४४-वर्धापनदिन विशेष अंक

तंत्रज्ञानाच्या बदलाचा झपाटा येत्या पाच-सात वर्षांत इतका प्रचंड असणार की ‘लाइफलाँग लर्निग’ ही संकल्पना केवळ पुस्तकात न राहता प्रत्यक्षात आणावी लागणार आहे.

समाज विकसित होत गेला तसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं; पण आज ज्या पद्धतीने तंत्रज्ञान विकसित होत आहे ते खूप वेगळं आहे आणि त्याचा वेगदेखील प्रचंड आहे. चाकाचा शोध, शेती करण्याचे तंत्र, अग्नीचा वापर ही अगदी सुरुवातीच्या काळातील तंत्रज्ञानाच्या विकासाची उदाहरणे म्हणता येतील; पण युरोपातल्या औद्योगिक क्रांतीने प्रचंड मोठय़ा प्रमाणात उत्पादनाला सुरुवात झाली. ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या त्या लोकांपर्यंत पोहोचणे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले. गटेनबर्गच्या छपाईतंत्रामुळे शिक्षणाचा प्रसार वाढला. शिक्षण, ज्ञान, माहिती सर्व स्तरांपर्यंत पोहोचू लागली. दळणवळणांच्या तंत्रविकासामुळे देशांतर्गतच नाही तर आंतरदेशीय पातळीवर ज्ञानाचा प्रसार वाढला. त्यापूर्वीदेखील ज्ञानाचे आदानप्रदान इकडून तिकडे व्हायचे. आपले गणिताचे शोध अरबांमार्फत युरोपात पोहोचले, युरोपातले इतर अनेक तंत्रज्ञान आपल्याकडे आले; पण हे मर्यादित प्रमाणात होते.

१९५०-६० च्या दशकातदेखील ही गती हळूच होती. तंत्रज्ञान विकसित होणं आणि समाजात रुजणं याला वेळ लागायचा; पण संगणकाचा प्रवेश झाल्यावर ही परिमाणं बदलत गेली. इथे तंत्रज्ञानाचं एक मोठं वैशिष्टय़ मुद्दाम नमूद करायला हवं. नव्याने आलेल्या तंत्रज्ञानाचा दोन-तीन वर्षांत कामाचा वेग वाढतो, आकार कमी होतो आणि खर्च कमी होतो. संगणक हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. संगणकाने आजच्या तंत्रज्ञानाला संपूर्णपणे व्यापून टाकलं आहे. अगदी छोटय़ा छोटय़ा आकाराच्या संगणकांनी साध्या साध्या यंत्रांचीदेखील संरचना पूर्णपणे बदलून टाकली. कारचंच उदाहरण घेतले तर एका कारमध्ये १००-१५० संगणक असतात हे आपल्याला माहीतच नसते. कपडे धुण्याच्या यंत्राचे उदाहरणदेखील नेहमीच्या वापरातले आहे. पूर्वीचे वॉशिंग मशीन कपडे केवळ एकाच दिशेत गोलगोल फिरवत असे. आज त्यात पाण्याचा वापर नियंत्रित करण्यापासून कपडे धुण्याच्या असंख्य सुविधा आल्या आहेत. मोबाइल क्रांतीमध्ये तर सर्वात मोठा सहभाग हा संगणकाच्या नॅनो टेक्नॉलॉजीचा आहे. १९८२ साली आलेल्या आयबीएम संगणकाच्या शतपट ताकदीचा संगणक आज आपल्या मोबाइलमध्ये आहे.

