हल्ले रोखण्यासाठी महिलांनी मिरपुड अथवा चाकू बाळगण्याचे सल्ले खुद्द पोलीसही देऊ लागले असतानाच अलंकार म्हणून प्रचलित असणाऱ्या हातच्या कंकणातच सायरन बसविण्याचा प्रयोग अंबरनाथ येथील एका शिक्षिकेने यशस्वीपणे राबविला आहे. संकटात असणाऱ्या महिलेने या बांगडीवरील बटन दाबताच सायरानचा आवाज होणार आहे. त्यामुळे त्या महिलेस मदत मिळण्यास मदत होईलच, शिवाय अचानक सायरनचा आवाज झाल्याने हल्लेखोर घाबरून पळून जातील.
अंबरनाथ येथील सुहासिनी अधिकारी प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुचिता सपकाळ यांनी ही अनोखे सायरन बांगडी तयार केली आहे. याकामी त्यांना त्यांचा अभियंता असलेला मुलगा शैलेश, सूर्यकांत चौगुले आणि विनायक धुरी यांनी मदत केली. अशा प्रकारची एक सायरन बांगडी तयार करण्यासाठी ३५० रुपये खर्च येतो. विशेष म्हणजे सुचिता सपकाळ त्यांच्या वर्गातील विद्यार्थिनींनाही अशा प्रकारच्या बांगडय़ा बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत.