पुण्याच्या दक्षिणेकडून सिंहगडची डोंगररांग खालीवर होत पूर्वेला अगदी यवतजवळच्या भूलेश्वपर्यंत धावली आहे. चढ-उतारांच्या या देखाव्यात दिवे घाटाजवळ एक शिखर थोडेसे मान उंचावून बसले आहे. त्याच्या या डोक्यावर एक पांढऱ्या रंगाची टोपीही आहे. काहींच्या लक्षात आले असेल, आपण बोलतो आहे ते बोपदेव आणि दिवे घाटादरम्यानच्या कानिफनाथ डोंगराबद्दल!
महाराष्ट्रात शैव आणि शक्ती देवतेखालोखाल दत्तसंप्रदायाचा सर्वत्र प्रसार झालेला आहे. डोंगर दऱ्या, शिखरांच्या टोकांवर अनेक ठिकाणी अशा नाथपंथीय स्थानांची निर्मिती झाली आहे. पुण्याच्या दिवे घाटाजवळच्या डोंगरावर थाटलेले हे स्थानही यापैकी एक!
कानिफनाथ पुण्याहून साधारण तीस किलोमीटरवर. पुण्याहून सासवडमार्गे हा रस्ता; पण थोडी वेगळी वाट चोखाळण्यासाठी कोंढव्याच्या डोक्यावर असलेला बोपदेव घाट चढावा आणि बोपदेव, चांबळी गावातून कानिफनाथचा डोंगर गाठावा. डोंगरावरील या स्थानापर्यंत थेट रस्ता केला आहे. या स्थळापर्यंत स्वारगेटहून दररोज सकाळी एक एसटी बसही धावते. पण याशिवाय थोडे डोंगर चढण्याची सवय असणाऱ्यांनी दिवे घाटाच्या पायथ्याशी वडकी गावात उतरावे किंवा स्वत:चे वाहन असेल, तर डोंगराचा पायथा गाठावा आणि मग थेट समोरच्या कानिफनाथ डोंगराला भिडावे. एखाद्या गडावर जाते तशी ही डोंगरवाट वर गेली आहे. या पैकी कुठल्याही वाटेने आलो तरी डोंगरावरचे ते पांढऱ्या रंगातील राऊळ आपल्याला वाट दाखवत असते.
कानिफनाथ नवनाथांपैकी एक, त्यांचेच इथे मंदिर आहे. या शिवाय अन्य छोटीमोठी मंदिरेही इथे आहेत. पण या साऱ्यांत खरे आकर्षण आहे ते कानिफनाथ मंदिराचे आणि त्याच्या छोटय़ाशा प्रवेश मार्गाचे! या मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी असलेली वाट म्हणजे एक खिडकीवजा भुयारी मार्ग आहे. अवघ्या एक ते दीड फूट लांबी-रुंदीच्या या जागेतून आत जायचे. या कल्पनेनेच सुरवातीला घाम फुटतो. पण आपल्या समोर वेगवेगळ्या वयोगटातील, जाडी-उंचीची माणसे स्वत:ला त्या एवढय़ाशा अरुंद मार्गातून आत लोटत असतात. विशिष्ट कोनात तिरके होत, आपले शरीर आत घालायचे. आत-बाहेर होतानाही कटाक्षाने देवाकडे डोके ठेवायचे. देवाकडे डोके करणारा सुटतो तर पाय करणारा बरोबर अडकतो असा इथला समज. आपली वेळ येते त्या वेळी थोडेसे अवघड वाटते पण विश्वास आणि श्रद्धेवर आपल्यालाही जमून जाते आणि आतल्या कानिफनाथाचे दर्शन घडते. याच वेळी इथे भिंतीवर लिहिलेला एक संदेश आपले स्वागत करत असतो, ‘‘असेल श्रद्धा ज्याचे उरी, त्याला दिसे कानिफनाथ मुरारी!’’
कानिफनाथाच्या या अद्भुत दर्शनातून बाहेर यावे, तो बाहेरच्या निसर्ग देखाव्यात अडकायला होते. उत्तरेकडे पुण्याचा विस्तार त्याच्या सीमा शोधा म्हणून सांगतो तर तेच दक्षिणेकडे पुरंदर-वज्रगड, सूर्य पर्वत आदी डोंगर अनंताचा पसारा घेऊन उभे राहतात. सिंहगड, कात्रज, दिवे घाट या साऱ्या ओळखीच्या खाणाखुणा दिसू लागतात. पावसाळ्यात तर या साऱ्या भूमीवर हिरवाईची दाट मखमल पसरते. मग या वेळी कात्रज-कानिफनाथ, कानिफनाथ-मस्तानी तलाव, मल्हारगड-दिवेघाट-कानिफनाथ अशा भटक्यांच्या डोंगरयात्रा सुरू होतात.
भक्तांसाठी इथे देव आहे, तर भटक्यांसाठी डोंगर. नीरव शांतता आहे, हिरवा निसर्ग आहे. सकाळ-संध्याकाळी पोहोचलात तर कधी-कधी मोरांचे बागडणेही दिसते. पुण्याजवळ एक दिवसाच्या सहल-भ्रमंतीसाठी कुठे जावे असा अनेकांना नेहमी प्रश्न पडतो. पण अशांनी आपल्या अवतीभोवतीच थोडीशी नजर फिरवली आणि शुद्ध हेतूने भरारी घेतली, तर त्यांना असे अनेक ‘कानिफनाथ’ सहज दर्शन देऊन जातील!