आज तंत्रज्ञान विकसित होण्याचा वेग वाढला आहे. या झपाटय़ामुळे समाजजीवन बदलले आहे आणि या बदलण्याचा वेगदेखील प्रचंड वाढला आहे. पूर्वी कोणतेही तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वेळ मिळायचा. एका पिढीने एक तंत्रज्ञान वापरले, तर दुसऱ्या पिढीत त्यापुढील नवीन तंत्रज्ञान वापरले जात असे. त्याच्या शतपट वेगाने आजचा समाज तंत्रज्ञान आत्मसात करतो आहे. केवळ व्यक्तीचं नव्हे तर समाजाचे सर्वच घटक. आपण पूर्वी जे काम करत होतो तेच मात्र वेगळ्या पद्धतीने आणि अधिक परिणामकारक पद्धतीने करत आहोत. त्यामुळे पूर्वी त्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी जो वेळ मिळायचा तो आता मिळणार नाही. इतक्या झपाटय़ाने हे तंत्रज्ञान बदलतंय आणि बदलत राहणार.

बँकिंग क्षेत्रातील बदल, रेल्वे आरक्षण, सरकारी कार्यालयांशी संबंधित कामं अशा अनेक सुविधा गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने विकसित झाल्या. हे केवळ संगणकामुळे नाही तर त्यांच्या जोडीला असलेल्या नेटवर्किंगमुळे साध्य होत आहे. या दोहोंचे एकत्रितरीत्या झालेले फायदे आता हळूहळू उलगडतात.

तंत्रज्ञानातील बदलांमुळे मानवी जीवन सुसह्य़ होतंय हे निश्चितच; पण आपल्याकडे मानवी जीवनाची वाटचाल जशी होती तशीच सुरू आहे. शिक्षण घेणार, त्यानंतर नोकरी करणार, तीही बहुतांशपणे पारंपरिक पद्धतीची असणार. ती कामं आता पूर्वीसारखी राहणार नाहीत, कारण त्यांची गरज नसेल.

तंत्रज्ञानाच्या या झपाटय़ामुळे समाजाचे पुढे काय, असा प्रश्न या पाश्र्वभूमीवर साहजिकच पडू शकतो. कोणते उद्योगधंदे करता येतील? कोणत्या नोकऱ्या मिळतील? असे अनेक उपप्रश्न त्यात दडलेले आहेत; पण आपल्याकडे यावर फारसा विचार होताना दिसत नाही. तंत्रज्ञान बदलाचा वेग इतका प्रचंड आहे की, आपली शिक्षण पद्धती त्या वेगाने बदलत नाही. नोकरी करण्याच्या, नोकरी निवडण्याच्या पद्धती, नोकरीसाठी योग्य उमेदवार निवडण्याच्या पद्धती यातदेखील तंत्रज्ञानाच्या वेगाने बदल घडत नाहीत. समाजासाठी सर्वात मोठा धोका कोणता आहे तर तो हाच आहे.

आजही पाचवी-सातवीच्या विद्यार्थ्यांना लिहिता येत नाही, दुसरी-तिसरीची गणितं करता येत नाहीत असे अहवाल आपल्या वाचनात येतात. हे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत. सर्वानी आवर्जून जी कौशल्यं विकसित करायला हवीत तेच आपल्याकडे होताना दिसत नाही. जर मूळ शिक्षणच अर्धवट राहिले तर जो पाया रचायचा आहे, जो आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारानेच रचला जाणार आहे, तो रचणे कठीण जाणार आहे. त्याची सुरुवात ही शालेय शिक्षणापासूनच झाली पाहिजे. त्यासाठी आपल्या शालेय शिक्षणात व्होकेशनल ट्रेनिंगचा समावेश झाला पाहिजे; पण अशा शिक्षणाची अपेक्षा समाजही करत नाही आणि शिक्षण देणाऱ्या संस्थादेखील त्या दृष्टीने प्रयत्न करत नाहीत. यापुढे असं दुर्लक्ष चालणार नाही. सध्याची शिक्षण पद्धती ढवळून निघाली पाहिजे. शालेय महाविद्यालयात काही मूलभूत गोष्टींचा सहभाग असणे गरजेचे आहे. संगणक वापरणे म्हणजे केवळ टेबलावरचा संगणक नाही तर संगणकाधारित सर्वच व्यवहार महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टीने जी जागरूकता निर्माण व्हायला हवी ती जागरूकता आपली शिक्षणपद्धती तयार करत नाही. यापुढे समाजाला पदोपदी नवीन तंत्रज्ञान वापरूनच काम करावे लागणार आहे. नवीन तंत्रज्ञान कसं वापरायचं याचं शिक्षण शालेय शिक्षणातच देणे महत्त्वाचं आहे.

