जमाना रेडिमेड का!

सध्याचा जमाना हा रेडिमेड वस्तू मिळण्याचा आहे. विशेषत: स्वयंपाकघरात अशा वस्तूंमुळे कामं बरीच हलकी

मुंबई - styleit@expressindia.com | November 23, 2012 8:13 AM

सध्याचा जमाना हा रेडिमेड वस्तू मिळण्याचा आहे. विशेषत: स्वयंपाकघरात अशा वस्तूंमुळे कामं बरीच हलकी होऊ लागली आहेत. आताच्या जनरेशनचा विचार करता आजच्या हार्ड एण्ड फास्टच्या जमान्यात अशा रेडिमेड गोष्टी मिळणं खूप फायद्याच्या ठरतात. उलट आता अनेक गृहिणीसुद्धा या पिढीचा, त्यांच्या धावत्या जगाचा विचार करून अशा अनेक गोष्टी उपलब्ध करून देत आहेत.
सुरवातीच्या काळात आणि आजही काही घरांमधे बाजारातून गहू आणून, निवडून ते दळून मग पोळीसाठी पीठ मिळत असे. या किचकट कामातून महिलांना थोडा आराम मिळावा म्हणून ही सर्व प्रक्रिया टाळून आशिर्वाद, अन्नपूर्णा यासारख्या ब्रॅड्सनी ५ किलोच्या पॅकमधे रेडिमेड पीठच द्यायला सुरवात केली. त्यामुळे महिलांचं अर्ध काम निश्चितच वाचलं. त्यांच्या पावलावर पाउल ठेवून अनेक किराणा दुकानातून असे पीठ मिळू लागले. या पिठाला घरगुती चव असल्याने त्याला मागणी जास्त होती. आता तर अशी पीठे एका फोनवर घरपोच मिळू लागली आहेत. नागपुरातलं भोजवानी ट्रेडर्स हे दुकान गेल्या अनेक वर्षांपासून स्वत:च्या ब्रॅंडचे रेडिमेड पीठ विकत आहे. या बरोबरीनेच डाळीच्या पीठापासून इडली, डोसा, ढोकळ्याच्या कोरडय़ा ते ओल्यापीठापर्यंत रेडिमेड पीठांचे वेगवेगळे प्रकार त्यांच्याकडे उपलब्ध असतात. फक्त पाच किलोचे पॅकेट घेण्यापेक्षा महिला दोन-तीन महिन्याची सोय करून ठेवतात, मालाचा दर्जाही चांगला असल्याने लोकांची गर्दीही हे पीठ घेण्यासाठी होत असते. हे झालं पीठाचं, पण त्याही पलीकडे जाऊन महिलांचे काम अधिक हलकं करण्यासाठी आता पीठापेक्षा तयार पोळ्याच मिळू लागल्या आहेत.
दिवसभर नोकरीवर जाणाऱ्या महिलांसाठी हे तर खूपच सुखकारक झालं आहे. सुरवातीला फक्त मुंबईपुरतं मर्यादित असलेलं हे पेव आता पुणे, नाशिक नागपूर अशा शहारांमधे पसरू लागलं आहे. डोबिंवलीत तर जागोजागी पोळी-भाजी विक्री केंद्र अगदी सर्रास आढळततात. पुण्यातही किराणा माल विकणाऱ्या दुकानांतूनही पोळ्या मिळतात. तर काही ठिकाणी भिजवलेली कणीक मिळते. त्याचा उपयोग त्याच दिवशी करावा असा दुकानदारांचा आग्रह असतो. याचा फायदा नोकरी करणाऱ्या महिलांबरोबरीेनेच हॉस्टेल मधे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, पुरूषांनाही होतो.
