हल्ली वृत्तपत्र क्षेत्रात तत्त्व आणि तत्त्वज्ञान फारसे राहिलेले नाही. बातमी लिहिताना अनेक मर्यादा सांभाळाव्या लागतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केले. नाशिक येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या शाखेतर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आजची पत्रकारितेची परिस्थिती बदलली असून छापेल त्याचे वर्तमानपत्र असे त्याचे स्वरूप झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी नितीन केळकर, देवेंद्र भुजबळ, कवी आणि समीक्षक फ. मु. शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी ‘वाटचाल नव्या पर्वाकडे’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सवरेत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेत पारितोषिक मिळालेल्या सृजन (प्रथम), ग्रहबोली (द्वितीय), धमाल धमाका (तृतीय), वेदांतश्री (उत्तेजनार्थ) या अंकांना गौरविण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल पत्रकारांना पुरस्कार देण्यात आले.
सूत्रसंचालन संयुक्ता कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक व पत्रकार संघाच्या वाटचालीची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी दिली. यावेळी गौरविण्यात आलेल्या पुरस्कारार्थीमध्ये सुनंदन लेले (पुणे), चंदुलाल शहा (भ्रमर), भूषण करंदीकर (झी २४ तास), चंदन पवार (मुंबई), सचिन वाघ (दिव्य मराठी), संपदा देशपांडे (पुढारी), सचिन अहिरराव (महाराष्ट्र टाइम्स), शशिकांत सातपुते (पुण्यनगरी), वैशाली सोनार-शहाणे (देशदूत), पद्मा सोनी (लोकमत), रोहन दाणी (सी न्यूज) यांचा समावेश आहे. या शिवाय सामाजिक, राजकीय, उद्योग व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनाही गौरविण्यात आले.
पुरस्कारार्थीच्या वतीने नगरसेविका समिना मेमन  यांनी सत्काराला उत्तर दिले.