दुसरं म्हणजे नेहमीच्या कामामध्ये तंत्रज्ञानाचा वापर. त्या त्या क्षेत्रात नेमके काय बदल होत आहेत ते आपल्याला आत्मसात करावेच लागतील. केवळ सरकारने प्रयत्न करून चालणार नाही, तर समाजाच्या प्रत्येक अंगाने त्याचा विचार करायला हवा.

या सर्व बदलत्या परिस्थितीत नोकऱ्या कशा असतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मधल्या काळात संगणक अभियांत्रिकीची प्रचंड हवा होती. मोठय़ा संख्येने अनेक जण कॉम्प्युटर सायन्स, इंजिनीअरिंगमध्ये गेले आहेत; पण आता तेवढी गरज नाही. ही कामं बंद होणार अशातला भाग नाही; पण या क्षेत्रातील नोकऱ्या स्टॅटिक होतील. मग एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आयटीमध्ये शिकत आहेत त्यांनी काय करायचे? तर त्यांना नवीन मार्ग शोधावे लागतील. स्मार्ट सिटीमध्ये अनेक संधी निर्माण होणार आहेत. इतकेच काय, तर अगदी छोटय़ा छोटय़ा ठिकाणीदेखील तंत्रज्ञानाधारित अनेक गरजा असतात. अगदी नव्याने येऊ घातलेल्या जीएसटीचे उदाहरण पाहता येईल. यापुढे डिजिटल अ‍ॅसेसमेंट केल्याशिवाय काही करता येणार नाही. मग या जीएसटीच्या अनुषंगाने जे काही बदल करायचे आहेत ही काम करण्याची संधी आपल्यापुढे आहे.

तंत्रज्ञानातील बदलांच्या अनुषंगाने समाजाचा विचार करताना शिक्षणात आणि पुढे येणाऱ्या व्यवसाय, नोकऱ्यांमध्ये नेमके काय बदल घडतील हे पाहणे महत्त्वाचं आहे. आपल्या पारंपरिक पद्धतीत शिक्षण संपले आणि नोकरी पकडली की इतिकर्तव्यता झाली अशी भूमिका असते. पुढील तीस-चाळीस वर्षे आरामात काढायची अशी आपली मनोभूमिका असते; पण भविष्यात असं चालणार नाही. आयुष्यभर शिक्षण घेत स्वत:ला अपडेट ठेवावं लागेल, कारण तुमच्या कामाच्या स्वरूपात तंत्रज्ञानामुळे दर पाच-दहा वर्षांनी बदल होत राहणार. त्यामुळे ‘लाइफ लाँग लर्निग/ एज्युकेशन’ ही संकल्पना केवळ पुस्तकात न राहता प्रत्यक्षात आणावी लागणार आहे. तुम्ही काम इमानेइतबारे करणं इतकीच पात्रता आता यापुढे असणार नाही. तुम्ही नवीन तंत्रज्ञानाशी कसे जुळवून घेता, नवीन काय करता, ही खरी पात्रता असणार आहे आणि आपल्या समाजाचा एक खूप मोठा भाग याकडे दुर्लक्ष करतोय हे दुर्दैवाचे आहे. असं होऊ नये म्हणून काय करावं लागेल? आपल्या कामाशी निगडित प्रशिक्षण तर हवेच, पण आठवडय़ातून किमान दोन तास तरी स्वत:ला अपडेट करण्यासाठी द्यावे लागतील. एखादा वसा घेतल्याप्रमाणे हे करावे लागेल. अनेक जण आठवडय़ातून एखादा दिवस उपवास करतात, तसे आठवडय़ातून किमान दोन तास जरी तुम्ही तंत्रज्ञानाच्या अपडेटसाठी दिलेत तरी सहा महिन्यांत तुमच्यामध्ये फरक जाणवू शकेल. अगदी आपल्या नेहमीच्या वापरातील मोबाइलमध्येदेखील बरेच शिकण्यासारखे असते. कॅमेरा, गाणी ऐकणे आणि सोशल मीडिया सोडला तर आपल्या मोबाइलमध्ये अनेक अ‍ॅप असतात. त्याची किमान ओळखदेखील आपल्याला नसते. म्हणूनच शालेय महाविद्यालयीन शिक्षणापासून तंत्रज्ञानाची योग्य ती ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे. जिद्द आणि शिस्त ही अंगीकारावी लागेल. सारं शिक्षण क्षेत्र ढवळून निघालं नाही तर मात्र तंत्रज्ञानाच्या बदलाचे वाईट परिणाम भोगावे लागतील.

