05 April 2020

News Flash

१७५. भवश्रम-निरास

मृत्यूचं वास्तव विवेकी सहजतेनं स्वीकारतो, या मुद्दय़ाचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न कर्मेद्रनं पुन्हा सुरू केला..

 

मृत्यूचं वास्तव विवेकी सहजतेनं स्वीकारतो, या मुद्दय़ाचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न कर्मेद्रनं पुन्हा सुरू केला..
कर्मेद्र – माणसाला मृत्यू असूच नये, असं कुणीच म्हणत नाही. तरीही तुम्ही मृत्यूबाबत ज्या कोरडय़ा पद्धतीनं चर्चा करता ना, तिचं मला आश्चर्य वाटतं. जगणाऱ्या माणसाचीही तुम्हाला किंमत नाही की काय, अशी शंका माझ्या निर्बुद्ध मनात उत्पन्न होते..
हृदयेंद्र – (हसत) तू गेलास तर आम्हाला खरंच खूप दु:ख होईल कर्मू..
कर्मेद्र – माझ्या मरणावरच टपा..
हृदयेंद्र – (समजावणीच्या स्वरात) बरं विनोद सोड..
योगेंद्र – म्हणजे कर्मू गेला तर आपल्याला दु:ख होईल, हा काय विनोद होता?
हृदयेंद्र – पुरे पुरे पुरे..
आता मुख्य विषयाकडे वळू.. इथे कर्मू मुद्दा हा आहे की जन्म जितका स्वाभाविक आहे तितकाच मृत्यूही स्वाभाविक आहे.. तरी जवळच्या माणसाच्या मृत्यूनं आपण उन्मळून पडतो ते त्याच्यावर प्रेम असतं म्हणून हे खरंच, पण या प्रेमाची आपण खरी तपासणी करतो का? जवळचा माणूस हयात असेपर्यंत त्याच्याशी आपलं सगळं वागणं प्रेमाचं होतं का?
कर्मेद्र – अरे! पण भांडणही जवळच्याशीच होणार ना?
हृदयेंद्र – त्या अर्थानं म्हणत नाही मी, पण बरेचदा आपण जवळच्या माणसांना खूप गृहित धरतो. त्यांच्या मनाची, मताची पर्वा न करता त्यांच्याशी तुसडेपणानंही वागतो. आपल्यासाठी तो असणारच, हा भावही मनात कुठेतरी खोलवर असतो. मृत्यूनं ती शक्यता संपून जाते. तो आधार तुटल्याच्या जाणिवेनं आपण उन्मळून पडतो. मग चोखामेळा महाराज काय किंवा सर्वच संत काय, मृत्यूचं वास्तव सांगतात त्याचा हेतूच जगण्याबाबत आणि आपल्यासोबत जगणाऱ्यांबाबत आपण सजग व्हावं, हा असतो! मातीच्या विविध भांडय़ांची उदाहरणं देऊन ते काय सांगू पाहातात? की ज्याच्या त्याच्या आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, भावनिक स्तरांनुसार माणसांचे प्रकार अनंत असतील, पण सर्वाच्यात एकच चैतन्यशक्ती समान आहे. बाहेरच्या आकाराला भुलून आपण व्यवहार करीत राहातो. आंतरिक स्वरूपाचं भान कधीच बाळगत नाही.
कर्मेद्र – पण हा सगळा मूर्खपणा आहे! सगळ्यांत एकच परमात्मा आहे वगैरे ठीक आहे, पण व्यवहार तर व्यवहारासारखाच करावा लागणार ना? तुकाराम महाराजांनीही म्हटलंय ना की, विंचवाला खेटराचीच पूजा द्यावी लागते!
योगेंद्र – वा कर्मेद्र महाराज तयारी चांगली सुरू आहे..
हृदयेंद्र – व्यवहार पाळतानाही आणि व्यवहारानुसार वागतानाही माणसानं आपलं अंतरंग परमात्मतत्त्वापासून सुटत नाही ना, हे तपासलंच पाहिजे. यासाठीच सर्वत्र परमतत्त्वाचं भान बाळगायला संत सांगतात. एकनाथ महाराजांनी बुद्धीबळाचं वापरलेलं रूपक मागे आपण ऐकलं होतं ना? बुद्धीबळाच्या पटावर असेपर्यंत प्यादं, उंट, घोडा, हत्ती, राजा, वजीर यांना त्यांचं त्यांचं स्थान आणि महत्त्व असतं. एकदा ‘मारले’ गेले की सर्वाची किंमत फक्त लाकूड हीच उरते ना? मग निदान आपण पटावर आहोत, याची आठवण ठेवून आपापल्या चालीनुसार आणि खेळीनुसार नियमानुसार खेळणं फक्त आपल्या हाती आहे, याचं भान पाहिजे. हे भान येण्यासाठी उपासना आहे.. मग ती ज्ञानोपासना असेल, योगोपासना असेल की आणखी काही.. माझ्या मते नामोपासना सर्वात सोपी आहे.. चोखामेळा महाराजही म्हणतात- अखंड नामाचें चिंतन सर्व काळ। तेणें सफळ संसार होय जनां।। सर्व हें मायीक नाशिवंत साचें। काय सुख याचें मानितसां।। निर्वाणीं तारक विठोबाचें नाम। येणें भवश्रम दूर होय।। चोखा म्हणे नाम जपें दिनाशिीं। येणें सदा सुखीं होसी जना।। नामाच्या अखंड चितनानं जगाचं नाशिवंत, मायीक स्वरूप कळतं आणि त्यातून भवश्रमच संपतो!
ज्ञानेंद्र – तुला बरे फक्त सोपे, नामाचेच अभंग सापडतात! चोखामेळा महाराजांचा हा अभंग पहा.. त्याचा अर्थ सांग! (ज्ञानेंद्रनं एका अभंगावर बोट ठेवलंय.. हृदयेंद्र कुतूहलानं वाचू लागतो.. अभंग असा असतो..)
डोळियाचा देखणा पाहतां दिठी। डोळाच निघाला देखण्या पोटी।। डोळ्याचा देखणा पाहिला डोळा। आपोआप तेथें झांकला डोळा।। चोखा म्हणे नवलाव झाला। देखणा पाहतां डोळा विराला।।
कर्मेद्र – बापरे! माझे डोळेच गरगरताहेत!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 3:36 am

Web Title: abhang carol
Next Stories
1 १७४. फूल आणि सुवास
2 १७३. मोहळ
3 १७२. भाव-मेळा
Just Now!
X