vertu-bentley.jpg-450
‘बेण्टले’च्या सहयोगाने ‘वर्टू’ने आपला पहिला स्मार्टफोन बाजारात आणला असून, या वर्षाची सुरुवात दणक्यात केली आहे. ‘वर्टू फॉर बेण्टले’ स्मार्टफोन सादर करणारे ब्रिटनमधील हे दोन अलिशान ब्रॅण्ड जुलैमध्ये एकत्र आले आहेत. या स्मार्टफोनबाबतची आश्चर्यकारक बाब म्हणजे याची किंमत एका कार एवढी आहे. विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या या स्मार्टफोनची किंमत रुपये १२,५०,००० इतकी आहे. या फोनचे बाह्य अंग बनविण्यासाठी ‘बेण्टले’ गाडीत आढळून येणाऱ्या उत्कृष्ट प्रतीच्या चांबड्याचा वापर करण्यात आला असून, ‘बेण्टले’मध्ये दिसून येणारी शंकरपाळ्याची शिलाई देण्यात आली आहे. वजनाला अतिशय हलके असलेले हे चांबडे टिकाऊ आहे. ‘बेण्टले’ गाडीप्रमाणेच या फोनच्या दिसण्यावर अधिक लक्ष पुरविण्यात आले आहे. स्टिरिओ स्पिकरची सुविधा असलेल्या या फोनमध्ये उत्कृष्ट आवाजासाठी ‘डॉल्बी सराऊंण्ड साऊण्ड’ देण्यात आला आहे. फोनमधील कॅमेऱ्यासाठी ‘वर्टू’ने ‘हॅस्सेलब्लाड’चा सहयोग घेणे सुरूच ठेवले असून, उत्कृष्ट छायाचित्रणासाठी या फोनमध्येदेखील त्यांचाच सहयोग घेण्यात आला आहे. अॅण्ड्रॉईड ४.४ किटकॅट प्रणालीवर काम करणाऱ्या या फोनमध्ये एनएफसी सुविधा पुरविण्यात आली असून, वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. ‘वर्टू लाईफ’द्वारे कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या खास सेवांचा उपभोग घेता येऊ शकतो. त्याचप्रमाणे ‘वर्टू सर्टंन्टी’च्या माध्यमातून फोनला सुरक्षा पुरविली जाते.