कल्पना सुचली की ती कागदावर मांडावी. तिच्यावर विचार करून आपली निरीक्षणे मांडावीत. कारण नुसती कल्पना सुचून महत्त्वाचे नाही तर तिला निश्चित दिशा येण्यासाठी उद्योग आराखडा तयार करावा. पुढे कंपनी स्थापन करावी लागते, त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पूर्तता होणे गरजेचे असते. यासाठी एक मार्गदर्शक (मेंटॉर) आवश्यक असतो. त्याच्या ज्ञानाचे आणि अनुभवाचे बोल सुरुवातीच्या स्तरावर लाखमोलाचे ठरतात. याच पाश्र्वभूमीवर स्टार्ट अप सुरू करण्याच्या प्रकियेत असलेला शंतनू प्रधान सांगतो की, नुसती भव्य कल्पना सुचून उपयोगाचे नाही. कारण तशी कल्पना प्रत्यक्षात आणणे हे स्टार्ट अप उद्योगाच्या मानाने फारच आव्हानात्मक असते. त्यासाठी पसा, मनुष्यबळ आणि अन्य तांत्रिक बाबींची मोठय़ा प्रमाणावर गरज असते. त्यापेक्षा नेमकी समस्या हेरून त्यावर उपाय शोधणाऱ्या कल्पनेवर छोटय़ा प्रमाणावर काम करायला सुरुवात करावी. त्यातूनच पुढे मार्ग सापडतो. सुरुवातीला आपली कल्पना लोकांना समजवावी लागते. त्यासाठी बोलावेच लागते. आपल्या कल्पनेविषयी सविस्तर माहिती देताना, चर्चा करताना समोरच्या तिऱ्हाईतावर विश्वास ठेवावा लागतो.आपण योग्य दिशेने जातोय की नाही, हे सांगण्यासाठी, प्रक्रियेतील खाचाखोचा समजावण्यसाठी मेंटॉर आवश्यक असतो. आपण एखादे नवे उत्पादन तयार करणार असू तर त्याच्या प्रोटोटाइपवर काम करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मेंटॉरलाही नेमके मार्गदर्शन करता येते. प्रोटोटाइपच्या बळावर गुंतवणूकदारांना कल्पना समजावणे सोपे होते. शंतनूच्या मते स्टार्ट अप उद्योजकाला त्याच्या उद्योगातील मूलभूत गोष्टींचे आणि त्या जोडीने उद्योग सुरू करण्याच्या तांत्रिक बाबींचेही ज्ञान हवे. कारण सुरुवातीला सगळ्यांनाच व्यावसायिक मदत घेता येणे शक्य असतेच असे नाही. त्यावेळी स्वत:चं वाचन, अभ्यास कामी येतो. इंटरनेटमुळे अद्ययावत माहिती मिळवणं, नेटवìकग सोपं झाल्याचं तो सांगतो.

एकूणच काय तर स्टार्ट अप उद्योगाची संकल्पना सुचण्यापासून ती प्रत्यक्षात येण्यापूर्वीपर्यंतचा हा प्रवासही खूप काही शिकवणारा आहे.
ओंकार पिंपळे – response.lokprabha@expressindia.com