मोबाइलमुळे बाजूला कोण उभा आहे याची जाणीवही अनेकांना नसते. या मोबाइलने माणसाला एकलकोंडा केले आहे अशी ओरड सातत्याने होत असते. पण हाच मोबाइल आता विविध रूपाने माणसाला घराच्या बाहेर काढतोय. तर त्यांना एकमेकांशी संवादही साधायला भाग पाडतोय. मोबाइलचा संवादासाठी असलेला उपयोग सगळ्यांना हवाहवासा असला तरी त्यामध्ये असणारे गेम हादेखील अनेकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. अनेकदा गेम खेळण्यात वेळ कधी निघून जातो हेही कळत नाही. अशा वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये खेळता येणारे गेम्सचे पर्याय अ‍ॅप बाजारात येऊ लागले. पाहू या अशाच काही गेम्सविषयी..

साइक

अमेरिकेत २००६ ते २०१४ या कालावधीत या विनोदी मालिकेने लोकांच्या मनात घर केले होते. याच मालिकेच्या नावाचा आधार घेत एक विनोदी गेम विकसित करण्यात आला आहे. या गेममध्ये देण्यात आलेल्या विविध प्रश्नांची आपण खोटी उत्तरे तयार करायची आहेत. जर तुमच्या मित्राने तुम्ही तयार केलेले खोटे उत्तर निवडले तर तुम्हाला गुण मिळतात. ज्याला जास्त गुण तो जिंकतो. यामध्ये एका  वेळी कितीही मित्र सहभागी होऊ शकतात. अशाच प्रकारे उलट जर आपण मित्राने तयार केलेले खोटे उत्तर निवडले तर आपले गुण कमी होतात. यामध्ये आपल्याला कॉइन्स मिळत जातात. या अ‍ॅपमध्ये अनेक छोटे छोटे गेम्स आहेत. अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर तीन गेम्स मोफत मिळतात. यानंतर पुढच्या प्रत्येक गेमसाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत. जर तुम्हाला पैसे मोजायचे नसतील तर तुम्ही गेममध्ये मिळवलेले कॉइन्स खर्च करूनही तुम्ही पुढचे गेम्स विकत घेऊ शकता.

उपलब्धता : अण्ड्रॉइड आणि आयओएस

हेड्स अप

साइक हा गेम ज्यांनी विकसित केला त्यांनी हेड्स अप हा गेम विकसित केला आहे. यामध्ये वरील गेमपेक्षा आणखी जास्त गंमत आहे. या गेममध्ये तुम्ही अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर तुमची नोंदणी पूर्ण करायची असते. तुमच्यासोबत कोण खेळणार आहे हे तुम्ही निवडले की तुमचा खेळ सुरू होतो. तुम्ही हा गेम खेळताना अ‍ॅप सुरू करून फोन तुमच्या कपाळावर ठेवायचा. त्या अ‍ॅपवर एक शब्द येतो. तो शब्द नेमका काय आहे याबाबत काही सूचक गोष्टी तुमचा सहखेळाडू तुम्हाला सांगेल. त्याने सांगितलेल्या सूचक शब्दावरून जर तुम्ही दिलेल्या वेळेत स्क्रीनवरील शब्द ओळखला तर तुम्हाला गुण मिळतात. या गेममध्येही अ‍ॅप मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. त्यात काही ठरावीक कार्ड्स मिळतात. हे कार्ड्स संपल्यावर तुम्हाला नवीन कार्ड्ससाठी ८० रुपये खर्च करून ते विकत घ्यावे लागतात.

उपलब्धता : अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस

बाऊंडेन

इतर मोबाइल गेम्सपेक्षा थोडा हटके असा हा गेम आहे. वास्तवाभासी तंत्रज्ञानावर आधारित हा गेम्स पार्टीमध्ये खेळण्याजोगा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या प्रियजनासोबत नृत्य करायचे आहे. हे नृत्य करत असताना तुमच्या हातात मोबाइल फोन असणे आवश्यक आहे. दोघांनीही मोबाइल फोन हातात धरावयाचा आहे. यात आपल्याला नृत्य कसे करावे याचे मार्गदर्शन दिले जाते. याचबरोबर यामध्ये अनेक गमतीशीर गोष्टी देण्यात आल्या आहेत. इतर वेळी कंटाळवाणा वाटणारा हा गेम पार्टीमध्ये खेळताना खूप चांगला वाटतो.

