जगातील सगळ्यात लठ्ठ महिला इमान अहमद हिला फेब्रुवारी महिन्यात उपचारासाठी मुंबईतल्या सैफी रुग्णालयात आणण्यात आले होते. या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारामुळे तिचे निम्मे वजन घटले असल्याच्या बातम्या वारंवार येत होत्या, त्यातच सोमवारी इमानचे वजन आणखी घटले असून आता ते १७१ किलोवर आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वयाच्या अकराव्या वर्षांपासून अथंरुणाला खिळलेली इमान वजन कमी झाल्यामुळे आता बरी होईल किंवा हालचाल करू शकेल अशी आशा सगळ्यांना होती पण इमानच्या गोष्टीत आता नवे वळण पाहायला मिळते आहे. इमानचे वजन पुरसे घटले नसल्याचा आरोप तिच्या बहिणीने केला आहे.

‘इमानच्या प्रकृतीत अद्यापही फारशा सुधारणा झाल्या नाहीत, ती बोलूही शकत नाही आणि तिचे वजन घटल्याचा डॉक्टरांनी जो दावा केला आहे तो खोटा आहे.’ डॉक्टर जो आकडा सांगत आहे त्याप्रमाणात तिचे वजन घटले नसल्याचा आरोप तिची बहिण सलिमा सेलिम हिने एका वेबसाईटशी बोलताना केला. ‘एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत इमानला इजिप्तमध्ये परत नेण्याबद्दल मला इथल्या डॉक्टरांनी सांगितले. पुढच्या उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यक्यता नाही, असेही डॉक्टरांचे म्हणणे होते’ अशी प्रतिक्रिया  तिच्या बहिणीने  ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.  दुसरीकडे इमानवर उपचार करणारे डॉक्टर मुझफ्फल लकडावाला यांनी मात्र तिच्या बहिणीचे सारे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘इमानचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी तिच्यावर जे उपचार करायचे होते ते सर्व उपचार आम्ही केले आहेत, तिचे वजनही घटले आहे. आता  मज्जासंस्थेसंदर्भातील उपचार तिला इजिप्तमध्येही घेता येऊ शकतात. पण या उपचारासाठी तिच्या कुटुंबियांकडे पुरसे पैसे नाहीत त्यामुळे तिची बहिण असे आरोप करून आम्हाला अडचणीत आणू पाहत आहे, असे डॉ. लकडावाला यांचे म्हणणे आहे.

इमान अद्यापही हालचाल करु शकत नाही, नळीद्वारे तिला अन्न दिले जाते, तसेच ती बोलूही शकत नाही असे तिच्या बहिणीने सांगितले. “अनेकदा ती आजारी असते. तिच्यावर पूर्णपणे उपचार करण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण आता मात्र तिला डिस्चार्ज देण्यात येईल, असं डॉक्टर म्हणताहेत. पण इजिप्तमध्ये तिला काय झालं तर तिची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न तिच्या बहिणीने उपस्थित केला. फेब्रुवारी महिन्यात इमानला मुंबईत आणण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांत तिचे वजन फिजिओथेरपी आणि औषधांमुळे झपाट्याने कमी होत आहे. सध्या इमानचा थायरॉईड आजार नियंत्रणात आहे, त्याशिवाय तिचे मूत्रपिंडही व्यवस्थित काम करते आहे. इमानचे वजन कमी करण्यासाठी ६० टक्के उपचार पूर्ण झाले आहेत, मात्र, अजूनही तिच्या मज्जासंस्थेसंदर्भातील उपचार सुरू आहेत, असे इमानवर उपचार करणारे डॉ. मुझफ्फल लकडावाला यांनी सांगितले.