दयानंद लिपारे, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असताना अद्याप कोल्हापूर जिल्ह्यात उभय काँग्रेसमध्ये समन्वय साधला गेलेला नाही. अधिकाधिक मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा मात्र दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू आहे.

उभय काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत मतभेदही दिसत आहेत. अशा स्थितीत महाआघाडी म्हणून किती एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाणार याविषयी प्रश्नचिन्ह आहे. स्थानिक नेते मात्र एकदा राज्यपातळीवरून आघाडीची अधिकृत घोषणा झाल्यावर जिल्हास्तरावर आघाडीला मूर्तरूप येईल, असा विश्वास व्यक्त करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी कोल्हापूर जिल्ह्यात आघाडीत बेरजेचे राजकारण झाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी या मित्रपक्षांच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली होती. कागदावर भक्कम असलेल्या महाआघाडीला या निवडणुकीत मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना शिवसेनेच्या अनुक्रमे संजय मांडलिक आणि धैर्यशील माने यांच्याकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव महाआघाडीसाठी धोक्याची घंटा वाजवणारा ठरला. तरीही, जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा एकत्रित लढण्याचा आणि त्यात विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तथापि, निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेसमध्ये कसल्याही प्रकारचा एकोपा दिसला नाही. उलट मतदारसंघांवरून दुरावा निर्माण झाला आहे.

उभय काँग्रेसमध्ये दुरावा का?

विधानसभा निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्धार दोन्ही काँग्रेसच्या मंचावरून स्वतंत्रपणे केला जात आहे. आघाडी करण्याचा मनोदयही व्यक्त होत आहे. पण, दोन्ही काँग्रेसचे स्थानिक नेते अद्यापही अंतर राखून आहेत. याउलट, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नव्या खासदारांचा सत्कार, उद्धव ठाकरे यांची कोल्हापूर भेट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कागल दौरा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे महायुती जिल्ह्यात ताकदीनिशी लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काही बैठकांमध्ये तसा संवादही आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत आणि दोन्ही पक्षातही अद्याप याबाबत कसलाही दुवा साधला गेला नाही. कोल्हापूर महापौर निवडीच्या निमित्ताने हसन मुश्रीफ-सतेज पाटील हे दोन्ही काँग्रेसचे आमदार एकत्र आले, पण त्यातून विधानसभेची चर्चा झाली नाही. याच दोन वजनदार नेत्यांकडे कोल्हापूर महापालिकेची सूत्रे असतानाही एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विधानसभेसाठी हालचाली होताना दिसले नाही.

काँग्रेस पक्षाने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे काँग्रेसच्याच नेत्यांनी पाठ फिरवली होती. महापौर निवडीवरून आमदार मुश्रीफ आणि धनंजय महाडिक यांच्यातील मतभेद उघड झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही आलबेल नाही. अशातच दोन्ही काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. आघाडी करायची असताना हा फार्स कशासाठी केला जात आहे, अशी विचारणा कार्यकर्ते करीत आहेत.

आघाडीबाबत ‘आमचं ठरलंय’

कोल्हापूर जिल्ह्यात उभय काँग्रेसमध्ये बेदिली दिसते. हे वास्तव स्थानिक नेत्यांना मान्य असले तरी त्यांच्या बोलण्यात ‘आघाडीचं आमचं ठरलंय’ असेही ऐकू येत आहे. आघाडी होण्याचा आणि जिल्ह्यातील काँग्रेसच्या यशाचा लौकिक टिकून राहील याचा त्यांना विश्वास आहे. याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या बोलण्यात समान धागा आहे. ‘एकदा राज्य पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय झाला की कोल्हापुरातही त्याचे अनुकरण केले जाईल. तेथे अधिकृतपणे आघाडीची घोषणा होत नाही तोवर स्थानिक पातळीवर एकत्रित बैठका आणि त्यातील निर्णयाला अर्थ उरणार नाही. आघाडीची घोषणा झाल्यावर एकजिनसी आणि प्रामाणिकपणे प्रचार सुरु होईल. या महिनाअखेरपर्यंत आघाडीचा अधिकृत निर्णय अपेक्षित आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघांवरून मतभेद

* विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाला किती जागा यावरून वादाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राधानगरी, चंदगड, कागल, कोल्हापूर उत्तर, शिरोळ या पाच जागा लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला  सांगितले. तर, २००४ आणि २००९ सालच्या निवडणुकीतील जागावाटपाचा हवाला देत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पक्ष ७ जागांवर पक्ष आग्रही असल्याचे सांगितले.

* दोन्ही जिल्हाध्यक्षांची भूमिका आणि इच्छुकांची भाऊगर्दी, त्यांच्यात वाढीस लागलेला उत्साह पाहता जागावाटपातून संघर्षांची ठिणगी उडण्याची शक्यता दिसत आहे. खेरीज, दोन्ही काँग्रेसचे नेते आपल्या पदरात अधिक जागा खेचण्यासाठी प्रयत्नशील असताना मित्रपक्षांना किती जागा सोडणार याचा विचार करताना दिसत कुठेही नाहीत.

* स्वाभिमानी संघटना शिरोळसाठी आग्रही आहे, तर याच मतदारसंघात काँग्रेसचे गणपतराव पाटील आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील हे साखर कारखानदार स्पर्धेत आघाडीवर आहेत. राधानगरीत तर उभय काँग्रेसचे अर्धा डझन नेते उमेदवारीच्या स्पर्धेत सहभागी झाल्याने चूरस वाढली आहे. हे चित्र पाहता काही मतदारसंघांत बंडखोरीची लागण होण्याची चिन्हे आहेत.