द्वितीय वर्षांतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कसलीही पुर्वसूचना न देता बंद केल्याबद्धल तंत्रनिकेतन विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनंतर आज दुपारी सोडले.
उपोषणार्थीमधील बहुसंख्य विद्यार्थी श्रीगोंदे येथील परिक्रमा शिक्षण संस्था तसेच बेलवंडी येथील तंत्रनिकेतनमधील होते. मात्र जिल्ह्य़ातील सर्वच तंत्रनिकेतनमधील द्वितीय वर्षांत थेट प्रवेश घेतलेल्या (आयटीआय, १२ वी शास्त्र उत्तीर्ण विद्यार्थी) विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती बंदची समस्या भेडसावते आहे.
मनोज घोडेकर तसेच योगेश, सागर, रोहन सरडे, दत्ता राऊत, निलेश गायकवाड आदी विद्यार्थ्यांनी उपोषणाचे नेतृत्व केले. सोमवारी दिवसभरात या विद्यार्थ्यांची दखलच घेतली गेली नाही. सायंकाळी मात्र अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी त्यांची भेट घेतली व उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच राहूल झावरे, नगसेवक निखिल वारे आदींनीही विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनाही उपोषण सोडण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिला. रात्रभर सर्व विद्यार्थी बसून होते. आज सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांच्या दालनात विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ व स्वत: डॉ. जाधव, समाजकल्याण अधिकारी यांच्यात चर्चा झाली. शिष्यवृत्तीचा प्रश्न मुंबईत सबंधित विभागापर्यंत पोहचवण्यात येईल असे लेखी आश्वासन या शिष्टमंडळाला देण्यात आले. त्यानंतर दुपारी विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवले.