देश आणि कोकणाला जोडणाऱ्या सह्य़ाद्रीतील अनेक घाटवाटा या ‘ट्रेकर्स’च्या कायम
आवडीच्या जागा असतात. एखादी घाटवाट पकडून भटकताना निसर्ग, सह्य़ाद्रीच्या अधिक जवळ जायला होते. भीमाशंकर रांगेतील आहुपे घाटही असाच..
पूर्वी शाळा-कॉलेजच्या लेखी परीक्षातून ‘रिकाम्या जागा भरा’ असा प्रश्न असे. अनेक वर्षांच्या ‘ट्रेकिंग’च्या छंदानंतर आता असे लक्षात यायला लागलय की आपल्याही अशा काही ‘गॅप्स’ भरायच्या राहिल्यात. एखाद्या खास प्रेक्षणीय ठिकाणाच्या मागची पुढची ठिकाणे पाहून झालीत, पण ते मधले ठिकाण पाहायचे राहिलय. माळशेजच्या डोंगर रांगेतील दक्षिणेकडील शेवटचे टोक दुर्ग-ढाकोबा पाहून परम संतोष पावलो होतो, पण त्या शेजारचा आहुपे घाट पाहायचे राहून गेले होते. ही संधी तब्बल दोन दशकांनंतर नुकतीच आली.
इसवी सन पूर्व ३० मध्ये उदय पावलेल्या सातवाहन काळापासून अस्तित्वात असलेला नाणे घाट या भागातील घाटांचा राजा होय. त्याच्या दक्षिणेकडे असणारे दाऱ्या, आहुपे हे पायी उतरण्याचे घाटमार्ग. त्याचे सवंगडीच म्हणायला हवेत. नाणेघाटाच्या पायथ्याला त्या काळातले व्यापारी केंद्र ‘वैसाखरे-वैश्यगृह’ म्हणजे आजचे वैशाघरे आहे. दाऱ्या घाटाच्या पायथ्याला पळू गाव आहे, तर आहुपे घाटाच्या पायथ्याला मुरबाड-कर्जत मार्गावरील खोपीवली गाव आहे. आजही ह्य़ा भागातील भूमिपुत्र आदिवासी मंडळी पायी तासा दोन तासात हे घाट चढ-उतार करून देश आणि कोकणातील आपले संबंध, नातीगोती, बाजारातील खरेदी-विक्री निगुतीने करतात. घाटावरील भीमाशंकर अभयारण्य आहुपे गावापर्यंत आलेले आहे. सुमारे ६००-७०० वस्तीचे आहुपे गाव अगदी सह्य़ाद्रीच्या टोकावर वसलेले आहे. आहुप्याजवळच्या दाट अरण्याला ‘भट्टीचे रान’ म्हणतात. या अरण्यात आईन, हिरडा, आंबा, जांभूळ अशी वनसंपदा आणि कोल्हे, सांबर, रानडुकरे, साळींदर, अगदी बिबटय़ांचासुद्धा वावर आढळतो. मंचरहून आहुप्याला सकाळी साडेआठला एक एस. टी. बस येते. तिने येऊन सायंकाळपर्यंत घाट उतरून खोपीवली गावात पायउतार होता येते. भीमाशंकरनजीकच्या घोडेगावाहूनही एस. टी. ची बस इकडे येते.
आम्ही घोडेगावहून आहुपेकडे निघालो. नुकताच पावसाळा सरल्यामुळे चहूकडच्या डोंगरदऱ्या हिरवाईने न्हाऊन निघालेल्या होत्या. डिंभे धरणाची भिंत दिसली तेव्हा आठवणीने वचपे गावात गेलो. धरणाखाली बुडणारे तेथील सिद्धेश्वराचे शिल्पमंदिर गावक ऱ्यांनी मोठय़ा मेहनतीने जलाशयाच्या काठावर आणून पुन्हा तसेच वसविलेले आहे. ते पाहिले तेव्हा त्याचे खूप कौतुक वाटले. आता येथून पुढचा रस्ता अतिशय रोमांचक म्हणजे चक्क डोंगरमाथ्यावरून जाणारा असून दोन्ही बाजूला धरणाचे ‘बॅक वॉटर’ आपल्याला दटावीत असते. सुमारे पाच-दहा किलोमीटपर्यंतची ही ‘हवाई सफर’ आनंद देत असते. थोडय़ाच वेळात आहुपे गाव आले आणि त्याच्या दर्शनाने भारावून गेलो. सह्य़ाद्रीच्या कुशीत तीनही अंगाने कडा तुटलेल्या सोंडेच्या टोकावर हे निसर्गरम्य गाव आहे. गावाच्या अलीकडेच एक डौलदार आम्रवृक्ष आहे. आंब्याचा एवढा विशाल वृक्ष सहसा आढळत नाही. त्याच्या छायेतच आम्ही पोटपूजा उरकून घाटाकडे निघालो. डावीकडे टोकाला शाळेची बैठी पांढऱ्या रंगाची छोटी इमारत असून तिच्या मागे हरिश्चंद्रगडावरील कोकणकडय़ासारखा एक अजस्र कडा आहे. त्याला गावकरी ‘ढग’ म्हणतात. बहुदा त्यावर पाण्याचे ढग आदळून पाऊस पडत असावा.
शाळेच्या इमारतीजवळूनच दाट झाडीतून एक उताराची घळ दरीत उतरताना दिसते. हाच तो आहुपे घाटाचा प्रारंभ. दगड-धोंडय़ांनी भरलेली बोराटय़ाच्या नाळेसारखीच ही वाट. पूर्वापार जुना मार्ग असल्याने कुठे कुठे कातळात पायऱ्याही कोरलेल्या आहेत. साडेतीन-चार हजार फुटांच्या उभ्या कातळकडय़ातील हा मार्ग असल्याने झपझप उतरायला मजा वाटत होती. शिवाय संपूर्ण मार्ग गर्द झाडीने आच्छादलेला असल्याने ‘उन्हाळी ट्रेक’साठीही याचा विचार करता येईल. दीड तासात पायथा गाठला आणि रायगड जिल्ह्य़ात आलो. घाटावर थोडय़ावेळापूर्वी पाहिलेले आकाश आता उत्तुंग वाटत होते. ते पाहताना प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम यांचे एक वाक्य आठवले, ‘ट्रेक वही हौता है, जो ‘ट्रेकर्स’ का आसमान उंचा करता है।’ या दृश्याकडे पाहताना असेच काहीसे वाटले.
   

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना