धडपडय़ा मुलांचा बाप

सानेगुरुजींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक मधुसूदन विष्णू तथा मामा कौंडिण्य यांचे नुकतेच

डॉ. गिरीश कुलकर्णी - girish@snehalaya.org | February 3, 2013 12:32 PM

सानेगुरुजींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक मधुसूदन विष्णू तथा मामा कौंडिण्य यांचे नुकतेच निधन झाले.  प्राचार्य म्हणून काम करताना त्यांनी ‘मुक्तांगण’ सारखे अनेक अभिनव उपक्रम राबवले व अनेकांचे आयुष्य घडवले..
माझ्या अगदी लहानपणापासून मी मधुसूदन विष्णू तथा मामा कौंडिण्य या नावाचे गारूड ऐकत होतो. स्वातंत्र्यानंतर लगेचच अहमदनगर जिल्ह्य़ात डॉ. भा. पा. हिवाळे यांनी पहिले अहमदनगर महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयात अत्युत्तम दर्जाचे प्राध्यापक आणण्याची डॉ. हिवाळे यांची धडपड होती. त्यांना अर्थतज्ज्ञ आणि पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेचे अध्वर्यू डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या या शिष्योत्तमाची माहिती समजली. त्यामुळे नगरचे जावई असलेल्या मामांना त्यांनी अहमदनगर महाविद्यालयात अर्थशास्त्र शिकविण्यासाठी १९५८ साली रुजू करून घेतले. मामांनी १९६१ साली संगमनेर महाविद्यालयाची पायाभरणी करण्याची जबाबदारी घेऊन नगरचा निरोप घेतला.  मामांशी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचा एक व्यक्तिगत भावबंध होता. त्यामुळे मामांशी सर्वाचे जिव्हाळ्याचे नाते प्रत्येकाच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून होते.
मामांची राहणी अतिशय साधी, परंतु नेटकी होती. वर्गात वेळेआधी पाच मिनिटे मामा हजर असायचे. जे शिकवायचे त्याची पूर्वतयारी असायची. त्यामुळे पुस्तक घेऊन मामा अध्यापनासाठी कधीच उभे राहिले नाहीत. अर्थशास्त्र शिकविताना म. गांधी विचारधारेचा सखोल संदर्भ सतत असायचा. त्यांचे विभागप्रमुख डॉ. एस. के. हळबे यांच्यासोबत नगर येथे समाजकार्य महाविद्यालय सुरू करण्याबाबत मामांचा सतत संवाद आणि आग्रह होता. पुढे मामा संगमनेरला गेले. डॉ. हळबे यांनी नगरला हिवाळे संस्थेमार्फत समाजकार्य महाविद्यालय सुरू केले. नगरच्या रहिवासात मामा विद्यार्थ्यांना घेऊन त्या वेळच्या अमेरिकन मराठी मिशनच्या अनाथालयात, शासकीय बालगृहात नियमितपणे जात. येथील वंचित मुला-मुलींसाठी अभ्यासिका, संस्कारवर्ग, स्वत:चा सर्व पगार मामा या उपक्रमासाठीच खर्च करीत. या फकिरीत त्यांना विलक्षण मौज वाटे. येथील बालकांना भावनिक आधार आणि बळ देणारे उपक्रम करण्याची मामांची धडपड सर्वाना आजीवन प्रेरक ठरली.
संगमनेर येथे मामांनी जिवापाड मेहनत घेऊन विकसित केलेले महाविद्यालय त्यांची शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशीलता, दूरदृष्टी, विद्यार्थ्यांतून देशाचे कर्तव्यशील नागरिक घडविण्याची तळमळ, गांधीवादी जीवनमूल्य सार्वजनिक जीवनात टिकविण्याची अविरत धडपड यांची साक्षीदार आहे. मामांचा निकट संबंध महाराष्ट्र आणि देशातील पुरोगामी विचाराच्या सर्व कार्यकर्ते आणि चळवळींशी होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक), भास्करराव दुर्वे प्रतिष्ठान (संगमनेर), मुक्तांगण स्वायत्त विद्यापीठ, धनंजयराव गाडगीळ प्रतिष्ठान, अथश्री ग्रामीण विकास केंद्र (पुणे) आदी संस्थांचे मामा संस्थापक विश्वस्त आणि प्रवर्तक होते. शिक्षणप्रक्रियेतून सामाजिक परिवर्तन आणि विद्यार्थ्यांत सामाजिक जाणिवांची निर्मिती करण्यासाठी मामांनी आदिवासी, विडी कामगार, लहान शेतकरी, रामोशी-पारधी- धनगर आदी उपेक्षित भटक्या समूहांसाठी १५ सामाजिक प्रकल्प राबविले. या त्यांच्या कर्तृत्वाची मोहिनी माझ्या आणि स्नेहालयच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हृदयावर अधिराज्य करीत होती.
सेवाकार्यात एकमत हवे
मामांचा महाविद्यालयाच्या आवारात विलक्षण दरारा होता. महाविद्यालयात प्राचार्य कक्षात भेटल्यावर मामांना भेटण्याचा उद्देश सांगितला. ‘आम्ही मुले देहव्यापारातील बळी महिला आणि मुलांसाठी काही करू इच्छितो.’ हे ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरील भाव मृदू झाले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही एक तासाने घरी या. तोपर्यंत महाविद्यालयातील आमचे प्रयोग पाहा.’’ महाविद्यालयातील ‘कमवा आणि शिका’, छपाई कारखाना, रोपवाटिका आणि वनराई, जिमखाना, ग्रंथालय आदी पाहताना दोन तास गेले. मग मामांच्या घरी गेलो. मामांनी पहिलाच बॉम्ब टाकला. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला एक तासात बोलाविले होते. आता दोन तास झाले. सामाजिक काम करीत असाल तर दिलेली वेळ पाळली नाही तर चालते हे तुम्हाला कोणी सांगितले आहे का? येथूनच सुधारणेला प्रारंभ करा.’’
सर्वाना पोटभर जेवायला घातल्यावर मामा म्हणाले, ‘‘आता पोटभर बोला.’’ आम्ही करीत असलेल्या कामाबद्दल सांगितले. तेव्हा वेश्या वस्तीत आमचा सायंकालीन संस्कारवर्ग, रात्रसेवा केंद्र, कंडोमचा प्रसार, महिलांचे आरोग्य प्रकल्प आदी चालू झाले होते. या कामाने मामा विलक्षण प्रभावित झाले. प्रमुख अडचणी काय आहेत, असे त्यांनी विचारल्यावर आम्ही सांगितले, कार्यकर्ते, विशेषत: मुली आणि महिला लालबत्ती भागात सोबत काम करायला बिचकतात. त्यांना घरूनच विरोध होतो. या कामाला देणगीदार पुरेसे मिळत नाहीत. लोकांना वेश्या गुन्हेगार वाटतात. त्यामुळे त्यांच्याविषयी घृणा आणि तिरस्काराचा भाव आहे. मामांनी कामाचे आणि विषयाचे सर्व पैलू पाच तास देऊन समजावून घेतले. काम पाहायला येईन म्हणाले. काही मौलिक सल्ले त्यांनी आम्हाला दिले.
मामा म्हणाले, ‘‘वेश्यांचे आणि त्यांच्या संततीचे प्रश्न आणि त्यांच्याकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन हजारो वर्षे जुना आणि अन्यायकारक आहे. यासाठी चिकाटी ठेवून, आयुष्यभर नाउमेद न होता काम करण्याची तयारी ठेवा. यात एका बाजूला पुनर्वसनाची कामे, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक प्रबोधन आणि चळवळ करावी लागेल. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घ्यावे लागेल; परंतु ज्यांच्यासाठी काम करता त्या महिला आणि मुलांचा तुमच्या कार्यातील सहभाग मध्यवर्ती, महत्त्वाचा बनवावा लागेल. कधी तरी त्यांच्या प्रश्नांचे ओझे त्यांनाच उचलण्यासाठी सक्षम करणे, हा कामाचा दूरगामी उद्देश हवा.’’ त्यानंतर मामांनी नाबालाची तोपर्यंत आम्हाला माहिती नसलेली कथा सांगितली. वेश्येची संतती औरसच असते. त्या संततीचे बाप अनौरस असतात. परिस्थितीने, विवशतेमुळे, समाजात स्वीकृती नसल्याने किंवा जबरदस्तीने लालबत्तीत आलेल्या महिला गुन्हेगार नाहीत. त्यांना येथे आणणारे आणि त्यांच्याविषयी जाणून न घेता त्यांची घृणा करणारे गुन्हेगार आहेत, असे स्नेहालयने समाजाला ठणकावून सांगितले पाहिजे. त्यात मोघमपणा नको, हे मामांनी सांगितले. हे ऐकून आपण करतो ते चूक की बरोबर हा संभ्रम मिटला. स्नेहालयची एक वैचारिक भूमिका घडायला सुरुवात झाली. निघताना मामांनी सांगितले की, तुम्ही सर्व तरुण आहात म्हणून सांगतो. तुम्हाला एकत्र राहून काम करायचे असेल तर आपसात एकमत करूनच पुढे जा. बहुमताच्या बळावर संस्था प्रगती करणार नाही. मतभेद होऊ द्या. चर्चा होऊ द्या. शेवटी एकमत करा आणि मगच पुढे जा. एकमत झाले नाही तर ज्यावर एकमत आहे, त्याच गोष्टी करा. तुमची संघटना टिकली तरच काम उभे राहील. पैसे आल्यावर काम होत नसते, तर काम असले तरच पैसे आणि काम करणारे सेवाव्रती येतात, हे लक्षात असू द्या. तुम्ही कामाच्या मागे लागा. पैसा आणि साधने मागे येत राहतील. संस्थेत विश्वस्त म्हणून कोणीही आजन्म काम करायचे नसते. दर १० वर्षांनी पूर्ण नवी टीम हवी. जुन्या लोकांनी कार्यकर्ते म्हणून सक्रिय राहायचे, म्हणजे संस्थेचे थडगे होत नाही. स्नेहालयचे विश्वस्त होण्याचा आमचा आग्रह नाकारून मामा म्हणाले, ‘‘या कामासाठी तुम्ही पेटलेले तरुण शोधा. मी सोबत आहेच.’’ जाताना मामांनी रोख १५ हजार रुपये आणि वाचनालयासाठी २०० पुस्तके हातात ठेवली. कार्यकर्त्यांना नगपर्यंतचे एस.टी.चे भाडे म्हणून ५०० रुपये वेगळे दिले. आम्ही भारावलेल्या अवस्थेत आणि प्रचंड आत्मविश्वास घेऊन कामास जुंपलो. एका महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयात मामा आले. तेव्हा ते काम संपल्यावर थेट आमच्या जुन्या मंगळवार बाजारातील घरी आले. मला म्हणाले, ‘‘दाखव तुझे काम.’’ माझ्या आई-वडिलांना त्यांनी सांगितले की, स्नेहालयच्या कामामागे उभे राहून तुमचे जीवन अर्थपूर्ण आणि कृतार्थ झाले आहे. फारच थोडी मुले आपल्या आई-वडिलांना अशी भेट देतात. प्रथमच कोणी तरी मोठा माणूस आमचे काम पाहायला येत होता. आमची लगबग सुरू झाली. मामांनी चित्रा, भगत, नांगरे आणि ममता गल्लीतील वेश्यांशी हृद्य संवाद केला. स्नेहालयवर विश्वास ठेवलात तर तुमचे आणि पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल बनू शकते, हा मामांचा संदेश सर्वाच्या हृदयात झिरपला. मामांनी या महिलांकडून त्यांचे वेदनामय जीवन समजावून घेतले. त्यानंतर पुढील अखंड १९ वर्षे मामांनी स्नेहालयच्या कार्याचा आणि भावधारेचा समाजात प्रचार आणि प्रसार केला. नगर जिल्ह्य़ातील प्रत्येक वेश्यावस्तीत जाऊन त्यांच्या घरात आणि तेथील संस्थेच्या प्रकल्पात थांबून मामांनी बदलावर महिलांचा विश्वास बसविला.
