22 June 2018

News Flash

अर्श

काही दिवसांपूर्वी सकाळी सात वाजताच एका जवळच्या मित्राचा फोन आला.

काही दिवसांपूर्वी सकाळी सात वाजताच एका जवळच्या मित्राचा फोन आला. सकाळी पोट साफ होताना अचानक रक्त पडू लागले. दाहसुद्धा अधिक होता. त्यास काय करावे काहीच कळत नव्हते. भिंतीवर हात-पाय मारून स्वत:चा त्रास व्यक्त करत होता. त्याच्या बोलण्यातील आर्तता त्याला ‘मूळव्याध’ झाली असलेल्याची जणू पोचपावतीच देत होती. नावाप्रमाणेच ‘मूळव्याध’ म्हणजे आपल्या शरीराच्या मुळाशी झालेला व्याधी. यालाच संस्कृतमध्ये ‘अर्श’ असेही म्हणतात.

आता हे ‘मूळ’ म्हणजे मलप्रवर्तनाचे ठिकाण. अर्शाचे प्रमुख दोन प्रकार पडतात. काहींना जन्मजातच अर्श असू शकतात त्यास ‘सहज’ अर्श असे म्हणतात. तरी काहींना जन्मोत्तर काही खाण्यापिण्या, वागण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अर्श होतात, त्यांना ‘दोषज’ अर्श असे म्हणतात. काहींमध्ये अनुवंशिकताही आढळते. याचे बोलीभाषेत ‘रक्ती मूळव्याध’ म्हणजेच ‘स्रवी अर्श’ व ‘शुष्क’ म्हणजे रूक्ष, रक्त न पडणारे, फक्त कोंब असणारे असेही प्रकार पडतात. ‘रोग: सर्वेपि मंदेग्नौ:।’ या न्यायानुसार सर्वच रोग अग्निमांद्यातून सुरू होतात. नंतर हळूहळू ते अग्निमांद्य वाढत गेले की ‘मलावष्टंभ’ होऊ  लागतो. म्हणजेच लवकर पोट साफ होत नाही. याकडेसुद्धा बरेच दिवस दुर्लक्ष केले तर मलप्रवर्तन करताना अधिक काल बसून ‘प्रवाहण’ म्हणजे ‘कुंथणे’ याची सवय लागते. या सततच्या प्रवाहनामुळे गुदवलींवर ताण येऊ  लागतो व त्या सुजू लागतात. त्यांचा थोडासा भाग बाहेर आल्याप्रमाणे दिसू लागतो. यामुळे गुदद्वाराचा आकार अजूनच छोटा होतो व मल अधिक कष्टाने बाहेर येतो. यामुळे मलप्रवृत्ती ‘चपटी’ होणे, खडा होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे दिसू लागली व हाताला कधी गुद्प्रदेशी सूज, कोंब लागू लागले तर समजायचे की आपल्याला आता मूळव्याधीची सुरुवात होऊ  लागली. याकडेही दुर्लक्ष केले तर मलाचा खडा प्रवाहन करताना गुदवलिंना कापून पुढे जातो. यास ‘फिशर’ किंवा ‘परिकर्तिका’ असे म्हणतात. याही अवस्थेकडे दुर्लक्ष केले तर मलप्रवृत्तीनंतर मलाचा खडा कोंबाना घासून गेल्याने रक्तस्राव होऊ  लागतो व ‘रक्ती मूळव्याध’ मागे लागतो. तर काही जणांना रक्त पडत नाही मात्र ‘अर्शाकुर’ म्हणजेच मूळव्याधीचे कोंब बाहेर लोंबू लागतात. या ही अवस्थेकडे दुर्लक्ष केले तर मात्र हे अर्श मोठे होतात आणि मग त्यावर ‘शस्त्रकर्माशिवाय’ काहीच पर्याय नसतो. हो, आयुर्वेदातसुद्धा ‘अर्श’ चिकित्सेच्या बाहेर गेले की त्यावर ‘शस्त्रकर्म’ चिकित्साच करायला सांगितली आहे. मात्र तत्पूर्वी याची सुरुवात होऊ  लागली आहे असे जाणवले की नागकेशर व लोध्र चूर्ण लोण्यातून खायला दिल्यास रक्ती मूळव्याधीचे रक्त पडणे थांबते. राळेचा मलम गुदप्रदेशी लावल्यास त्यामुळे निर्माण होणारा दाह थांबतो.

आमचे आजोबा ‘कासली’ म्हणजेच अतिबला वनस्पतीच्या पानांची गोळी करून ती गुदभागी ठेवायला सांगायचे त्यामुळे मूळव्याधीचे कोंब असले तरी ते बरे व्हायचे. मुळात योग्य वेळी जेवण केले व तिखट, तेलकट आहार टाळला तरी मूळव्याधीचा त्रास लगेच कमी होतो. लक्षात ठेवा मूळव्याध ही नावाप्रमाणेच ‘मूळ’ व्याधी असते. त्यावर वेळीच उपचार न केल्यास ‘मुळावर’ आघात हा ठरलेलाच आहे.

harishpatankar@yahoo.co.in

 

First Published on December 10, 2016 12:57 am

Web Title: atibala tree