नागपूर : सफाई कामगारांनी प्रामाणिकपणे काम करावे, यासाठी त्यांना देण्यात आलेले जीपीएस घडय़ाळे कपाटातच ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हाताला घडय़ाळ न बांधणाऱ्या  सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात येणार आहे.

स्वच्छता कर्मचारी कामावर येत नसल्याच्या तक्रारी वाढल्यावर महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना जीपीएस घडय़ाळे दिली होती. मात्र, कर्मचारी त्या बांधत नव्हते. वाठोडा भागात  नगरसेवक बंटी कुकडे यांनी दौरा केला. त्यांना कचरा दिसून आला. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ते वाठोडा स्मशानभूमीतील कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांना कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांची जीपीएस घडय़ाळे दिसून आली. कर्मचारी कुठे आहे, अशी विचारणा झोनच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना केली असता त्यांना माहिती नव्हती. कुकडे यांनी सहा ते सात घडय़ाळे तेथून जप्त केल्या आणि आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे दिल्या. या संदर्भात आयुक्तांनी संबंधित सफाई कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित केले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. एरव्ही सफाई कर्मचाऱ्यांच्या हाताला जीपीएस घडय़ाळे असताना त्या कपाटात कशा आणि कोणी ठेवल्या. याच्यामागे कोण अधिकारी व कर्मचारी आहेत, याची चौकशी करण्याची मागणी कुकडे यांनी आयुक्तांना केली.