गणपतीबाप्पांना निरोप दिल्यानंतर तरुणाईला वेध लागतात ते नवरात्रीचे. याच काळात परीक्षांचा ताणही मनावर असतोच पण तरीही परीक्षेआधीच्या या नऊ रात्री म्हणजे मनाला नव्याने उभारी देण्याचा आनंदसोहळाच असतो. या नऊ रात्रींमध्ये कुठे कुठे जायचे, पेहराव कोणता करायचा, कुठल्या मैदानात टिपऱ्यांसह ठेका धरायचा, या चर्चा कट्टय़ा-कट्टय़ांवर रंगू लागतात. तरुणाईच नव्हे तर नोकरदारही यात मागे नसतात. मग कोणता दिवस रजेसाठी कसा ‘अ‍ॅडजस्ट’ करायचा आणि दांडीयासाठीच्या या दांडीचे कारण काय सांगायचे, याचेही नियोजन सुरू होते!
नेहमीप्रमाणे यंदाही मुंबईमधील काही ठराविक नवरात्रौत्सव मंडळांचे पासेस आणि त्यासाठी लागणाऱ्या जास्तीचा पॉकेटमनी मिळवण्याची धडपडही सुरु झाली आहे. मुंबईमधील सर्वात लोकप्रिय नवरात्री पंडालांमध्ये पहिला नंबर लागतो तो म्हणजे, गोरेगाव येथील ‘संकल्प दांडिया नवरात्री ग्रुप’चा. फाल्गुनी पाठक आणि राहुल वैद्य यांचा बॅण्ड हे या नवरात्री ग्रुपचे खास आकर्षण असते! या पंडालाच्या तिकिटांचे दर साधारणपणे ३००ते ५०० रुपयांच्या आसपास आहेत आणि दहा दिवसांचा पास २५०० रुपयांपर्यंत आहे.
‘प्रीती आणि पिंकी’ यांच्या नवरात्री पंडालालासुद्धा बरीच गर्दी असते. यावेळीत्यांच्या पासेसचे दर सुद्धा १०० रुपयांपासून सुरु आहेत. त्याचसोबत बोरीवली येथील ‘कोरा केंद्र, नवरात्री महोत्सव’च्या तिकीटांचे दर ३५० ते ४५० रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी या पंडालामध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे चित्रीकरण झाले होते. यंदाही तेथे सेलेब्रिटीजची हजेरी असण्याची शक्यता आहे. याशिवाय ‘एस्सेल वर्ल्ड’ येथे होणारा दांडिया, ‘भूमी त्रिवेदी’चा दांडिया, ‘वाधवा रास’ इत्यादी नवरात्री पंडालसुद्धा प्रसिद्ध आहेत. यांच्याकडील तिकीटांचे दर १००-४०० रुपयापर्यंत असतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक सेलेब्रिटीज या पंडालांना भेटी देणार आहेत. दूरचित्रवाणी वाहिन्या आणि चित्रपटांतील कित्येक कलाकारांना नवरात्रीच्या निमित्ताने आपापल्या मालिकांचे आणि चित्रपटाचे प्रमोशन करण्यात रस असतो. विविध गृहनिर्माण संस्थासुद्धा पंडाल बाधून ठेका धरण्यासाठी सज्ज आहेत.    
नवरात्रौत्सवासाठी खास कपडय़ांच्या खरेदीसाठीही तरुणाईची लगबग सुरू आहे. पारंपरिक घागरा आणि केडियांनी बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. ज्यांना पारंपरिक पोशाखाच्या पुढे जाऊन कपडय़ांमध्ये थोडे बदल हवे असतील, त्यांच्यासाठी खास स्कर्ट्स, कुर्तीजचा पर्यायसुद्धा बाजारात उपलब्ध आहे. अँटिक ज्वेलरीसुद्धा लक्ष वेधून घेत आहे. खेळताना त्रास होऊ नये म्हणून नवीन मोजडींची खरेदीही सुरू आहे. यासोबतच कित्येकांनी ‘डान्स क्लास’मध्ये भरती होऊन दांडिया शिकायला सुरुवात केली आहे. पारंपरिक गाण्यापासून ‘रामलीला’ व इतर चित्रपटांतील गाण्यांवर नृत्याचा सरावही सुरू आहे. टॅटू पालर्समध्ये रांगा लागल्या आहेत. थोडक्यात तरुणाईची नवरात्रीची जय्यत तयारी झाली असून त्यांना आता फक्त वेध लागले आहेत, गुरवारच्या संध्याकाळचे.