मध्य रेल्वेवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला महागोंधळ संपून आता परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी प्रवाशांसाठी हे नेहमीचेच झाले आहे. मात्र एक अत्यंत धोकादायक व गंभीर प्रश्न मध्य रेल्वेच्या प्रवाशांसमोर उभा ठाकला आहे. मुंब्रा ते दिवा आणि कोपर ते डोंबिवली या दरम्यान खाडीमध्ये गेली काही वर्षे सातत्याने सुरू असलेल्या बेकायदा रेती उत्खननामुळे हा रेल्वेमार्ग पूर्णपणे खचून ‘न भुतो’ असा भयंकर रेल्वे अपघात भविष्यात घडण्याची शक्यता आहे.  
२६ जुलै २००५ रोजी झालेल्या ‘महाप्रलयात’ दिवा ते डोंबिवली या दरम्यानच्या रेल्वेमार्गाखालील भराव वाहून गेल्याने काही किलोमीटरचा रेल्वे मार्ग वाहून गेला होता. रेल्वे प्रशासननाने युद्ध पातळीवर काम करून हा मार्ग पूर्ववत केला होता. मात्र आता जर हा रेल्वेमार्ग वाहून गेला आणि मोठा अपघात झाला तर त्याासाठी केवळ आपणच जबाबदार असणार आहोत. गेल्या काही वर्षांत याच ठिकाणी मोठय़ा प्रमाणात बेकायदा रेती उत्खनन केले जात आहे. खाडीतील तिवरांचे जंगलही प्रचंड प्रमाणात नष्ट करण्यात येत आहे. बेकायदा रेती उत्खनन करणारी ही मंडळी आता रेल्वे मार्गापासून काही अंतरावर येऊन ठेपली आहेत. डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाताना दिवा रेल्वेस्थानक सोडल्यानंतर डाव्या बाजूला खाडीमध्ये मातीचा भराव टाकून चक्क रस्ता तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. याच ठिकाणी बेकायदा रेती उत्खननही केले जात आहे. येथेही तिवरांच्या झाडांची माती आणि मोठमोठे दगड टाकून कत्तल करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे. वृत्तपत्रे किंवा प्रसार माध्यमातून या विषयीच्या बातम्या आल्या की रेती उत्खननाच्या ठिकाणी धाड टाकण्याचे ‘नाटक’ केले जाते. दंड वसूल केला जातो, काही सामग्रीही जप्त केली जाते. पण हे फक्त काही दिवस टिकते. रेती उत्खननाचे काम सगळ्यांच्या नाकावर टिच्चून पुन्हा सुरू होते. यांत्रिक बोटी, पडाव आदींच्या सहाय्याने वाळू उपसा उघडपणे सुरू आहे.दररोज गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जे दिसते ते रेल्वे, पोलीस, जिल्हाधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांना का दिसत नाही? या मंडळीनी डोळ्यावर ‘अर्थ’पूर्ण कातडे पांघरले आहे, असा सवाल प्रवाशांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे करडय़ा शिस्तीचे आणि स्वच्छ प्रतिमेचे म्हणून ओळखले जातात. त्यांनी आता या प्रश्नात गंभीरपणे लक्ष घालावे आणि भविष्यातील धोका टाळण्यासाठी सर्व संबंधिताना ठोस कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा लाखो प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.