शिवसेना गटनेत्याच्या दालनाची डागडुजी
कल्याण-डोंबिवली महापालिकेत तिजोरीत खडखडाट असूनही नव्याने विराजमान झालेले पदाधिकारी आता आपल्या दालनांच्या डागडुजीकरिता प्रशासनाकडे आग्रह धरू लागले आहेत. महापालिकेतील शिवसेना गटनेत्यांचे दालन सुस्थितीत असताना विद्यमान गटनेते रमेश जाधव यांच्या आग्रहास्तव प्रशासनाने पुन्हा एकदा याच दालनाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पदाधिकाऱ्यांच्या दालनांवर लाखो रुपये खर्च करायचे आणि त्यामधून मलिदा काढायचा ही महापालिकेतील अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.
गेल्या वर्षी शिवसेना गटनेत्यांच्या दालनाचे सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. एका पदाधिकाऱ्याने दालन सुशोभीकरणाचे काम सुरू केले की भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारून आपले विरोधी पक्षनेते, गटनेते, सभागृह नेत्याचे दालन सुशोभित करून देण्याचा तगादा लावतात. दर पाच वर्षांत महापालिका पदाधिकाऱ्यांच्या दालनांवर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघडकीला आला आहे.
महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता नव्याने स्थापन झाली आहे. माजी महापौर रमेश जाधव यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. स्थानिक संस्था कराचे उत्पन्न बंद झाले असून मालमत्ता कराची वसुलीही फारशी समाधानकारक नाही. जाधव यांनाही या परिस्थितीची कल्पना आहे. गेल्याच वर्षी शिवसेना गटनेत्याच्या दालनावर काही लाखांचा खर्च करण्यात आला आहे. असे असताना पुन्हा एकदा याच दालनाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अन्य पदाधिकारीही उत्सुक?
महापालिकेच्या तिजोरीत विकासकामांसाठी पुरेसा पैसा नाहीच, शिवाय कर्मचाऱ्यांना पगार देतानाही आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे. दालन सुशोभीकरणाचे काम आपल्या मर्जीतील ठेकेदाराला द्यायचे आणि त्या माध्यमातून मलई खायची अशी परंपरा अनेक वर्षे पालिकेत सुरू आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या गटनेत्याने दालन सुशोभित केले की मग अन्य पक्षांचे पदाधिकारीही असाच दालन सुशोभित करण्याचा तगादा अधिकाऱ्यांच्या मागे लावतील, असे एका पालिका अभियंत्याने सांगितले. दालनांमध्ये सगळ्या सुविधा असतात, तरीही दर पाच वर्षांनी दालन सुशोभित करून पदाधिकाऱ्यांना काय मिळते, असा सवाल एका वरिष्ठ अभियंत्याने उपस्थित केला.
आपणास जे दालन मिळाले आहे, ते चांगले आहे. त्यात आपण समाधानी आहोत. त्यामध्ये कोणत्याही नवीन सुधारणा करण्यात येत नाहीत आणि कोणत्याही प्रकारे उधळपट्टी करण्यात येत नाही. फक्त शिवसेना गटनेत्याच्या दालनातील वातानुकूलित यंत्रणा पाणी पडून खराब झाली आहे. तेथे विजेची यंत्रणा असते. कोणताही धोका नको म्हणून त्या भागाची डागडुजी केली जात आहे. नवीन दालन वगैरे आपण काहीही करीत नाही.
– रमेश जाधव,
गटनेते, शिवसेना, कडोंमपा