‘प्राण्यांवर प्रेम करा’चा संदेश आपल्याला वाचून वाचून पाठ झालाय. पण तेवढ्यापुरता तो वाचून आपण लक्षात ठेवतो आणि विसरून जातो. इथवर सगळं ठीक आहे. प्रेम करायचं नसेल तर करू नका. पण प्राण्यांना स्वत:हून ठार मारणाऱ्यांना आपण काय म्हणणार. जंगलात वाघसिंहांची शिकार करून त्यांच्या कातड्या विकत गबर होणारे तेवढेच निर्ढावलेले असतात. पण शहरी भागातले सुशिक्षित म्हणवणाऱ्या लोकांच्या मनात एवढी नीच दर्जाची क्रूरता असेल असं आपल्याला नेहमीच्या जीवनात दिसत नाही. पण काही वेळा असे काही व्हिडिओ समोर येतात की मनाचा थरकाप उडतो आणि त्या खुनशी वृत्तीच्या माणसाची चीड येते.

हा दिल्लीमधल्या व्हिडिओ आहे. दिल्लीच्या वसंत कुंज भागातल्या या माणसाने आपली वॅगन-आर गाडी रस्त्यात बसलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांवरून नेत त्यांना चिरडलं. या गाडीला या पिल्लांच्या बाजूने जाण्यासाठी भरपूर जागा असतानाही या माणसाने ही गाडी मुद्दामहून या पिल्लांच्या अंगावरून नेत त्यांना चिरडलं. या दोन पिल्लांपैकी एक पिल्लू जागीच ठार झालं. तर दुसऱ्या पिल्लाचा एक पाय चिरडला गेला. या परिसरातले काही रहिवासी या कुत्र्याच्या पिल्लांना खायला द्यायचे. त्याचा राग ठेवत या माणसाने या पिल्लांना ठार मारल्याचं या रहिवाशांनी पोलिसांना सांगितलं

आता या प्रकारावरून  दिल्लीला लगेच नावं ठेवू नका. हा पुढचा व्हिडिओ मुंबईजवळ ठाण्यातला आहे. यात तर या क्रूर गाडीवाल्याने कुत्र्याच्या अंगावरून गाडी नेलीच पण हा कुत्रा जखमी झाल्याचं कळूनसुध्दा हा माणूस निघून गेला.

 

सौजन्य- यूट्यूब

अशा प्रकाराची प्रवृत्ती माणसांमध्ये का असते?  कोणाच्या मनात एवढी क्रूरता असू शकते की  तो किंवा ती स्वत:च्या मनातलं नैराश्य, आपल्या आयुष्यात आलेलं अपयश अशा पध्दतीने मुक्या प्राण्यांवर काढू शकते?