कोणताही युध्दावर आधारलेला सिनेमा असेल किंवा सीरियल असेल. तो भूदल किंवा हवाई दलावरच बेतलेला असतो. याच्यामागच्या कारणांचा कधी  विचार केला आहे का? ‘गाझी अटॅक’ सारखा एखादाच सिनेमा असा असतो की जो नौदलावर आधारित असतो.

भूदल किंवा हवाई दल यांच्या कसरती सामान्य भारतीय नागरिकांना कधी ना कधी पाहता येतात. पण नौदलाच्या बाबतीत साहजिकच असं नसतं. किनाऱ्यापासून शेकडो मैल दूर भर समुद्रात उभ्या असणाऱ्या या युध्दनौका कशा प्रकारे देशाच्या सागरी सीमांचं संरक्षण करतात हे सामान्य नागरिकांना सहज कळणं शक्य नसतं. या युध्दनौकांवर असतात ते भारतीय नौदलाचे खंदे वीर. जे अहोरात्र झटून देशाचे किनारे सुसज्ज आणि संरक्षित करण्यासाठी मोठा हातभार लावतात.

या युध्दनौकांवरचं आयुष्य कसं असेल याचा आपण सर्वजण फक्त अंदाज लावू शकतो. आपल्या नातेवाईकांपैकी कोणी नौदलात असलं तरच याविषयी आपल्याला काही माहिती मिळते पण एरव्ही खोल समुद्रात पहारा देणाऱ्या या युध्दनौकांवर नक्की काय सुरू असतं याची आपल्याला मोठी उत्सुकता असते.

भारतीय जनतेची ही उत्सुकता पाहत भारतीय नौदलाने आता एक व्हिडिओ प्रसिध्द केला आहे. आयएनएस राजपूत या युध्दनौकेवर तयार केलेला हा एक व्हिडिओ आहे.

आयएनएस राजपूत ही युध्दनौका ‘विनाशिका’ आहे. या युध्दनौकेवर काम करणाऱ्या भारतीय नौसैनिकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रसिध्द झाला आहे. पाहा हा व्हिडिओ

आपल्यासारख्या सामान्य लोकांना हे एेकून पटणार नाही की प्रत्येक युध्दनौका हे एकच शहरच असते. वरच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शत्रूच्या मनात धडकी भरवणाऱ्या मिसाईल्ससोबत जखमी सैनिकांची काळजी घेणारी हाॅस्पिटल्स अशी सगळी व्यवस्था या युध्दनौकांवर असते. नौदलाने स्वत: फेसबुकवर टाकलेल्या या व्हिडिओमध्ये काम करणारे तसंच काही ओळी गाणारे सगळेजण हे भारतीय नौदलाचं नौसैनिक आहेत. त्यांच्याकडे पाहून आपली मान खरोखरंच अभिमानाने उंच होते.