महाराष्ट्रातील इतर शहरांच्या इतिहासापेक्षा मुंबई शहराचा इतिहास वेगळा व मनोरंजक आहे. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स व पोर्तुगालची राजकन्या कॅथरिन यांच्या वाङ्निश्चयानिमित्त पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई बेट १६६१ मध्ये आंदण दिले. ईस्ट इंडिया कंपनीकडे जेव्हा या बेटाचा ताबा आला तेव्हा या बेटाची अवस्था अत्यंत वाईट होती. सात वेगवेगळ्या बेटांचा समूह असलेल्या मुंबईत त्या काळात खाडय़ा व जमिनीवर खारे पाणी साठून मोठय़ा प्रमाणात रोगराई पसरत असे. त्यामुळे दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडत असत. इंग्रजांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतही मुंबईच्या विकासाला प्रारंभ केला. या विकासाचा प्रवास अत्यंत खडतर परिस्थितीतून झाला. प्रथम इंग्रजांनी सात बेटांचा समूह असलेल्या मुंबईला एकसंध स्वरूप दिले. हळूहळू टप्प्याटप्प्याने मुंबई विकसित होत गेली. १९ व्या शतकाच्या अखेरीस मुंबई हे सुंदर वास्तुशैलीने नटलेल्या इमारतींचे समृद्ध शहर बनले. उद्योग व व्यापारात अग्रेसर असलेल्या या शहराने भारतातील प्रथम श्रेणीचे शहर होण्याचा मानही पटकावला.
१९०९ साली ‘गॅझिटिअर ऑफ बॉम्बे सिटी अ‍ॅण्ड आयलँड’ हे मुंबईविषयक गॅझिटिअरचे इंग्रजी भाषेतील तीन खंड प्रकाशित झाले. या गॅझिटिअरच्या दुसऱ्या खंडातील, सातव्या विभागातील मुंबईचा इतिहास मराठीमध्ये आणण्याचे काम जयराज साळगावकर यांनी ‘मुंबई शहर गॅझिटिअर’ या ग्रंथाद्वारे केले आहे. त्यामुळे मराठी वाचकांना मुंबईचा इतिहास सहजसाध्य झाला आहे.
गॅझिटिअर म्हणजे महत्त्वाच्या सर्वसमावेशक माहितीवर आधारित असलेले जिल्ह्य़ाचे, शहराचे व प्रदेशाचे विश्वसनीय दस्तावेज होय. इंग्रजांनी भारतातील प्रत्येक जिल्ह्य़ातील जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या भागातील माहितीचे अहवाल मागवून, त्याचे संकलन करून गॅझिटिअर तयार केली. १८६८ मध्ये मुंबई सरकारने गॅझिटिअर समितीची स्थापना केली. मुंबई इलाख्यातील प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या जॉन कॅम्पबेल यांना मुंबई इलाख्याची गॅझिटिअर संपादित करण्याची जबाबदारी देण्यात आली. कॅम्पबेल यांनी मुंबई इलाख्याच्या गॅझिटिअरचे काम १८७४ ते १८८४ या काळात केले व मुंबई इलाख्यातील अनेक जिल्ह्य़ांचे गॅझिटिअर प्रसिद्ध केली. परंतु मुंबई गॅझिटिअरला मात्र मुहूर्त मिळाला नाही. जॉन कॅम्पबेल यांनी अत्यंत विस्तृत असलेल्या मुंबई गॅझिटिअरसाठी मोठय़ा प्रमाणात माहिती संकलित केली होती. परंतु दरम्यानच्या काळात कॅम्पबेल आजारी पडल्यामुळे त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली व १८९८ मध्ये ते इंग्लंडला परत गेले. त्यामुळे मुंबई गॅझिटिअरचे काम लांबणीवर पडले.
एस. एम. एडवर्ड्स यांनी जॉन कॅम्पबेल यांनी संकलित केलेल्या मुंबई गॅझिटिअरमध्ये अनेक सुधारणा केल्या, तसेच या संकलनातील माहिती अद्ययावत व परिपूर्ण करण्यात आली. मुंबईतील अनेक अभ्यासकांकडून मुंबईविषयक माहितीची भर या गॅझिटिअरमध्ये घालण्यात आली. १९०९ मध्ये एस. एम. एडवर्ड्स यांनी संपादित केलेले ‘गॅझिटिअर ऑफ बॉम्बे सिटी अ‍ॅण्ड आयलँड’चे तीन खंड प्रकाशित करण्यात आले.
या जुन्या गॅझिटिअरची उपयुक्तता अद्यापि टिकून आहे. गॅझिटिअरमध्ये लोकसंख्या, अर्थव्यवस्था, इतिहास, चालीरिती, सण, समाजव्यवस्था, महत्त्वाची स्थळे इत्यादीची समग्र माहिती असते. महाराष्ट्र शासनाने ब्रिटिश काळातील गॅझिटिअरचे पुनर्मुद्रण केले आहे.
