२६ जुलै २००५ च्या महापुराने कल्याण शहर पाण्याखाली गेले. त्यानंतर महापालिका प्रशासन, शासनाला या शहरातून वालधुनी नदी वाहते याची जाणीव झाली. उल्हास नदीच्या खोऱ्यातून वालधुनी नदी उगम पावते. २१ किलोमीटर लांबीच्या या नदीचा कल्याणमधील प्रवाह तीन ते चार किलोमीटरचा आहे. २६ जुलै महापुराच्या वेळी उल्हास खोऱ्यातील पावसाच्या पाण्याचा लोंढा वालधुनी नदीतून कल्याण शहरात घुसला आणि शहर जलमय झाले. याचे कारण म्हणजे या नदीच्या काठावर उभारल्या गेलेल्या अनधिकृत झोपडय़ा.
अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहराजवळून आणि कल्याण शहराच्या शहाड, घोलपनगर भागातून वालधुनी नदी खाडीला मिळते. या नदीच्या पाण्याचा लगतच्या शहरांना पाण्याची तहान भागवण्यासाठी काडीचाही उपयोग होत नाही. उल्हासनगर, शहाड भागातील कारखान्यांमधून चोरून, लपून सोडलेले रासायनिक सांडपाणी, नदी किनाऱ्याच्या झोपडय़ा, गोठय़ांमधून सोडण्यात येणारे मलमूत्र, कचरा वाहून नेण्याचे काम वालधुनी नदी करते. गुजरात, वापी भागातून आलेल्या कंपन्यांमधील घातक रसायन पोटात घेऊन ते कल्याण खाडीत सोडण्याचे काम ही नदी करते. झोपडीदादा या नदीच्या पात्राचा वापर झोपडय़ा बांधण्यासाठी करीत आहेत. या नदीचे दोन्ही बाजूचे पात्र झोपडपट्टय़ांनी व्यापले आहे.
या नदीचा मिठी नदीप्रमाणे विकास केला तर, या नदीला जडलेला जलप्रदूषणाचा विळखा कायमचा दूर होऊ शकतो. हा दूरगामी विचार करून २६ जुलैच्या महापुरानंतर पालिका प्रशासन, शासन पातळीवर वालधुनी नदीचा विकास करण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात शासन पातळीवर अनेक वेळा बैठका झाल्या. विधिमंडळात या भागातील आमदारांनी वालधुनी नदी विकासाचे प्रश्न उपस्थित केले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

१० वष्रे वाया
नागपूरच्या ‘मेरी’ संस्थेने वालधुनी नदीचे सव्‍‌र्हेक्षण केले होते. ‘एमएमआरडीए’ने या प्रकल्पासाठी कडोंमपाला सुमारे ९५ लाखांचा निधी देण्याची तयारी केली होती. कडोंमपा व उल्हासनगर पालिकांनी संयुक्त निधी उभारून या विकासाच्या प्रक्रियेत योगदान द्यावे, असाही निर्णय झाला होता. या हालचालींमुळे कल्याण-डोंबिवली पालिकेने वालधुनी नदीचा विकास आराखडा तयार करून तो काही वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. २६ जुलैच्या महापुराचा जोर जसा ओसरू लागला, दिवस मागे पडत गेले, तसा वालधुनी नदी विकासाचा विषय रेंगाळत गेला. दहा वर्षे उलटली तरी वालधुनी नदीच्या विषयावर सरकार, शासनस्तरावर नाहीच; पण स्थानिक पालिकाही या विषयावर अवाक्षर काढायला तयार नाहीत. नदीप्रमाणे भासणारी वालधुनी नदी दोन्ही बाजूच्या झोपडय़ांमुळे आक्रसत चालली आहे. प्रवाहांच्या कडेला दारूचे अड्डे, बेकायदा बांधकामे केली जात आहेत. या नदीचा नाला झाला आहे. या नदीचा झालेला नाला भविष्यात शहराला २६ जुलैसारखा प्रकार घडला तर तापदायक आहे.