तंत्रज्ञानामुळे समाजजीवनात नेमके काय बदल होतील यावर चर्चा करताना अनेकदा या बदलांची कल्पना करता येईल का, असा प्रश्न पडतो. थेटच सांगायचे तर हे बदल कल्पनेच्या पलीकडचेच असणार आहेत. आपल्याकडील बँकिंग व्यवहाराच्या बाबतीत आपण हे अनुभवतोच आहोत. आपण फार फार तर पुढील पाचेक वर्षांपर्यंतच्या बदलाची कल्पना करू शकतो. दहा वर्षांनतर या सर्व तंत्रांची उलथापालथ करणारं तंत्रज्ञान आलं तर काय होऊ शकते हे आत्ताच सांगता येणार नाही.

तंत्रज्ञानामुळे जगणं सोपं करणाऱ्याच घटना फक्त वाढतील, केवळ करमणुकीच्या गोष्टी वाढतील असादेखील एक सूर असतो. किंबहुना करमणुकीच्या गोष्टीतलं तंत्रज्ञान अगदी सहज वापरले जाते. पण आपण त्याचा कसा वापर करतो त्यावर ते अवलंबून आहे. आज व्हॉट्सअ‍ॅपचा वापर अगदी ग्रामीण भागातील लोकदेखील शुभेच्छा देण्यासाठी करतात. पण त्याच व्हॉट्सअ‍ॅपचा वापर जर नोकरी- व्यवसायाच्या अनुषंगाने केला तर? असा वापर झाला तर एखाद्या शेतकऱ्यालादेखील कळू शकेल की बाजारपेठेची काय परिस्थिती आहे. त्यानुसार तो मालाची वाहतूक करू शकेल. पण तशी मानसिकता अजून आपल्याकडे रूढ होताना दिसत नाही. आपल्या कामाच्या दृष्टीने तंत्रज्ञान कसं वापरावं यावर म्हणजे ते इंटरेस्टिंग होऊ शकेल हे आपल्याकडे शिकवलं जात नाही. आणि ते इंटरेस्टिंगपणे कसे शिकवावं याचीदेखील आपल्याकडे चर्चा होत नाही.

त्यामुळेच आपण तंत्रज्ञान कसे स्वीकारतो यावर बऱ्याच वेळा अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्या अनुषंगाने एक अत्यंत इंटरेस्टिंग उदाहरण सांगता येईल. ‘होल इन द वॉल’ असा एक प्रयोग सुब्रतो मित्रा यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी दिल्लीत केला होता. दिल्लीतील एका झोपडपट्टीमध्ये त्यांनी एका भिंतीत एक संगणक इंटरनेटला जोडून ठेवला. कसलाही फलक अथवा सूचना तेथे लिहिल्या नव्हत्या. सायंकाळपर्यंत काही मुलं त्या संगणकाशी खेळत होते आणि त्यांनी इंटरनेट ब्राऊजिंग सुरू केले होते. या मुलांपैकी अनेकजण शाळेतही गेले नव्हते, तर काही अर्धवट शाळा सोडलेले होते. यावरून त्यांनी काढलेला निष्कर्ष महत्त्वाचा आहे. ते सांगतात की, मानवाची जिज्ञासा आणि स्वीकारार्हता (अ‍ॅडप्टॅबिलिटी) ही किती मोठी असते की आपल्याला कल्पना येणार नाही. आपण या जिज्ञासेला आणि अ‍ॅडाप्टॅबिलिटीला वाव देत नाही, आपण त्याचे खच्चीकरण करतो. ती जेव्हा उभारून येईल तेव्हा माणूस काहीही आत्मसात करतो. त्यामुळे तंत्रज्ञानाची भीती वाटायची काहीच गरज नाही. एकदा त्याची बूज गेली की खुल्या दिलाने अंगीकारू लागलो, ती क्षमता प्रत्येकात आहे. त्याला उत्स्फूर्ततेची जोड हवी इतकेच.

