यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले अध्यासनाच्या वतीने ‘कायदा, महिला व समाज’ या विषयावर अॅड. अंजली पाटील यांचे व्याख्यान झाले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे अध्यक्षस्थानी होते. समाजात समानतेकडे नेणाऱ्या ध्येयांची, कायद्याची ज्यांना माहिती नाही अशा महिलांचे प्रमाण जास्त आहे. कदाचित हीच अनभिज्ञता कायद्याची जरब बसविण्यात कमी पडते. त्यामुळेच समाजात अनेकांचा रोज बळी पडतो. स्त्री-पुरुष समानतेचे संस्कार जर घरातून मिळाले तर माणूस माणसासारखा वागेल आणि सकारात्मक दृष्टीने समाज परिवर्तन घडण्यास निश्चितच वेग मिळेल, असा विश्वास अॅड. पाटील यांनी व्यक्त केला. कोणत्याही अत्याचाराचा अतिरेक होण्यापूर्वीच महिलांनी विविध कायद्यांतर्गत मिळणाऱ्या सुरक्षेचा लाभ घेतला पाहिजे. जेणेकरून तिचा उल्लेख पीडित, अबला असा होणार नाही, असे म्हणाल्या. या वेळी त्यांनी वारसा हक्क, विवाह, दत्तक विधान, कौटुंबिक हिंसाचार, विशाखा कायदा याबाबतही त्यांनी माहिती दिली. डॉ. अतकरे यांनी सुसंस्कारित वातावरणाची निर्मिती शिक्षणाच्या माध्यमातूनच होऊ शकते असे सांगितले. सावित्रीबाई फुले अध्यासनाचे समन्वयक प्रा. प्रवीण घोडेस्वार यांनी अध्यासनाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन माधवी धारणकर यांनी केले.
पुणे विद्यार्थिगृहाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय
पुणे विद्यार्थिगृहाच्या नाशिक येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुभाष पाटील यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पंचवटी सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह नथुजी देवरे हे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम रायते यांनी प्रास्तविक केले.
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणासाठी दिलेले योगदान आजही वादातीत आहे. त्याचा आदर्श घेऊन आजच्या काळात स्त्रियांचा सन्मान होणे अत्यावश्यक असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. देवरे यांनीही अध्यक्षीय भाषणात विद्यार्थी व शिक्षकांना विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्त्री-शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थिनींनी स्त्री-मुक्तीवर आधारित समूहगीत सादर केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. अमिता काळे यांनी केले. आभार विद्यार्थी प्रतिनिधी निशा कुंवर यांनी मानले.
डॉक्टर हाऊसमध्ये प्रतिमापूजन
नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन शेलार यांच्या वतीने डॉक्टर हाऊस येथील कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मान्यवरांकडून सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा देण्यात आला. स्त्री-भ्रूणहत्या, स्त्रियांवरील वाढते अत्याचार याविरोधात पुरुषांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता स्त्री-संघर्षांत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी गजानन शेलार, शकुंतला शिरसाठ, सुनील कोथमिरे, संजय टिळे-पाटील आदी उपस्थित होते.

व्याख्यान, प्रतिमापूजन, गुणगौरव, वक्तृत्व स्पर्धा, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून शहर व परिसरात शैक्षणिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. त्याचाच हा वृत्तान्त.

उन्नती विद्यालयातर्फे शिक्षण दिंडी
पंचवटीतील उन्नती प्राथमिक विद्यालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शिक्षण दिंडी काढण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी केले. दत्तनगर, फुलेनगर, रामनगर, नवनाथनगर, रोहिणीनगर या परिसरातून शिक्षण दिंडी व स्त्री-भ्रूणत्येविरोधी जनजागृती करण्यात आली. मुलगी शिकली, प्रगती झाली, समाजरूपी गाडा चालावयाचा असेल तर स्त्री-भ्रूणहत्या थांबलीच पाहिजे, मुलगी हीच वंशाचा दिवा, सावित्रीने केली कमाल, शिक्षणाची पेटविली मशाल, अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.
वैदू समाज संस्था
आगर टाकळी येथे अखिल महाराष्ट्र वैदू समाज संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष साहेबराव पवार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. महिलांचे सबलीकरण व्हावे व शिक्षण घेऊन सुसंस्कृत बनावे, ही विचारधारा प्रत्येकाने आचरणात आणावी, असे प्रतिपादन पवार यांनी केले.  याप्रसंगी समाजाचे मार्गदर्शक दशरथ हाटकर, रामचंद्र लोखंडे, अशोक जाधव, शामलिंग शिंदे, अमृता पवार, प्रदीप गुडे, राजू वैदू, पिंपरी चिंचवडचे नगरसेवक राजू लोखंडे आदी उपस्थित होते.