scorecardresearch

महाराष्ट्र दिन २०२४ Videos

१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. भाषावर प्रांत रचना कायदा लागू केल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. राज्यनिर्मितीच्या या लढ्यामध्ये अनेक नागरिकांनी योगदान दिले. चळवळीदरम्यान १०६ हुतात्मांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या उद्देशाने योगदान दिलेल्या हजारोंच्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठीही महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.
<br /> ब्रिटीशांचे भारतावर वर्चस्व असताना त्यांनी बंगाल प्रेसिडन्सी, मद्रास प्रेसिडन्सी आणि बॉम्बे प्रेसिडन्सी या तीन भागांमध्ये देशाचे विभाजन केले होते. यातील बॉम्बे प्रेसिडन्सीमध्ये आत्ताच्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधील बराचसा भाग येत होता. पुढे १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. पुढे १९५६ मध्ये भाषावार राज्य पुनर्रचना कायद्यानुसार अनेक राज्यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. पारतंत्र्यामध्ये असताना कॉंग्रेसद्वारे भाषावार प्रांत रचना हा मुद्दा मांडण्यात आला होता. या कायद्याला धरुन महाराष्ट्र एकीकरण आणि राज्यनिर्मितीचा प्रस्ताव मांडण्यात आला.

तेव्हा बॉम्बे प्रेसिडन्सीचे प्रमुख केंद्र मुंबई शहर होते. मुंबईमध्ये मराठी, कोंकणी, गुजराती (कच्छी) लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. गुजराती लोकांनी स्वतंत्र राज्यांची मागणी केल्यानंतर महाराष्ट्रासाठीही जोरदार प्रयत्न होऊ लागले. पुढे याला आंदोलनाचे स्वरुप आले. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र व्हावे आणि मुंबई राज्याची राजधानी बनावी असे प्रस्ताव मांडले गेले. मुंबईत मराठी लोकांप्रमाणे गुजराती लोकसंख्या जास्त असल्याने मुंबई गुजरात राज्यामध्ये जावी किंवा ती स्वतंत्र राहावी असे गुजराती समूहाचे मत होते. या प्रकरणावरुन मुंबईसह महाराष्ट्रभर आंदोलन होऊ लागले.

पुढे २१ नोव्हेंबर १९५६ फ्लोरा फाउंटनच्या परिसरात मोठा जनसमूदाय महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी एकत्र आला होता. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तेव्हाचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यामध्ये १०६ हुतात्म्यांचा जीव गेला. यावरुन प्रकरण अधिकच तापले. सरकारविरोधात कारवायांचे प्रमाण वाढत गेले. काही महिन्यांनी सरकारने नमतं घेत भूमिका बदलली. गोळीबाराच्या प्रकरणानंतर चार वर्षांनी १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.
Read More