उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळण्यावरून भारतीय जनता पक्षात (भाजप) जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या एका भाजपच्या कार्यकर्त्याने बुधवारी लखनौमधील पक्षाच्या मुख्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे. या घटनेमुळे भाजपमध्ये खळबळ माजली असून, आगामी काळात भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांचे रण तापू लागले आहे. गेल्या काही दिवसांत सत्ताधारी समाजवादी पक्षात वर्चस्वाचे राजकारण सुरू होते. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. तर उत्तर प्रदेशात ‘कमळ’ फुलवायचेच, असा निर्धार भाजपने व्यक्त केला आहे. त्यासाठी दिल्लीतील भाजपचे नेते उत्तर प्रदेशात ठाण मांडून बसले आहेत. समाजवादी पक्षासह आघाडी करून उत्तर प्रदेशातील आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. तर आपली सत्ता कायम राखण्याचे आव्हान समाजवादी पक्षाकडे आहे. त्यात मायावतींनीही उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन करायचीच, असा निर्धार भाजपने केला आहे. पण त्यापूर्वीच भाजपतील अंतर्गत मतभेद समोर आल्याचे दिसते. तिकीटवाटपावरून भाजपमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. पक्षाच्या लखनौतील मुख्यालयाबाहेर एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समजते. राकेश कुमार दुबे असे या कार्यकर्त्याचे नाव असून, शाहजहांपूरमधील ददरौल विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छूक आहेत. मात्र, या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या दुबे यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे. त्यांनी थेट मुख्यालयाबाहेरच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर पक्षात बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. काही नेते उघडपणे पक्षनेतृत्वाविरोधात बोलत आहेत. तर आपले तिकीट कापल्यानंतर काहींनी अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर अनेक नाराज नेत्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.