मालमत्ता ही जरी अचल स्वरूपाची संपत्ती असली तरी मालमत्तेचे विविध कारणांमुळे हस्तांतरण होतच असते. मूळ मालकाचा मृत्यू झाल्यावर मृत्युपत्राद्वारे वारसांच्या नावे मालमत्तेचे हस्तांतरण, खरेदी-विक्रीद्वारे हस्तांतरण ही त्यापैकी काही मुख्य कारणे.

Japan moving closer to a future female empress_
जपानला महिला सम्राज्ञी मिळणार का? कायदा काय सांगतो?
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले

आता मालमत्ता हस्तांतरण म्हटले की त्याचे दोन मुख्य भाग येतात. पहिला भाग म्हणजे कायदेशेररीत्या हस्तांतरण आणि दुसरा म्हणजे प्रत्यक्ष ताबा हस्तांतरण. त्यातील पहिल्या कायदेशीर हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता करार कायदा आणि नोंदणी कायद्यातील तरतुदींची पूर्तता करणे अत्यावश्यक ठरते. मृत्युपत्र वगळता इतर सर्व प्रकारच्या करारांची नोंदणी ही अत्यावश्यक आणि बंधनकारकच आहे. मृत्युपत्राची नोंदणीदेखील बंधनकारक नसली तरी पुढच्या दृष्टीने विचार करता मृत्युपत्राची नोंदणी करणे नेहमीच इष्ट ठरते. मालमत्ता हस्तांतरण करण्याकरिता त्यासंबंधी रीतसर करार करून त्यावर रीतसर मुद्रांक शुल्क भरून त्याची रीतसर नोंदणी झाली म्हणजे मालमत्ता हस्तांतरणातील कायदेशीर प्रक्रिया बव्हंशी पूर्ण झाली असे म्हणता येते.

मृत्युपत्र किंवा कोणताही करार नोंदणीकृत करायची सर्वसाधारण पद्धत म्हणजे करारात सामील सर्व व्यक्तींनी स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयात करार सादर करून त्या करारास दुय्यम निबंधकासमोर मान्यता देणे. करारात सामील सर्व व्यक्तंनी स्वत: अथवा रीतसर कुलमुखत्यारपत्राद्वारे नियुक्त कुलमुखत्याराद्वारा उपस्थित राहून करारास मान्यता दिल्यावर कराराची नोंदणी करण्यात येते. अशा प्रकारे कराराची नोंदणी झाली की करारास कायदेशीरपणा प्राप्त होतो.

सर्वसाधारणपणे विचार केल्यास या प्रक्रियेत कठीण असे काहीच नाही, कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीस सहजपणे करता येईल अशी ही प्रक्रिया आहे. मात्र आपल्यापैकी काही व्यक्ती अशाही असतात ज्यांना शारीरिक आजार अथवा व्यंगामुळे घराबाहेर अथवा इस्पितळाबाहेर जाणेदेखील अशक्य असते, तर अशा व्यक्ती दुय्यम निबंधक कार्यालयात कशा येणार? आणि जर अशा व्यक्ती दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करू शकल्या नाहीत तर मग त्यांच्या करारांना कायदेशीरपणा कसा येणार?

याच समस्येचा विचार करून नोंदणी कायद्यामध्ये दस्त किंवा करार नोंदणीकरिता नोंदणी अधिकाऱ्यांच्या गृहभेटीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार नोंदणी अधिकाऱ्यास विशेष बाब म्हणून नोंदणीकरिता निवासस्थानी अथवा निक्षेपित ठिकाणी हजर राहून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येते.

या तरतुदीचा फायदा शारीरिक आजार अथवा व्यंग अथवा इतर काही समस्यांमुळे ज्यांना निबंधक कार्यालयात उपस्थित राहणे अशक्य आहे अशा व्यक्तींना होऊ शकतो. या तरतुदीचा फायदा घेण्याकरिता ज्या व्यक्तींना आपला करार अथवा मृत्युपत्र नोंदणीकृत करायचा आहे अशा व्यक्तींनी नोंदणी अधिकाऱ्यास रीतसर अर्ज करणे आवश्यक आहे. अशा अर्जात ती व्यक्ती नोंदणी कार्यालयात का उपस्थित राहू शकत नाही याबाबत स्पष्ट कारणे आणि शक्य झाल्यास त्याबाबतचे कागदोपत्री पुरावे जोडावेत. नोंदणी अधिकाऱ्याचे अर्जातील नमूद कारणाने समाधान झाल्यास नोंदणी अधिकारी निवासस्थानी गृहभेट देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतो.

कोणत्याही तरतुदींचा जसा वापर केला जातो तसाच काही वेळेस गैरवापरदेखील केला जातो, नोंदणीकरता गृहभेटीची तरतूददेखील याला अपवाद नाही. नोंदणी अधिकाऱ्याने गृहभेट देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यावर पक्षकारांच्या आपसातील वादामुळे नोंदणीस आक्षेप घेतला जातो, तसेच अर्जात नमूद ठिकाणी नोंदणी न करता इतरत्र झाली अथवा नोंदणीकरिता गृहभेट झालीच नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी झाल्या. परिणामी नोंदणी अधिकाऱ्यांना फौजदारी कारवाई आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले. याची दखल घेऊन राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांनी विशिष्ट परिपत्रकाद्वारे नोंदणीकरिता गृहभेटीसंदर्भात अनुसरण्याच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

या सूचनांनुसार गृहभेटीच्या अर्जावर अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटविणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच नोंदणी अधिकाऱ्यांनीदेखील गृहभेटीच्या विशेष कारणांची शहानिशा झाल्यावरच गृहभेटीची विनंती मान्य करावी, गृहभेटीदरम्यान अर्जदाराच्या खर्चाने सर्व कार्यवाहीचे दृक्श्राव्य चित्रीकरण करावे, चित्रफितीची लांबी आणि आकार कमीतकमी असण्याच्या दृष्टीने सर्व कार्यवाही अनावश्यक वेळ न घालविता पूर्ण करावी, असे चित्रीकरण अभिलेखात जतन करून ठेवावे, पक्षकारांनी नोंदणी अधिकाऱ्यांना चित्रीकरण ठेवण्याकरिता सीडी द्यावी, नोंदणी अधिकाऱ्यांनी सीडी क्रमांक, दस्त क्रमांक, तारीख, गृहभेटीचे ठिकाण, पक्षकाराचे नाव इत्यादी माहिती सीडीवर नमूद करावी, कार्यालयीन मिनिट बुकात चित्रीकरणाचा विशेष उल्लेख करून त्यात गृहभेटीच्या अर्जावरील सर्व माहिती नोंदवावी अशा सविस्तर सूचना करण्यात आलेल्या आहेत.

ज्या व्यक्तींना केवळ नोंदणी कार्यालयात उपस्थित राहणे अशक्य असल्याने त्यांच्या करार अथवा मृत्युपत्राची नोंदणी झालेली नाही अशा सर्वानी नोंदणी कायद्यातील गृहभेटीच्या तरतुदीचा फायदा घ्यायला हवा. तसेच नोंदणी अधिकारी गृहभेटीकरिता आल्यावर वरील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन होत आहे ना? याचीदेखील खात्री करून घ्यावी. म्हणजे आपला करार अथवा मृत्युपत्राची नोंदणी प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होईल.

tanmayketkar@gmail.com