डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर नि:शुल्क ‘वाय-फाय’ सेवा सुरू झाली आहे.
या सेवेचा लाभ विमानतळावरील प्रवाशांना घेता येणार आहे. मिहान इंडिया लिमिटेडने बीएसएनएलच्या सहयोगाने ही सेवा प्रदान केली असून, आज या सुविधेचे उद्घाटन मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, बीएसएनएलचे संचालक (महाराष्ट्र व गोवा) आर.एन. पटेल यांच्या हस्ते झाले.
स्मार्ट फोन आणि टॅबलेट वापर करणाऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे इंटरनेट सेवा काही काळाची गरज आहे. मिहान इंडियाने ‘वाय-फाय’ सेवा निशुल्क प्रदान करणार आहे, असे सत्रे म्हणाले.
भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून ऑगस्ट २००९ मध्ये विमानतळ हस्तांतरित झाले. तेव्हापासून या विमानतळावर प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यात बालकांची निगा राखण्यासाठी कक्ष, मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवासी प्रतीक्षालयाच्या परिसरात दूरदर्शन संच बसवण्यात आले.
दोन क्रमांकाचे ‘एअरोब्रिज’ सुरूकरण्यात आले. हॉटेलच्या बुकिंगसाठी काऊंटर सुरू करण्यात आले. गरजू प्रवाशांच्या मदतीसाठी जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. तसेच अन्नपदार्थाचे दुकान, उपाहारगृह सुरू करण्यात आले. विमानतळाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही आणि सौर कुंपण घालण्यासंदर्भात पावले टाकण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.