गोरा वर्ण, सरळ केस, नाकी डोळे नीट, ब्रँडेड कपडे आणि मेकअप केलेल्या सुपर मॉडेल्सचे फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होतात. अशा सुंदर मॉडेल्सची चर्चा असते. प्रत्येक ब्रँड आपल्या ब्रँडच्या प्रसिद्धीसाठी अशाच सुंदर चेह-याची निवड करतात. किंबहुना आपल्या सगळ्यांसाठी गोरा रंग हीच सुंदरतेची व्याख्या बनून गेलेली आहे पण या सगळ्या कल्पनांना छेद देत फक्त आणि फक्त तिचेच नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचे प्रत्येक फोटो व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम असो किंवा इतर सोशल मीडिया असो तिला फॉलो करणारे अनेक आहे. ही मॉडेल आहे खॉदिया डिओप. पहिल्यांदा एका फोटोशूटच्या निमित्ताने ती जगासमोर आली. वेगवेगळ्या वर्णांच्या मॉडेल्सचे फोटशूट करण्यात आले  होते त्यात खॉदियाही होती. आपल्या काळ्या वर्णामुळे तिने जगाचे लक्ष आपल्याकडे खेचले. आफ्रिकन वंशाची असलेली खॉदिया ही पॅरिस आणि न्यूयॉर्क या ठिकाणी राहते. वयाच्या १७ व्या वर्षातच तिने मॉडेलिंग क्षेत्रात पर्दापण केले. काळ्या वर्णामुळे ती ‘मेलेनील गॉडिस’ म्हणून ओळखली जाते.

काळावर्ण असलेली सगळ्यात सुंदर मॉडेलचा मानही तिला मिळाला आहे. लहान असताना अनेकदा आपल्याला वर्णभेदाचा सामाना करावा लागला असेही तिने सांगतिले. काळा रंग असल्यामुळे अनेक जण मला चिडवायचे. माझ्या बालमानाल काय वाटेल याची कोणतीही पर्वा न करता मला नावे ठेवयाचे अशा बालपणीच्या अनेक कटू आठवणी खॉदीया सांगते. जग बदले तरी वर्णभेद आजही कायम आहे आजच्या घडीलाही आपल्याला वर्णावरून सोशल मीडियावर वाईटप्रकारे लक्ष्य केले जाते अशी खंतही तिने बोलून दाखवली. आजही अनेक ठिकाणी मॉडेलिंग क्षेत्रात काळ्या वर्णाच्या मुलीला नाकारले जाते. खॉदीयाला हेच विचार बदलायचे आहे. सध्या वर्णभेदामुळे मानसिकरित्या खच्चीकरण झालेल्या महिलांसाठी खॉदीया प्रेरणास्थान बनत आहे.