तंत्रज्ञानातील बदल हे नवनव्या उत्पादनांना जन्म देतात. अर्थातच ते तंत्रज्ञान रुजवण्यासाठी मार्केटिंगचा वाढता मारा सुरू होतो. लोकांच्या सवयी बदलण्याची क्षमता या मार्केटिंगमध्ये अनेक वेळा असते. तेव्हा या बदलाला आपण कसे सामोरे जाणार हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यादृष्टीने पाहता उत्पादन करण्याच्या पद्धतीच आधी बदलल्या जातील हे लक्षात घ्यावे लागेल. मोठय़ा प्रमाणात उत्पादन तंत्रज्ञानाने शक्य करून दिले तसेच यापुढे व्यक्तीसापेक्ष उत्पादन मोठय़ा प्रमाणात (कस्टमाइज मास स्केलिंग) होणार आहे. टेलरमेड उत्पादन हे मोठय़ा प्रमाणात उत्पादन प्रणालीचाच भाग झाला असेल. आता लोकांच्या सवयी बदलल्या जातील. त्या चांगल्या की वाईट हे पाहावे लागेल. पण ते पुन्हा व्यक्तिसापेक्ष होईल. पण या मार्केटिंगवर आपल्याला हवं तसं सकारात्मक मार्केटिंग किंवा काऊंटर मार्केटिंग करता येऊ शकेल. त्याबाबतचा एका प्रयोगाचा मुद्दाम उल्लेख करावा वाटतो. नाशिकच्या ग्रामीण भागात सतीश अग्निहोत्री यांनी हा प्रयोग केला आहे. गर्भवती महिलांसाठी जे मार्गदर्शन करायचे ते व्हीडिओद्वारे करण्याची त्यांनी योजना केली. ते व्हीडिओ पाहिल्यावर त्या मार्गदर्शनावर आधारित काही परीक्षा घेतल्या. त्यादेखील ऑनलाइन. त्यात पास होणाऱ्यांना पंचवीस रुपयांचा टॉकटाइम मोफत देण्यात आला. तंत्रज्ञानाने केलेला हा सकारात्मक मार्केटिंगचा प्रयोग म्हणता येईल. आता हाच प्रयोग देशपातळीवर करण्याची योजना मांडली जात आहे.

तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या बदलांमध्ये काळजी वाटणारा एक भाग म्हणजे यापुढे तुमची गुप्त माहिती अशी फारशी असणार नाही. काही बाबतीत हा प्रकार म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ सारखाच आहे. कारण विविध कारणांसाठी तुम्ही ही माहिती आपणहूनच दिलेली असेल. पण हा प्रकार होणार आहे. मोबाइल, इंटरनेटच्या वापरातून तयार होणारा बिग डेटा म्हणजे ‘बिग ब्रदर इज वॉचिंग’ अशी स्थिती असेल. पण हा धोका आहे, की जमेची बाजू आहे अशा प्रकारे त्याची मांडणी करता येणार नाही. बिग डेटा हा या कार्यप्रणालीमध्ये आहे हे मान्य करावे लागणार. लोकांना त्याबाबत काळजी मात्र घ्यावी लागणार.

