छत्रपतींच्या स्वराज्याची गाथा ‘रॉक’च्या तालावर!
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवतच. शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्या शौर्य-पराक्रमाच्या जोरावर अनेक शत्रूंना नेस्तनाबूत करत हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. या पराक्रमाची वर्णने सांगणारे पोवाडे आणि गाणी यांनी अंगावर रोमांच उभे राहते. हाच रोमांचक अनुभव आता आधुनिक स्वरूपातील संगीताच्या तालावर ऐकताना येणार आहे. ठाण्यातील ‘मोक्ष’ या ‘रॉक ब्रॅण्ड’ने स्वराज्याची गाथा मांडणारा एक रॉक अल्बम तयार केला असून येत्या जानेवारीत तो प्रकाशित होणार आहे. तर या अल्बमच्या निमित्ताने या बॅण्डतर्फे ठिकठिकाणी ‘लाइव्ह शो’देखील आयोजित करण्यात आले आहेत.
जगातील पहिला मराठी रॉक बॅण्ड अशी ख्याती मिळवणाऱ्या ‘मोक्ष’च्या कलाकारांनी आजवर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठीचा आधुनिक बाणा पोहोचवण्याचे काम केले आहे. लोकसंगीत, पोवाडे, लावण्या, भजने अशा वेगवेगळ्या मराठी संगीत प्रकाराला रॉक प्रकारात आणून त्यांचे सादरीकरण करणाऱ्या या बॅण्डला अमराठी रसिक प्रेक्षकांनीही पसंतीची पावती दिली आहे. याच वाटचालीचा पुढचा टप्पा म्हणून ‘मोक्ष’च्या चमूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांवर ‘रॉक अल्बम’ करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरापासून ही मंडळी यासाठी मेहनत घेत असून कर्णमधुर रॉक संगीताचा साज असलेला ‘स्वराज्य’ हा अल्बम रसिकांच्या भेटीला येऊ शकणार आहे. ब्रॅण्डचा गीतकार विशाल बुरके याने वर्षभर यावर संशोधन करून ही गाणी लिहिली आहेत. सागर जोशी व्यवस्थापक आणि गिटारिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तर ऋग्वेद करंबळेकर, गिटारिस्ट जिमी अलेक्झेंडर, ड्रमर श्रेयस जोशी, कीबोर्ड प्लेअर पुष्कर कुलकर्णी यांचा या अल्बममध्ये समावेश आहे.पावनखिंडीतील बाजीप्रभूचे शौर्य, कोंढाणा गडावरील तानाजी मालुसरेचा पराक्रम, आग्य्राहून सुटका अशा काही ऐतिहासिक प्रसंगांना गीतरूपात मांडण्याचा प्रयत्न ‘मोक्ष’ने केला आहे. या अल्बममध्ये ‘रॉक’ प्रकारात सादर करण्यात आलेले भजनही आहे. नऊ गाण्यांच्या या अल्बमचा शेवट ‘शिवतांडव’ने करण्यात आला आहे.
छत्रपतींचा पराक्रम आणि मराठी रॉक संगीत प्रकाराच्या कलात्मकतेचे दर्शन घडवण्यासाठी ‘स्वराज्य’ या ब्रॅण्डची निर्मिती आम्ही केली आहे. हा अल्बमच्या ध्वनिमुद्रणासाठी अत्यंत नामांकित अशा यशराज स्टुडिओ बुक करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी लागणारा निधी आम्ही रसिकांसाठी कार्यक्रम सादर करून मिळवणार आहोत. त्यासाठी महाराष्ट्रातील आठ शहरांमध्ये लाइव्ह कार्यक्रम केले जाणार असून रसिकांना या अल्बमसाठी देणगी देण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्यातूनच ही कलाकृती रसिकांसमोर येऊ शकेल. पुण्यामध्ये लवकरच या उपक्रमाचा शुभारंभ केला जाईल.
– सागर जोशी, मोक्ष मराठी रॉक ब्रॅण्ड, व्यवस्थापक