पोळी बरोबर भाजीचं महत्त्व ही तेवढचं. दिवसभर काम करून दमून आल्यावर घरी आल्यावर भाजी चिरणं हे तर खरचं थकवणारं, कधीकधी कंटाळा आणणारं काम! त्यात कोबी, तोंडली, भेंडी शेंगा अशा काही भाज्या असतील तर विचारायलाच नको! म्हणून सोमवार ते शुक्रवार बटाटय़ावर खूष राहून शनिवार, रविवार इतर भाजी करणारेही आपल्याला भेटतील. आता हीही काळजी मिटून चिरलेल्या भाज्या पाव ते १ किलोच्या पॅकमधे मिळतात. अनेक मोठय़ा मॉल्समधे तर चिरलेल्या वेगवेगळ्या भाज्या सर्रास मिळतात. भाजीवालेही मग यात मागे कसे राहतील? तेही आता चिरलेली भाजी दुकानात ठेवू लागले आहेत. आवश्यकतेनुसार हवी ती भाजी चिरून देऊन त्याचा वेगळा दरही आकारला जातो. फणसासारखी चिरायला वेळ घालवणारी भाजीही आता व्यवस्थित चिरून मिळते.अजून काय हवं!  यात पैसे जरी जात असले तरी श्रम खूप वाचतात हा दृष्टीकोन या पिढीचा आहे. काही दुकांनामधून अर्धवट भाजलेली पोळी आणि अर्धवट शिजवून ठेवलेली भाजीही मिळते. जेव्हा भूक लागेल तेव्हा माईक्रोवेवमधे या गोष्टी शिजवून करून खायच्या! इतका आयतेपणा आता मिळू लागला आहे. बरं कडधान्य खायची लहर आली तर मोड आलेली कडधान्यही सहज मिळतात. ‘आपली आवड’ या दुकानात रेडिमेड पोळी भाजी तर मिळतेच, पण भाज्यांमधेही दररोज वेगवेगळे प्रकार असतात, पातळ भाजी, साधं वरण, आमटी पासून साध्या भातापासून ते लेमन राईस, फ्राईड राईस असे जवळजवळ आठ एक प्रकार भाताचेच आहेत. याशिवाय कोशिंबीर, विविध चटण्यांचे प्रकार आहेत. कधीकधी संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर हॉटेलमधे जाण्यापेक्षा इथलं खाणं कधीही चांगलं असं अनेकजण मानतात.
अनेक  किचकट कामं सोपी झाल्यामुळे फक्त पोळी -भाजी पुरतं मर्यादित न राहता इतर पदार्थामधेही असे किचकट प्रकार टाळून करायला सहज सोपे पडतील असे प्रकार आले आहेत. जसा नारळाशिवाय पदार्थ पूर्ण होऊच शकत नाही असे वाटणाऱ्या गृहिणीला कधीतरी तरी दररोज नारळ खवायचा कंटाळा तर येणारच येणार म्हणून मग डेसिनेटेट कोकोनटच्या बरोबरीनेच खवलेला ओला, सुका नारळ, नारळाचं दूध हे प्रकार मिळत आहेत. गुळही चिरलेला मिळतो. प्रीसव्‍‌र्ह बॉटल्समुळे तर कितीतरी गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मॅगी सारखा प्रकारही आता अनेक दुकानातून तयार मिळू लागला आहे. रेडी टू इट या प्रॉडक्टने पंजाबी पासून चायनिज पर्यत पदार्थ करण्यासाठी तुमचे श्रम वाचवून कमीत कमी वेळात हे पदार्थ बनले पाहिजेत याची काळजी घेतली आहे. ज्या पदार्थचं नाव घेऊ त्याचं सामान कोणत्याही कष्टाशिवाय मिळू लागल्यामुळे चिरलेल्या भाज्या टाकल्या, मसाले टाकले की तुम्हाला हवा तो पदार्थ तयार असतो. यामुळे लोकांचीही चांगलं खायला मिळावं याची आवड वाढत चालली आहे. अशा रेडिमेड पदार्थाची लिस्ट कितीही केली तरी न संपणारीच. या रेडिमेड च्या जमान्यात ब्रॅडेड प्रकारांपासून ते लोकल मार्केटपर्यंत सगळेजण आज नवे नवे रेडिमेड प्रकार आणून ग्राहकाला विशेषत: महिलांना आणि  एकटं राहणाऱ्या पुरूषांना खूष करत आहेत.
त्यामुळे अब सब कुछ आसान है !      

First Published on November 23, 2012 8:13 am

Web Title: rediment food age