दातृत्वाचा दीपस्तंभ
गांधी विचारधारेचा मामांवर प्रभाव होता. विशेषत: सत्य-अहिंसा, अपरिग्रह, विश्वस्त संकल्पना, साधेपणा, कृती आणि उक्तीतील एकत्व यांचा मामांच्या व्यक्तिमत्त्वात अनोखा मिलाफ होता. स्नेहालयला नगरच्या औद्योगिक वसाहतीत जागा मिळाली. तेव्हा आम्ही इमारत बांधून मग माझ्या घरातील स्नेहालय प्रकल्प स्थलांतरित करण्याची योजना आखली; परंतु मामांनी सांगितले की, आधी काम, मग इमारती होतात. जेवढे पैसे आहेत तेवढय़ात झोपडी बांधा, पण काम पहिले सुरू करा. आम्हाला त्यांनी पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे येथील डॉ. कालबाग यांच्या विज्ञान आश्रमात पाठविले. तेथून सामान आणून आम्ही कार्यकर्त्यांनीच श्रमदानाने एक डोम बांधला. त्यात मामांच्या आग्रहास्तव लालबत्तीतून मुले-मुली आणून काम सुरू केले. काम सुरू केल्याने कार्यकर्ते आणि देणगीदार यांचा ओघ सुरू झाला. मामांनी दिशा दिल्याने आमच्या डोक्यावर उभ्या असलेल्या सामाजिक कामाच्या या कल्पना पायावर उभ्या राहिल्या. दान नादान करते. म्हणून देणगीला ‘सहयोग’ म्हणण्याचा मामांचा आग्रह होता. सहयोग देणारा घेणाऱ्याला अथवा त्याचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांला उपकृत करीत नसतो, तर सहयोग देणाऱ्याचा विश्वस्त भाव व्यक्त करण्याची संधी त्याला संस्था किंवा कार्यकर्ते देत असतात, असे मामा मानत. त्यामुळे लक्षावधी रुपयांचा सहयोग सेवाकार्याला देणारे मामा आजन्म विनम्र आणि प्रांजल राहिले. १९९७ साली निवृत्त होताना मिळालेल्या पैशांतून मामांनी स्नेहालयला पाच लाख रुपयांचा सहयोग दिला. त्यातून मामांच्याच कल्पनेनुसार कृतज्ञता पुरस्कारांना सुरुवात झाली. या निधीत मामांनी दर वर्षी भर टाकली. आजवर २१८ सामाजिक कार्यकर्त्यांना आणि संस्थांना त्यांच्या सेवाकार्याबद्दल कौंडिण्य पुरस्कृत पुरस्कारांनी गौरविण्यात आले. आपला आर्थिक सहयोग त्यानिमित्ताने मामांनी विविध सेवाकार्याना दिला. आपले संगमनेरमधील घर-जागा विकून मामा पुण्याला राहायला गेले. जाताना जेवढे पैसे या व्यवहारातून मिळाले ते लोकपंचायत, स्नेहालय आदी संस्थांना मामांनी लगेचच वाटून टाकले. जे समाजाने दिले त्यातून गरजेपेक्षा जास्त जवळ ठेवणे हा समाजद्रोह असल्याचे मामा मानत. एवढेच नव्हे, तर मामांनी आपल्या संपर्काचा आणि विश्वासार्हतेचा वापर करून समाजातून विशेषत: नवोदित संस्थांना मोठे आर्थिक पाठबळ उभे करून दिले. पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवक रमाकांत तांबोळी यांना नगर येथे स्नेहालयसोबत आपल्या अनुभवाचा लाभ देण्यासाठी