माझ्या घराच्या गॅलरीमध्ये उभं राहिलं की समोर जी. ए. कुलकर्णी त्यांच्या अखेरच्या वर्षांत जिथे राहिले ते घर दिसतं. छानसा बंगला आहे तो. झाडीत काहीसा लपलेला. एकदा रात्री गॅलरीच्या कठडय़ावर बसून ग्रिलमध्ये पाय टाकून नेहमीसारखा पुस्तक वाचत होतो. मारुती चितमपल्ली यांचं ‘चकवाचांदण’ हे अप्रतिम पुस्तक हातात होतं. जी. ए. कुलकर्णी आणि चितमपल्ली यांची एकदाच भेट झाली त्याच भागाशी वाचत पोचलो होतो. गंमत म्हणजे या समोरच्या बंगल्यामध्येच त्या दोघांची भेट झाली होती. जी. ए. आणि प्रभावती यांनी चितमपल्लींना कडक आग्रह करीत इथेच- माझ्या समोरच्या गच्चीवर- पोहे आणि चहा दोनदा दिले होते. आणि मग वाचताना एकदम जाणवलं, की चितमपल्ली यांचं ‘सेटिंग’- ‘स्थलकालबद्धित वातावरण’ केवढं अचूक आहे! ‘‘त्यांच्या मागं एक उंच, मोठं नारळीचं झाड..’’ चितमपल्ली लिहिताहेत. हे समोर दिसतंय मला उंच नारळीचं झाड. आता त्यावर दोन भारद्वाजही राहतात अधेमधे. ‘‘घरासमोरून एक रस्ता. कडेने हारीनं बंगले होते. रस्त्यापलीकडे शेत. आणि कुंपणाला निलगिरीच्या उंच झाडांची रांग..’’ चितमपल्लींचं हे सेटिंग वाचताना डोळे वर बघून खातरजमा करताहेत. शेतं पुण्यातून नाहीशी झाली, पण बाकी सारे तपशील आजही तंतोतंत लागू होताहेत. ही भेट अवघी दोन तासांची. त्यात जी. एं.शी गप्पा मारता मारता या लेखकानं हे सारं वातावरण टिपलं, अचूक उतरवलं आणि आजही ते लागू होतंय, हे सगळं मला महत्त्वाचं वाटलं.
कुठलाही लेखक आपला परिसर कथेत, कादंबरीत घडवीत असतो. कधी त्या गावाला, ठिकाणाला नाव असतं, कधी नाही. ललित लिखाणालाच हे ‘सेटिंग’ असतं असं नव्हे; ललितेतर लेखांमध्येही स्थलमांडणी ही नेहमीच मोलाची असते. मिलिंद बोकिलांच्या सामाजिक लेखातली स्थळं ही अत्यंत सजीव असतात. अनिल अवचटांच्या लेखामुळे आमचं पत्रकार नगर अनेक वाचकांना न बघताही माहीत असतं. ते कधी आले तर त्यांना पत्रकार नगरच्या खाणाखुणा पटकन् गवसतात! कारण अखेर साहित्य-तथ्याधिष्ठित आणि ललित- हे वाचकाला त्याच्या राहत्या जागेतून, बसल्या खुर्चीतून उचलून दूर दूर फिरायला नेत असतं. वाचकाचं मन त्या प्रवासानं श्रीमंत होतं, मोकळं होतं. तोही लेखकासोबत त्या- त्या ठिकाणी जातो आणि ती स्थळं त्याच्या मनात रेंगाळत असतात. ‘चौघीजणी’वरचा माझा लेख वाचून एका वाचकानं मला कळवलं होतं की, मिसेस मार्चचं घर मला आतून-बाहेरून माहिती आहे! आणि किती खरं आहे! ‘कोसला’मधली टेकडी- ज्यांनी वेताळ टेकडी बघितली आहे त्यांना लगेच त्यांतलं साधम्र्य जाणवतं. पण ज्यांनी पुण्यातली फग्र्युसन कॉलेजमागची ती टेकडी कधीही बघितलेली नाही, त्यांनाही ती दृश्यमान होते. पांडुरंग सांगवीकर आणि त्याच्या मैत्रीचा मानसिक प्रवास त्या खडकाळ टेकडीवर नीट दृश्यमान होतो. अखेर लेखकाची ती ताकद असते. त्याचं ‘सेटिंग’ हे वाचकाला मुदलात विश्वासार्ह वाटायला हवं. (ते काल्पनिक, ढगांमधलं, पऱ्यांच्या राज्यातलं असलं तरी चालेल.) मग वाचक स्वत:ला सोपवतात लेखकाहाती आणि मग ते स्थल कल्पितात.