तंत्रज्ञानाच्या वापराने मानवी हस्तस्पर्श (ह्य़ूमन इलिमेंट) कमी होईल, अशी एक भीती कायम वर्तवली जाते; पण ती भीती पूर्णपणे चुकीची आहे. बँकांच्या व्यवहारासाठी संगणकीय प्रणाली तयार करताना आम्हाला त्याचा एक चांगला अनुभव आला होता. स्टेट बँकेसाठी संगणकीय प्रणाली विकसित करताना बँक युनियनने प्रचंड विरोध केला होता; पण ती प्रणाली वापरून पाहिल्यावर, बँकेचे व्यवहार संपल्यानंतर पाचव्या मिनिटाला ट्रायल बॅलन्स मिळू शकतो हे कर्मचाऱ्यांना कळले तेव्हा त्यांनीच युनियनला विरोध मागे घ्यायला सांगितला. आज उलट बँकिंग क्षेत्रात रोजगार वाढला आहे. एखादं काम करण्याची गरज संपेल, पण ती संपल्यानंतर नव्याने निर्माण होणारी दहा कामं करण्याचं सामथ्र्यही हवं. कॉल सेंटर, बॅक ऑफिस हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळेच मिळालेला रोजगार आहे. कामं कमी होणार नाहीत, कामं बदलतील आणि नवीन कामं ज्या संख्येत निर्माण होतील तेवढय़ा संख्येत कौशल्य असणारे लोक नसणार आहेत. त्यामुळे तुमची कौशल्ये त्यानुसार विकसित करावी लागतील. राहता राहिला प्रश्न विचार करणाऱ्यांचा. तंत्रज्ञानाच्या वापराने विचार करण्यावर मर्यादा पडतील की काय, अशी भीतीदेखील व्यक्त केली जाते; पण विचार करणे ही मानवाची स्वाभाविक प्रक्रिया आहे. कोणत्याही समाजरचनेत विचार करणाऱ्यांचे प्रमाण जेवढे असते तेवढेच ते बदलत्या तंत्रज्ञानातदेखील टिकून राहणार हे निश्चित.

तंत्रज्ञानाधारित स्मार्ट सिटीचा हल्ली बराच गवगवा होत असतो. अनेक वेळा हे दिवास्वप्न आहे की काय, असादेखील सूर लावला जातो; पण ते दिवास्वप्न नाही. अगदी साधं उदाहरण द्यायचे तर चंदिगड आणि नवी मुंबईसारखी नियोजित शहरे आणि पूर्वीची अनियोजित शहरं

शिक्षकांना शिकवण्यासाठी –

आयआयटी मुंबईने शिक्षकांना तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणामध्ये कसा करावा यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापूर्वी कौशल्य विकासासाठी काही ऑनलाइन उपक्रम आम्ही हाती घेतले होते. त्यानंतर पुढील तीन वर्षांत तंत्रज्ञान कसं वापरायचं याचे प्रशिक्षण द्या, असे सरकारनेच सांगितले आहे. त्यावरच आधारित टेन थाऊजंड टीचर्स प्रोग्राम हा उपक्रम आम्ही विकसित केला आहे. देशभरात ३०० दूरस्थ केंद्रे त्यासाठी निर्माण करण्यात आली आहेत. एक भली मोठी देशव्यापी क्लासरूम असे याचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे या वर्षी यासाठी सरकारी निधी नाही. तेव्हा आम्ही काही कंपन्यांच्या आणि माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निधी जमा केला. शिक्षण घेणाऱ्यांना पूर्वी मिळणारा भत्ता आता मिळणार नाही, असे सांगितले; पण तरीदेखील देशभरातून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी उपयोग आणि मेथडॉलॉजी फॉर ऑनलाइन अ‍ॅण्ड ब्लेन्डेड टीचिंग प्रोसेस असे दोन कोर्सेस सध्या आयआयटी मुंबई चालवते आहे. आता सरकारचे म्हणणे आहे की, केवळ इंजिनीअरिंगच नाही, तर इतर शिक्षकांपर्यंतदेखील हे पोहोचणे गरजेचे आहे.

प्रो. दीपक फाटक – response.lokprabha@expressindia.com