कोणी कोणता ड्रेस घालावा हा ज्याचा- त्याचा प्रश्न आहे, अनेकदा महिलांच्या कपड्यांवरून वाद होतात, त्यांनी अमुक प्रकारचेच कपडे घालावे अशी सक्ती केली जाते. असाच काहीसा वाद पाहायला मिळाला तो कॅलिफोर्नियामधल्या एका शाळेत. काही मुलींनी ऑफ शोल्डर टॉप घातला म्हणून त्यांना शाळेतून घरी पाठवण्यात आलं. अशा प्रकारचे कपडे मुलींनी शाळेत घालून येणं हे नियमांचं उल्लंघन करण्यासारखं आहे. या कपड्यांमधून अंगप्रदर्शन होतं आणि इतर मुलांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो म्हणूनच या मुलींना घरी पाठवण्यात आलं.

कॅलिफोर्नियामधल्या सॅन बेंटिंनो हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. या वीस मुलींना घरी पाठवण्यात आल्यानंतर शाळेतील काही मुलं या मुलींच्या बाजूने उभे राहिलेत. मुलींना ड्रेसकोडच्या नावावर घरी पाठवून शाळेनं अन्याय केला आहे. म्हणूनच या मुलांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं ठरवलं. तेव्हा मुलींना पाठींबा देण्यासाठी काही मुलं ऑफ शोल्डर टॉप घालून शाळेत पोहोचले. ट्विटरवर हे फोटो व्हायरल होत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होत आहे.  याची खूपच चर्चा झाल्यानंतर शाळेनं परिपत्रक काढलं. ड्रेसकोडबाबतचा नियम फार पूर्वीपासूनच होता. मुलींच्या कपड्यांवर शाळेचा आक्षेप नाही. पण अशा कपड्यांमुळे मुलींसोबत कोणी गैरवर्तन करू नये यासाठी त्यांना घरी पाठवण्यात आल्याचं शाळेनं म्हटलं आहे.