यातही गंमत अशी की, पुन्हा प्रत्येक वाचक हा ते- ते ठिकाण स्वत:च्या वकुबानुसार कल्पित राहतो! चितमपल्लींचा गोदाकाठ हा मला जसा भासेल तसाच दुसऱ्याला भासेल असं नाही. आणि तरी लेखक चांगला असेल तर वाचकांची ती स्थलंकल्पिते ही फार टोकाची नसतात. नांदेडला अदिती हर्डीकर या रसिक मैत्रिणीनं जेव्हा गोदाकाठ दाखवला तेव्हा पहिल्यांदा मनात चितमपल्लीच आठवले! पी. विठ्ठल किंवा पृथ्वीराज तौर या नांदेडच्या लेखक-मित्रांशी जेव्हा नेट-संवाद होतो तेव्हाही अनेकदा मागे तोच गोदावरीचा चितमपल्लींचा काठ रेंगाळत असतो! लेखकाची उत्तम स्थलनिर्मिती वाचकाचं मन कसं काबीज करते हे सांगण्यासाठी हे व्यक्तिगत उदाहरण दिलं.
अर्थात सगळे लेखक असे गुणी, मेहनती नसतात हेही उघड आहे. कवी तर बऱ्याचदा ‘सेटिंग’बाबत आळशीच असतात! कवी ‘जे न देखे रवी’ ते बघू शकत असल्याने कुणी समीक्षकही स्थलावरून त्याची मानगूट पकडू शकत नाही! आपण पारलौकिक जगात नांदत असल्याने आपल्यावर स्थलाचं बंधन नसतं असंही अनेक कवींना वाटतं. गझलांचा भाषिक स्थल-अवकाश तर हृदयापलीकडेही पुष्कळदा जात नाही! (या सगळ्यानंतर एक मिश्कील स्माईली आहे याची नोंद घ्यावी.) पण ग्रेसांचंच बघा. इतकी तरल, अनवट, पारलौकिक कविता लिहितानाही त्यांची स्थलनिर्मिती कशी अचूक असते. मागे जेफर्सनच्या कवितेच्या वेळी आपण ते सदरात बघितलं होतंच.
हे ‘सेटिंग’ एक असलं तरी लेखकाच्या नजरेनुसार ते पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचं वाटू शकतं. उदाहरणार्थ-जपान! ‘ओमियागे’मधला सानियाचा जपान हा पोक्त, गंभीर, तरी उत्साही आहे. सानिया लिहितात- ‘‘होझुगावा नदी चांगली खळाळत होती. इतर मुलांसारखा युकीथोही उत्साही झाला होता आणि पाण्याचे तुषार अंगावर घेताना ओरडत, खिदळत होता.. (पुढे) होझुगावा अधिक रुंद, शांत झाली.’’ मग तिथे मिचिकोला तिच्या गंभीर नवऱ्याची आठवण होते आणि नायिकेला जेसन या मित्राची! आता हे रोचक आहे. एकच नदीचं स्थल; पण आधीचा खळखळाट आणि मग होणारा शांत प्रवाह हा पात्रांनाही कवेत घेऊन होत जाणारा प्रवास आहे. नदी पात्रांसारखी वागते; पात्रं नदीसारखं वागतात, किंवा नदी हेही एक पात्र होत राहते! पण तोच जपान गौरी देशपांडेंच्या ‘तेरुओ’मध्ये किती कठोर होऊन येतो. तिचा प्रियकर जपानी असला तरी जपान त्या कथानायिकेला रुचलेला नाही. अगदी मुळीच नाही. हिरोशिमामधलं साद्यंत वर्णन ‘तेरुओ’मध्ये उगाच येत नाही! आणि मग हा ‘तोकोनामा’मधला प्रभाकर पाध्यांचा जपान! तो देश कसला रंगेल आहे राव त्या पुस्तकात! त्या सुंदर किमोनोधारक जपानी मुली, ती आकर्षक उद्याने आणि मनस्वीपणे जपानला प्रेमाच्या पातळीवर नेत राहणारी पाध्यांची लेखणी!
