पौराणिक नाटकांपासून सुरू झालेला मराठी नाटकांचा प्रवास आता विविध ज्वलंत विषयांवरील धाडसी नाटकांपर्यंत येऊन पोहोचला आहे. या प्रवासात नाटकाच्या जाहिरातीचे तंत्रही बदलले असून लवकरच येणाऱ्या ‘प्रपोझल’ या नाटकाच्या एका जाहिरातीमुळे तर नाटकांच्या जाहिरातींचा ‘पदर’ ढळल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या नाटकाचा विषय थोडा वेगळा असल्याने तो ‘वेगळ्या’ प्रकारे पोहोचवण्यासाठी अशा प्रकारे जाहिरात केल्याचे निर्माती कल्पना कोठारी आणि दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
सुरेश चिखले लिखित ‘प्रपोझल’ या नाटकाची जाहिरात रविवारच्या वृत्तपत्रांमध्ये छापून आली. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १५ डिसेंबर रोजी होणार आहे. ‘काचेचा चंद्र’, ‘सखाराम बाइंडर’ किंबा काही हिट अ‍ॅण्ड हॉट  नाटकांचा अपवाद वगळता मराठी नाटकांच्या जाहिरातींमध्ये एवढा धाडसीपणा आतापर्यंत आला नव्हता. या जाहिरातीनंतर नाटय़सृष्टीत उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या.
आमच्या पहिल्या जाहिरातीमुळे अशाच प्रकारच्या उलटसुलट चर्चा सुरू व्हाव्यात, अशी आमची इच्छा होती. नाटकाचा विषय अत्यंत वेगळा आहे त्यामुळे त्याची जाहिरातही अशाच वेगळेपणे व्हायला हवी होती, असे राजन ताम्हाणे यांनी स्पष्ट केले. ठाण्याहून सुटलेल्या आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या शेवटच्या ट्रेनमध्ये हे सर्व नाटक घडते. या नाटकात केवळ डॉ. अमोल कोल्हे आणि अदिती सारंगधर हीच दोन प्रमुख पात्रे आहेत. तर स्वत: ताम्हाणे यांची छोटीशी भूमिका आहे. या जाहिरातीत अश्लील असे काहीच नसून आम्ही केवळ प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा कल्पना कोठारी यांनी केला.
एखाद्या नाटकाचा विषय तेवढा ‘बोल्ड’ असेल, तर नाटकाची जाहिरात अशा प्रकारे करण्यास काहीच हरकत नाही. पण जाहिरात म्हणजे नाटकात काय असेल, याचा सारांश असतो. त्यामुळे तुम्ही जाहिरातीत दाखवलेल्या गोष्टी नाटकात नसतील, तर प्रेक्षक नाटकाकडे पाठ फिरवतात. ‘प्रपोझल’ नाटकाची पहिली जाहिरात उत्सुकता चाळवणारी असली, तरी त्यांच्या दुसऱ्या जाहिरातीमुळे संभ्रम निर्माण होतो, असे ‘नाटय़संपदा’च्या अनंत पणशीकर यांनी सांगितले.    
याआधीच्या ‘बोल्ड’ जाहिराती
‘काचेचा चंद्र’ हे नाटक फारसे यशस्वी झाले नाही, हे पाहून त्या नाटकाची जाहिरात काहीशी बदलण्यात आली. या जाहिरातीत डॉ. श्रीराम लागू हे भावनाला खांद्यावर घेऊन जात आहेत, असे दाखवले होते. त्या काळी या जाहिरातीची चर्चा झाली होती. ‘सखाराम बाइंडर’च्या जाहिरातीतही निळू फुले यांनी लालन सारंग यांना आपल्या मांडीवर खेचले आहे आणि त्यांच्या घशात ते दारू ओतत आहेत, असे चित्र होते. या जाहिरातीवरून गदारोळ झाला होता.