निवडणुकीतील प्रचारासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नसताना मनसेच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र याबाबत राज ठाकरे यांचे कोणतेही अधिकृत आदेश नसल्याचा दावा मनसेच्या शहराध्यक्षांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेतील दुफळीही उघड आली आहे.

लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. निवडणूक लढविणार नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात प्रचार करण्यात येईल, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करतील, अशी चर्चा सातत्याने होत आहे.

कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा, याबाबत राज ठाकरे गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या सभेत बोलणार आहेत, असे सांगितले जात आहे. मात्र मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीमधील उमेदवार सुप्रिया सुळे, मावळमधील उमेदवार पार्थ पवार आणि शिरूरमधील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पाठिंबा दिला असून या चारही उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोरे आणि बाबर यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन डॉ. अमोल कोल्हे यांना दिले आहे.

दरम्यान, मोरे आणि बाबर यांनी आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले असले तरी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी मात्र प्रचारात सहभागी होण्याबाबतचे कोणतेही आदेश नसल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, हे अद्याप स्पष्ट नाही. राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात त्याबाबत बोलणार आहेत. त्यामुळे सध्या तरी तसे कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे याबाबत काय करायचे हे पक्ष ठरवेल.

वसंत मोरे यांनी मात्र पक्षाच्या बैठकीत तसे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, की आठवडय़ापूर्वी राज ठाकरे यांच्यासमवेत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्या वेळी ही बाब राज ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसारच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविताना मनसे स्वत:ची प्रचार यंत्रणा वापरणार आहे.