देशात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून वयोगटही कमालीचा खाली आहे. पंचविशीतच तरुणांमध्ये मधुमेहाची सुरुवात दिसू लागली असून, ही गोष्ट चिंताजनक असल्याचे प्रतिपादन येथील मधुमेहतज्ज्ञ डॉ. वसंत कटारिया यांनी केले.
जागतिक मधुमेहदिनानिमित्त सिपला कंपनीच्या वतीने ३० वयोगटातील मधुमेहींसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. कटारिया बोलत होते. ते म्हणाले, जागतिक पातळीवर भारतात मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या आजाराचा जोर वयाच्या पस्तिशीनंतर दिसून येतो, मात्र भारतात पंचविशीतच टाइप दोनच्या मधुमेहाचे रुग्ण आढळतात. कौटुंबिक पाश्र्वभूमी, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे मधुमेह जडतो. त्यावर वेळीच योग्य नियंत्रण न ठेवल्यास हृदय, रक्तवाहिन्या, डोळे अशा अन्य अवयवांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. ते टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधोपचार नियमितपणे घेणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम व आरोग्यदायक आहाराद्वारेही मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.
नवनवीन संशोधन आणि आधुनिक औषधांमुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवणे तुलनेने सोपे झाले आहे. मात्र आजार जडल्यानंतर त्यावर इलाज करण्यापेक्षा तो होऊच नये याची काळजी घेणे गरजेचे असून ही गोष्ट प्रामुख्याने तरुणांनी लक्षात घ्यावी असे आवाहन डॉ. कटारिया यांनी केले.