प्रवासवर्णनात किंवा ललितेतर वैचारिक लेखनातही स्थलाचा अभ्यास लागतो आणि ते जिवंत करायची हातोटीही लेखकाकडे असायला लागते. ‘अफगाण डायरी’मध्ये प्रतिभा रानडे यांनी जे काबूल रंगवलं आहे ते इतकं सुंदर आहे स्थलनिर्मिती म्हणून! सुंदर म्हणजे रूपानं नव्हे; विश्वासार्हतेच्या पातळीवर सुंदर! सहज परवा गुगल मॅप्सवर काबूलचे रस्ते पाहत होतो. (त्यामध्ये ‘स्ट्रीट वू’ या फीचरमुळे प्रत्यक्ष रस्त्यावर गेल्याचा भास होतो.) प्रतिभाताईंचं ते पुस्तकातलं स्थलवर्णन तंतोतंत आहे, हे तो गुगल मॅप बघताना सारखं जाणवत राहिलं. अगदी ललित कादंबरीमध्येही हा अभ्यास असणं आवश्यक असतं. विशेषत: युद्धकथांमध्ये! अॅलिस्टर मॅक्लीनचं ‘फोर्स १०’ नावाचं पुस्तक नुकतंच वाचत होतो. त्यामध्ये सुरुवातीलाच युगोस्लाव्हियाच्या त्या युद्धभूमीचा नकाशा जोडला आहे. पुढे पुस्तक वाचताना मला जाणवत गेलं, की हा नकाशा किती महत्त्वाचा आहे कथनात! तो युद्धभूमीचा पट लेखकाच्या मनात पक्का आहे. युगोस्लाव्हियामधले ते बर्फाळ पर्वत, ती नेरेत्वा नदी आणि घळ, एका बाजूचं जर्मन सैन्य, दुसऱ्या तीरावरचं कर्नल व्हकोलोव्हिकचं तुटपुंजं सैन्य आणि त्यांच्या मदतीला बंधाऱ्याजवळ विमानातून उडी मारून उतरलेले पॅराशूटर्स! तो सारा परिसर जणू जिवंत केलाय अॅलिस्टरनं. कधी कधी तर स्थल हे कॅमेराचा अँगल बनावं तसं साहित्यात काम करतं. किरण देसाई यांच्या ‘दि इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या अप्रतिम कादंबरीत कॅलिंगपाँग आहे. त्या गावचं ब्रिटिश हिल-स्टेशनचं रूपडंही आहे. पण पोलीस जेव्हा निरपराध गुरख्याला पोलीस चौकीत बदडतात तेव्हा लेखिकेनं त्या पोलीस चौकीत जाऊन वर्णन केलेलं नाही त्या प्रसंगाचं. ती वर्णिते डोंगरमाथ्यावरची उंच झाडं, खाली झुकलेलं आकाश आणि मग रप्दिशी सांगते की, त्या माणसाच्या किंकाळ्या दरीतून वर आल्या.. येत राहिल्या. कॅलिंगपाँगची ती दरी मग ढग वर येतात अशी गोंडस दरी राहत नाही! कथनाला ती दरी वेगळा आयाम प्राप्त करून देते. तशीच दुसरी दरी त्या एमिली ब्राँटेची. ‘वूदरिंग हाइट्स’मध्ये आढळणारी, रोरावणारा वारा अंगावर खेळवणारी ती उजाड ‘मूरलँड्स’! सैतानाचं कधीही आगमन होईल असं वाटणारं एमिलीचं सेटिंग. ते मराठीत तारा वनारसे यांनी ‘तीळा तीळा दार उघड’मध्येही उतरवलं आहे.
पण जरा हे सैतान वगैरे जाऊ दे; मला सुंदऱ्यांविषयी बोलू दे. ते माझ्या वयाला जास्त साजेसं आहे. हा आमचा भूषण कोरगावकर ‘संगीतबारी’ या त्याच्या पुस्तकात म्हणतोय- ‘‘बैठक साफ केली जाते. आधीच्या बैठकीच्या खुणा- पान, तंबाखू थुंकल्याचे डाग, दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची थोटकं, चहाचे ग्लास, एखाद् दुसरा निखळून पडलेला घुंगरू, तुटलेली बांगडी.. सगळं आवरलं जातं.’’ एका वाक्यात भूषण त्या लावणी नर्तकींचं स्थलभान वाचकाला देतो. त्यांची तुटलेली बांगडीच नव्हे, तर घरंगळलेल्या घुंगरासारखं जगणंही तो दाखवतो.
‘स्थल-अवकाश’ हा असा मोलाचा असतो साहित्यात, कलेत. कुठल्याही गीतांमध्ये तर खूपच. हे इर्शाद कामिलनं लिहिलेलं श्रेया घोषालचं ‘ले जा ले जा’ हे गाणं मी ऐकायला घेतोय. तितक्यात बेल वाजवत ‘टाटा स्काय’वाला आत येतोय. ‘‘सर, गच्चीत कुठे लावू या डिश?’’ त्याला तसं ‘सेटिंग’ करायचंय. मागे इर्शादचे शब्द सांगतात : ‘‘सारी रातों की.. कहानी कोई तो होगी; जो जागे तारें रातों में; याँ जागे जोगी!’’ त्या अद्भुत रात्रीत मी हलकेच पोचतोय. टाटा स्काय डिशवाला हसत खाली येतोय. त्याला डिशसाठी ‘स्थल’ मिळालंय. आणि मी मात्र ताऱ्यांना आणि योगी माणसालाही हलवून सोडणाऱ्या इर्शाद कामिलच्या रात्रीचा पत्ता शोधतोय. त्याचा ठाव मला पटकन् मिळत नाही. आणि त्याचं ‘सेटिंग’ही डिश अँटेनाइतकं सोप्पं नाही!
डॉ. आशुतोष जावडेकर ashudentist@gmail.com