गुन्हेगारी टोळ्यांकडून पूर्वीप्रमाणे खंडणीसाठी थेट दूरध्वनी येणे कमी झाले असले तरी खंडणी वसुलीची पद्धत मात्र आता पूर्ण बदलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खंडणीसाठी दूरध्वनी आल्यानंतर काही बिल्डर थेट पोलिसांकडे जात आहेत तर काही परदेशात जाऊन खंडणीची पूर्तता करीत असल्याची धक्कादायक बाब बाहेर आली आहे. याबाबत पोलिसांकडून अधिकृतपणे काहीही सांगितले जात नसले तरी काही अधिकाऱ्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला. पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही काही गडबड नको, म्हणून हा मार्ग अवलंबित असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाच्या आकडेवारीनुसार, सध्या खंडणीसाठी दूरध्वनी कमी येत असल्याचे दिसून येते. याचा अर्थ खंडणीसाठी दूरध्वनी येणे संपूर्णपणे बंद झाले असा अजिबात होत नाही. रवि पुजारी, एजाज लकडावाला, छोटा राजन वगळता सध्या कोणताही गुंड खंडणीसाठी धमक्यांचे दूरध्वनी करीत नसला तरी त्यांचे खंडणी वसुलीचे उद्योग सुखेनैव सुरू असल्याचे मतही एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.