महाराष्ट्रात सुमारे ३५० किल्ले अस्तित्वात असून अनेक किल्ल्यांची अवस्था दयनीय झाली आहे. किल्ल्यांचे संरक्षण आणि पुनरूज्जीवनासाठी शासनाने मंत्रालयात स्वतंत्र विभाग निर्माण करावा, अशी मागणी करून छावा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण यांनी यासाठी संघटनेतर्फे लवकरच आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी सामाजिक कार्याची आवड असलेल्या राजेंद्र पवार यांची महाराष्ट्र छावा संघटनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती जाहीर केली. यावेळी सत्काराला उत्तर देताना पवार यांनी १५ वर्षांत आपण जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे केल्याचा उल्लेख केला. यापुढेही ही कामे सुरू ठेवून समाजाच्या विकासासाठी अहोरात्र झटण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. छावा संघटनेच्या नांदगाव तालुका ग्रामीण उपप्रमुखपदी सुभाष लभडे, रवींद्र उगले आणि बापू जाधव तर मनमाड शहर उपप्रमुखपदी सतीश हरकल, गणेश पगार, विकास पुणेकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
नांदगाव तालुका प्रमुख सुधाकर पवार, ग्रामीण जिल्हा प्रमुख संजय नाठे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी नांदगाव तालुका छावा संघटनेतर्फे रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.