ब्रिटिश गॅझिटिअर दुर्मीळ असल्यामुळे मराठी वाचकांपर्यंत ती सहजगत्या पोहोचू शकत नव्हती. परंतु जयराज साळगावकरांच्या ‘मुंबई शहर गॅझिटिअर’ या ग्रंथामुळे आता वाचकांची ही गरज नक्की भागू शकेल. या ग्रंथात हिंदू कालखंड, मुस्लीम कालखंड व पोर्तुगीज कालखंड अशी पहिली तीन प्रकरणे असून, त्यानंतर ब्रिटिश कालखंडाची १६६१ ते १९०९ पर्यंतची एकूण सात प्रकरणे आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मुंबईतील ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचा परामर्श घेण्यात आलेला आहे. हिंदू कालखंडाच्या प्रकरणामध्ये मुंबईतील प्राचीन काळातील मूळ रहिवाशी, तसेच नंतरच्या काळात मुंबईत स्थायिक झालेल्या जाती-जमातींची उद्बोधक माहिती आहे. विशेष म्हणजे आपण जो ‘अठरापगड’ शब्दप्रयोग वापरतो, त्या जाती-जमातींच्या ७२ पगडय़ांच्या माहितीसहित दुर्मीळ चित्रे या प्रकरणात आहेत. मुंबई बेटावर राज्य करणारे मौर्य, चालुक्य, शिलाहार इत्यादींचा सत्तासंघर्ष या ग्रंथात आहे. मुस्लीम कालखंडात मुस्लिमांच्या आक्रमणामुळे बेटावर झालेले बदल तसेच प्रार्थनास्थळे यांची माहिती आहे. पोर्तुगीज कालखंडात मुंबई बेटाची स्थिती, करपद्धती, जमीनदारी, तत्कालीन चर्च यांचा इतिहास आहे. १६६१ मध्ये पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मुंबई बेट आंदण मिळाले. ईस्ट इंडिया कंपनीने येथे कारभार सुरू केल्यानंतर इंग्रजांना मुंबई बेटावर अनेक संकटांशी सामना करावा लागला. हळूहळू इंग्रजांनी या बेटावर आपली घडी बसवली. जेरॉल्ड अँजियर (१६७२-१६७७) या दूरदर्शी व धोरणी गव्हर्नरने मुंबई बेटावर न्यायसंस्था, संरक्षण व प्रजेच्या हिताची अनेक कामे केली. नंतरच्या काळात सिद्दी, मराठे, चाचे, मोगल, पोर्तुगीज यांचा उपद्रव मुंबईला सतत होत होता. हळूहळू मुंबईचा विकास सुरू झाला. मुंबईत जहाजबांधणीला सुरुवात झाली. न्यायालय, टाकसाळ, गोदी सुरू झाली. गव्हर्नमेंट हाऊस, कस्टम हाऊस, मरिन हाऊस अशा वास्तू उभ्या राहिल्या. समुद्रात व खाडय़ांमध्ये भराव टाकून अतिरिक्त जमीन उपलब्ध करण्यात आली. सात बेटांना जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. या साऱ्याचा तपशीलवार इतिहास मुंबई शहर गॅझिटिअरमध्ये आहे.
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या कार्यकाळात मुंबईत अनेक सुधारणा झाल्या. शिक्षणाचा प्रसार झाला. नंतरच्या काळात रुग्णालये व अनेक शैक्षणिक संस्था सुरू झाल्या. रेल्वेची सुरुवात झाली. बंदरांचा विकास झाला. व्यापार वाढला. बँका सुरू झाल्या. दलदलीच्या जमिनीवर भर टाकण्यात आली. समुद्र हटवून अतिरिक्त जमीन तयार करण्यात आली. अमेरिकन यादवी युद्धामुळे (१८६०-६५) मुंबईच्या कापसाला मागणी वाढली. पैशाचा ओघ मुंबईकडे वाहू लागला. मुंबईत आर्थिक सुबत्ता आली. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या कारकीर्दीत मुंबईत अनेक वास्तुशैलीतील दिमाखदार इमारती उभ्या राहिल्या. उद्याने, प्रशस्त रस्ते यामुळे मुंबईचे रूपच पालटले. अमेरिकन यादवी युद्धाच्या समाप्तीनंतर मुंबईत मंदीची प्रचंड लाट आली. या लाटेत मुंबईची अर्थव्यवस्था कोलमडली. परंतु थोडय़ाच काळात मुंबई सावरली आणि १९ व्या शतकाच्या अखेरीस ती पूर्वेकडील लंडन बनली! मुंबईच्या या साऱ्या इतिहासाचे ओघवते चित्रण ‘मुंबई शहर गॅझिटिअर’ या ग्रंथात आहे. मुंबईच्या या इतिहासाच्या जोडीला डॉ. जॉन फ्रेयर, ग्रँट डफ, गो. ना. माडगावकर, डॉ. कुन्हा, एस. एम. एडवर्ड्स, डॉ. एम. डी. डेव्हिड व इतर अभ्यासकांच्या ग्रंथांचे समग्र संदर्भ घेतल्यामुळे हा ग्रंथ अधिकच माहितीपूर्ण झाला आहे. या ग्रंथात मुंबई शहराची अनेक अत्यंत सुस्पष्ट व दुर्मीळ कृष्णधवल छायाचित्रे आहेत. या छायाचित्रांमुळे ग्रंथाचे सौंदर्य अधिक खुलले आहे.
या ग्रंथात माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनला दिलेली ‘इस्टुर फाकडा’ ही उपमा एल्फिन्स्टनच्या संदर्भातील नसून, ती वडगाव येथे झालेल्या इंग्रज-मराठा युद्धात धारातीर्थी पडलेल्या कॅप्टन स्टुअर्ट यांना दिली होती. तसेच एल्फिन्स्टनने महात्मा जोतिराव फुल्यांच्या सहकार्याने शैक्षणिक सुधारणा केल्याचे विधान योग्य नाही. कारण एल्फिन्स्टन व महात्मा फुल्यांचा कार्यकाल वेगवेगळा होता.
‘मुंबई शहर गॅझिटिअर’ हा मुंबई शहराच्या इतिहासाबद्दल असलेली वाचकांची उत्सुकता पूर्ण करणारा असा ग्रंथ आहे. ल्ल
‘मुंबई शहर गॅझेटिअर’- जयराज साळगावकर,
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,
पृष्ठे- २०७, मूल्य- २५० रुपये.
sambhajibhosale@yahoo.co.in

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..