उपलब्धता : अ‍ॅण्ड्रॉइड (७० रुपये) आणि आयओएस (२५० रुपये)

स्पेसटीम

एखाद्या खोलीत बसून प्रत्येक जण आपआपल्या मोबाइलमध्ये गढलेला असतो हे दृश्य वारंवार दिसते. मात्र आता भविष्यात हे दृश्य दिसणार नाही. कारण खोलीत जमा असलेले सर्व मिळून एखादा गेम खेळू शकणार आहेत. याचेच उदाहरण म्हणजे हा गेम. यामध्ये अडकलेल्या जहाजाची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या चमूमध्ये आपण असतो. आपले मित्र आपल्याला ज्या सूचना करतील त्या आपल्याला काळजीपूर्वक वापरायच्या आहेत. त्यातून आपल्याला पुढचा मार्ग कळत जातो. याच मार्गाचा वापर करून आपण आपल्याला दिलेले उद्दिष्ट साध्य करू शकतो. हा गेम तुम्ही चांगल्या परिचयाच्या लोकांसोबत मनमुरादपणे खेळू शकता. जेणेकरून एकमेकांना सूचना करण्यात तुमचे बॉण्डिंग अधिक चांगले राहते.

उपलब्धता : अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस

रिव्हर्स कॅर्डेज

शब्दांमध्ये रमणाऱ्यांसाठी हा गेम खूप चांगला आहे. यापूर्वी आपण माहिती घेतलेल्या हेड्स अप या गेमची ही पुढची आवृत्ती म्हणावयास हरकत नाही. यामध्ये तुमच्या चमूला शब्द ओळखण्यासाठी ३० ते ९० सेकंदांचा अवधी मिळतो. या कालावधीत तुम्ही जास्तीत जास्त शब्दांची ओळख कराल असा प्रयत्न असला पाहिजे. जी टीम अल्पावधीत जास्त शब्द ओळखेल ती टीम विजेती ठरते. यामुळे हा गेम वेगवान गेम होतो व टीम्समध्ये आव्हानात्मक चर्चा रंगवणारा ठरतो.

उपलब्धता : अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस

हार्टस्टोन

या गेममध्ये तुम्ही स्थानिक पातळीवर एक छोटेखानी स्पर्धा खेळवू शकता. यामध्ये प्रत्येक खेळाडूने आपआपल्या मोबाइलमधून समोरच्या व्यक्तीला काही गमतीशीर कार्ड्स पाठवायची असतात. या कार्डमधील गंमत न ओळखता त्याचा वापर केल्यास खेळाडू हरतो. यामध्ये जो खेळाडू कमी वेळात जास्त कार्ड्सचा योग्य वापर करेल तो जिंकतो. हा खेळ खेळाडूंना आकर्षित करून घेणारा आहे.

उपलब्धता : अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस

बाम फू

या खेळात तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटच्या स्क्रीनवर अगदी मारामारीच करता. यामध्ये अनेक खेळाडू एकाच स्क्रीनवर खेळाता व त्यांना जास्तीत जास्त दगड गोळा करायची असतात. तुम्ही टॅप केल्यावर तो दगड तुम्ही निवडलेल्या रंगाचा होतो. यामध्ये जो कोणी आघाडीवर आहे ती व्यक्ती पाचव्या फेरीनंतर जिंकू शकते.

उपलब्धता : अ‍ॅण्ड्रॉइड (मोफत) आणि आयओएस (८० रुपये)

याट्झी

तुम्हाला फासे टाकून खेळले जाणारे गेम्स आवडत असतील तर तुमच्यासाठी हा पर्याय एकदम उत्तम आहे. यामध्ये फासे टाकून खेळता येणारे अनेक गेम्स आहेत. एकाच वेळी दोनपेक्षा जास्त लोक हा गेम खेळू शकता. यामुळे आपण ज्याप्रमाणे पट मांडून हे खेळ खेळतो तशाच प्रकारे टॅबवर किंवा स्मार्टफोनवर हा गेम खेळात येऊ शकतो. सर्वाधिक गुण मिळवणारी व्यक्ती १३व्या फेरीनंतर विजयी ठरते.

उपलब्धता : अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस

 नीरज पंडित

nirajcpandit   Niraj.pandit@expressindia.com