मध्य आशियातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र असलेल्या शासकीय मेडिकल रुग्णालय व महाविद्यालयातील वसतिगृहांमध्ये दररोज दारूच्या पाटर्य़ा सुरू असल्याचे उघड होऊनही मेडिकल प्रशासनाची डोळेझाक सुरू आहे. मेडिकल रुग्णालयात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील गरीब रुग्ण मोठय़ा प्रमाणात उपचारासाठी येतात. गेल्या काही दिवसांपासून मेडिकल रुग्णालयाची वसतिगृहे म्हणजे रेव्ह पाट्र्याचा अड्डा झाली आहेत. काही विशिष्ठ डॉक्टर्स अशा पाटर्य़ाचे आयोजन करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
भारताच्या विविध भागांतून मेडिकलमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची चढाओढ असते. नागपूर, विदर्भ आणि राज्याच्या अन्य भागांतील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. रुग्णालय परिसरात विद्यार्थ्यांसाठी चार आणि मुलींसाठी दोन वसतिगृहे बांधण्यात आली आहेत. तर दोन किंवा तीन वसतिगृहांमध्ये निवासी डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या या भावी डॉक्टर्सनी रुग्णांचा इलाज करण्यापेक्षा अन्य विद्यार्थ्यांची झोप उडवून टाकली आहे. दारूच्या नशेतील डॉक्टरांची भांडणे रोजचीच झाली आहेत. रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांचे चेहरे आपसातील मारामारीत रक्तबंबाळ होऊन जातात. याची कल्पना वरिष्ठांना आणि प्रशासनाला देण्यात आल्यानंतरही डोळेझाक सुरू असल्याने अभ्यासू विद्यार्थ्यांचे जिणे कठीण झाले आहे. याचा परिणाम अभ्यासक्रमाच्या दर्जावर होत असून मुजोर भावी डॉक्टरांशी पंगा घेण्याची सध्यातरी कोणत्याही विद्यार्थ्यांची हिंमत नाही. तक्रार करणाऱ्याला वसतिगृहात राहणे मुश्किल केले जाते. दारू न पिणाऱ्याला प्रवेश दिला जात नाही, अशाही तक्रारी आल्या आहेत.
मेडिकल होस्टेलचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मुरारी सिंग यांच्याशी संपर्क साधला असता अशा कोणत्याही तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या नाहीत, असा दावा त्यांनी केला. होस्टेलच्या बाहेर दारू आणि बीअरच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. परंतु, अशा रेव्ह पाटर्य़ा चालत असल्याची तक्रार कोणीही केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.