नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी शासकीय कार्यालये व आरोग्य संस्थेच्या दर्शनी भागात ‘थुंकण्यास तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास मनाई आहे’ अशा आशयाचे फलक लावण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढले असून या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावे, असेही त्यात म्हटले आहे. यापूर्वीही शासनाने सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट सुपारी यांची निर्मिती, साठवण व विक्री करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश काढले होते. या आदेशाचा फज्जा उडाला असतानाच आता पुन्हा फलक लावण्याचे आदेश काढण्यात आले आहे. या नव्याने काढलेल्या आदेशाचे नागरिक किती आणि कसे पालन करतात, हे लवकरच दिसून येणार आहे.
या आदेशान्वये सर्व शासकीय कार्यालयांप्रमाणेच शासकीय आरोग्य संस्थामध्ये तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करू नका, असे फलक लावले जाणार आहे. यामध्ये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, संदर्भ सेवा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, क्षयरोग, कुष्ठरोग रुग्णालये व रुग्णालयीन कार्यालयांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांची सचित्र माहिती दर्शवणारे पोस्टर्स देखील लावले जाणार आहे. फलक व पोस्टर्स लावण्यासोबतच मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ११६ नुसार अंमलबजावणी करावी, असेही आदेशात म्हटले आहे.  
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर आणि थुंकण्यावर प्रतिबंध असला तरी आणि त्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होत असली तरी, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे आणि धूम्रपान करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही. थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होते, तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. क्षयरोग, स्वाईन फ्ल्यू, न्यूमोनिया यासारख्या आजारांचा फैलाव थुंकीमार्फत होतो. केंद्र शासनाच्या सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन २०१२ च्या वार्षिक अहवालानुसार देशातील ३ दशलक्ष लोक क्षयरोगाने पीडित आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील ७५ हजार ३१९ लोकांचा समावेश आहे. क्षयरोगांमुळे भारतातील ३ लाख लोक मृत्यूमुखी पडले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील मृतांची संख्या ६ हजार ६९२ इतकी आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांमध्ये तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थ चघळून थुंकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सव्‍‌र्हे इंडिया-२००९-१० च्या सर्वेक्षणानुसार देशातील २५.९ टक्के नागरिक धूररहित तंबाखूचे सेवन करतात. त्यामध्ये पुरषांचे प्रमाण ३२.९ टक्के आणि महिलांचे प्रमाण १८.४ टक्के एवढे आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण २७.९ टक्के आहे. त्यात पुरुषाचे प्रमाण ३५.३ आणि महिलांचे प्रमाण १८.९ टक्के आहे. तंबाखूजन्य पदार्थ अथवा पान चघळून थुंकल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी भिंती लाल होऊन सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होणे, विद्रूप झालेल्या भिंती पुन्हा पुन्हा रंगवण्यासाठी जनतेवर कर रूपाने दिलेला पैसा खर्च करणे शासनाला भाग पडते. तंबाखू सेवन करून थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होतेच, पण त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन कर्करोग, श्वसनाचे आजार, पुनरुत्पादन संस्थेचे आजार, पचनसंस्थेचे आजार यासारख्या प्राणघातक आजारांची लागण होते.
दरवर्षी जगातील सुमारे ६० दशलक्ष लोकांचा मृत्यू तंबाखूसेवनामुळे होत असून तंबाखू सेवन जगभरातील बऱ्याच आजारांचे आणि मृत्यूचे कारण आहे. सन २०१० च्या पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रातील सुमारे ३१.४ टक्के लोकांचा मृत्यू तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबई पोलीस अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.