लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पालिकेने लावलेला नागरी कामांचा सपाटा काहीसा थंडावला असल्याचे चित्र असून मागील दोन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली नागरी कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता असल्याने येत्या अडीच महिन्यांत सुरू करण्यात आलेली नागरी कामे कितपत पूर्ण होतील याबाबत चर्चा केली जात आहे. यात ऐरोली, बेलापूर, आणि नेरुळ येथील नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. आरोग्याशी निगडित ह्य़ा सुविधा लवकर सुरू व्हाव्यात अशी मागणी केली जात आहे. ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनालादेखील केव्हा मुहूर्त मिळणार, असा प्रश्न दलित चळवळीतील कार्यकर्ते विचारत आहेत.
मे व सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या आाचारसंहिता लागण्यापूर्वी नवी मुंबईत नागरी कामांच्या शुभारंभाचे शतक ठोकण्यात आले होते. काही प्रकल्प लोकार्पणदेखील करण्यात आले असून यात पालिका मुख्यालयाचा मोठा प्रकल्प मानला जातो. मुख्यालयाचे उद्घाटन व्हावे यासाठी माजी खासदार संजीव नाईक आग्रही होते. त्यासाठी मुख्यालयाची अनेक छोटी-मोठी कामे अर्धवट ठेवण्यात आल्याने ती आतापर्यंत पूर्ण केली जात आहेत. त्यानंतर नेरुळ येथील वंडर पार्कचेदेखील अशाच प्रकारे घाईघाईत उदघाटन आटपण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पाची दशा नागरिकांना पाहण्यास मिळत असून हा वंडर पार्क आता थंडर पार्क झाला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारंसहिता लागण्याअगोदर तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उद्घाटनांचा बार उडवून दिला होता. त्याचा फायदा माजी मंत्री गणेश नाईक व आमदार संदीप नाईक यांना होणार होता. तो केवळ आमदार संदीप नाईक यांना झाला. विधानसभेच्या या वाहत्या गंगेत सत्ताधारी नगरसेवकांनीदेखील हात धुऊन घेतले. आपल्या प्रभागातून मतदानाचे मताधिक्य मिळवून देण्याच्या बोलीवर या नगरसेवकांनी नाईक पिता-पुत्रांकडून प्रभागातील कामे करून घेतली. त्यात लाखो रुपयांच्या खासगी कामांचा समावेश आहे.
काहींनी उमेदवारांच्या पैशावर देवदर्शनाच्या यात्रा काढल्या. लोकसभा विधानसभा निवडणुकीत आपली तजवीज करून ठेवलेल्या नगरसेवकांना आपल्या निवडणुकीसाठी नागरी कामेच शिल्लक राहिलेली नाहीत. त्यामुळे मागील आठवडय़ातील स्थायी समिती तशी कोरडीच गेली. मागील सहा महिन्यांतच खूप मोठय़ा प्रमाणात नागरी कामे काढण्यात आली असून त्यातील काही कांमांचा केवळ शुभारंभ झाला असून त्यानंतर ती ठप्प झाल्याचे चित्र आहे. यात ऐरोलीतील नाटय़गृहाच्या कामात माशी शिंकल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरी कामांचा बार थंडावला असून सुरू करण्यात आलेली कामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.