पाठविले. फासेपारध्यांची ५० मुले सांभाळणाऱ्या श्रीगोंदे येथील अनंत झेंडेंपासून एड्सग्रस्त मुलांना खांडगाव (ता. संगमनेर) येथे घर देणाऱ्या संतोष पवापर्यंत अनेकांचा समावेश आहे. मामांनी १९७२ च्या दुष्काळात १२०० विद्यार्थ्यांची छावणी चालवून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविले. त्यासाठी सरकारी पैसे मिळाले नाहीत, तेव्हा मामांनी स्वत:च्या नावे कर्ज काढले. कर्मवीर भाऊराव पाटलांचा त्यांच्यावरील प्रभाव अशा अनेक प्रसंगांतून व्यक्त झाला. मामा महाराष्ट्रातील असंख्य धडपडय़ा मुलांचे खऱ्या अर्थाने बाप होते. जुने विद्यार्थी भेटल्यावर ‘तुझी प्रगती उत्तम झाली, पण समाजासाठी तू काय केलेस किंवा करतोस, ते सांग,’ असे मामा विचारीत.
स्नेहालयच्या कामासाठी मामांनी संस्थेला नवी कोरी  गाडी घेऊन दिली. अडचणींच्या काळात मी ही गाडी विकेन म्हणून स्नेहालयचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी यांच्या नावावरही गाडी त्यांनी केली. डिझेलच्या खर्चाची तरतूद करून दिली. सहा महिन्यांपूर्वी आम्हा चार कार्यकर्त्यांचा शिक्रापूर येथे अपघात झाला. त्यात मामांनी दिलेल्या  गाडीचा चुरा झाला. ही गोष्ट मामांपासून आम्ही लपवून ठेवली. मामांचा पाच दिवसांनी फोन आला. ते म्हणाले, ‘‘अपघातातून सुखरूप राहिल्याबद्दल अभिनंदन. चांगल्या गाडीमुळे चार कार्यकर्त्यांचा जीव वाचला. हे बरे झाले. गाडीचे दु:ख करू नका. तुम्हाला आता एक इनोव्हा गाडी घेऊन देतो.’’
अण्णांच्या आंदोलनाबद्दल मामांना अतिशय ममत्व होते. स्व. नवलमल फिरोदिया आणि बाळासाहेब भारदे यांच्यानंतर अण्णांसाठी मामा हाच एक पितृतुल्य आधार होता. तरुण पिढीविषयी समाजाला आशावादी करण्यात मामांनी कोणतीही कसर सोडली नाही. ज्या संस्थांचे ते विश्वस्त होते, तेथे आपल्या परखड विचारांनी ते योग्य दिशा देत. गेली दोन वर्षे त्यांचे गुरू धनंजयराव गाडगीळ यांच्या नावाने ग्रामीण विकास प्रकल्प सुरू करण्याचा आग्रह ते मला करीत होते.  ताम्हिणी घाटातील आदिवासी मुलांसाठी शेवटची सात वर्षे अथश्री प्रतिष्ठानतर्फे मामांनी शैक्षणिक प्रकल्प राबविला. ते अखेपर्यंत समाजातील वंचितांसाठी कार्यरत होते. शेवटी डॉक्टरांना त्यांनी सांगितले की, माझे उपचार थांबवा. निर्थक जगणे मरणाहून भयंकर आहे. या पैशातून काही गरीब मुलांचे शिक्षण होईल. ठरविले असते तर त्यांनी अजूनही काही महिने अंथरुणावर काढले असते, परंतु निग्रहाने अन्नत्याग करून सावरकर- विनोबांच्या मार्गाने मामा मार्गस्थ झाले.

First Published on February 3, 2013 12:32 pm

Web Title: father of struggler boyes