News Flash

आचार्य

‘नाट’ या शीर्षकाखाली गाथेत समाविष्ट असणाऱ्या अभंगांच्या गुच्छात तुकोबांचा एक अपार गोड व मार्मिक अभंग सापडतो

(संग्रहित छायाचित्र)

– अभय टिळक

‘नाट’ या शीर्षकाखाली गाथेत समाविष्ट असणाऱ्या अभंगांच्या गुच्छात तुकोबांचा एक अपार गोड व मार्मिक अभंग सापडतो. ‘हरि तैसे हरीचे दास’ अशी सुरुवात आहे या अभंगाची. आराध्यदैवताचे सारे गुणविशेष त्याच्या दाससेवकांमध्ये परावर्तित होत असतात, हेच तुकोबांना सुचवायचे आहे यात. वारकरी सांप्रदायिकांचे अधिष्ठात्रे दैवत असणाऱ्या पंढरीरायाच्या ‘विठ्ठल’ या अभिधानाचे स्पष्टीकरण विविध पद्धतीने केलेले सापडते. त्यांतील एक उपपत्ती मोठीच अन्वर्थक होय. ‘‘अज्ञजनांना जो ज्ञानाने स्वीकारतो तो ‘विठ्ठल’ होय,’’ अशी एक विठ्ठलनामाची व्युत्पत्ती परंपरेमध्ये प्रतिष्ठित आहे. विद्वानांचा सत्कार सगळेच करतात, परंतु अज्ञानी माणसांना मायेने पोटाशी कोण धरतो? विठ्ठल आणि विठ्ठलोपासक यांच्यात अनुभवास येणारे साम्य कोणते असेल, तर ते नेमके हेच. किंबहुना, एक प्रकारे पांडुरंगाने आणि त्याला प्रिय असणाऱ्या भक्तभागवतांनी एक विलक्षण श्रमविभागणीच इथे प्रस्थापित केलेली दिसते जणू. पंढरीत विटेवर उभ्या ठाकलेल्या विश्वंभराने अज्ञानी, भोळ्याभाबड्या जनांना पोटाशी घ्यायचे आणि त्यांच्या ठायीचे अज्ञान दूर व्हावे यासाठी त्यांना ओटीत घालायचे ते लोकशिक्षणाचा वसा स्वीकारलेल्या विवेकी संतांच्या, अशी ही विलक्षण उपकारक व उद्धारक श्रमविभागणी. पुस्तकी शिक्षण देण्यासाठी शिक्षक पुरेसा असतो; परंतु शिक्षणाचे संस्कार व्यक्तिमत्त्वावर घडविण्यापासून जिथे जीवनशिक्षणाचा प्रारंभ गरजेचा असतो तिथे मात्र निकड असते आचार्यांची. ‘आचार्य’ या उपाधीचा संबंध असतो चर्येशी- म्हणजे आचरणाशी. विद्यार्थ्याला वा शिष्याला जो शिष्टसंमत आचरण शिकवतो तो ‘आचार्य’! केवळ इतकेच नाही, तर उचित अशी जीवनपद्धती स्वत:च्या चर्येद्वारे विद्यार्थ्याच्या मनावर जो बिंबवतो त्यालाच ‘आचार्य’ ही पदवी प्रदान होते व शोभूनही दिसते. या अर्थाने मग जो मुळाक्षरे गिरवायला प्रथम शिकवतो तो सर्वश्रेष्ठ आचार्य गणायला हवा. कारण लहान मुलांच्या कोवळ्या बोटांना अक्षरांचे वळण अचूक उमजावे यासाठी सहृदय गुरुजी प्रथम त्याच्या पाटीवर वा वहीत मुळाक्षरे काढून देतात आणि मग मुलाचे बोट आपल्या हातात धरून त्याला वळणदार लेखनाचे कित्ते गिरवायला लावतात. ‘अर्भकाचें साटीं। पंतें हातीं धरिली पाटी’ असे त्या साऱ्या ज्ञानव्यवहाराचे मनोज्ञ वर्णन तुकोबा करतात. अक्षरांचे वळण घटवण्याची गरज गुरुजींना अजिबात नसते. मात्र, लहान पोराला लेखनसराव व्हावा म्हणून गुरुजी हातात पाटी-पेन्सिल धरतात. याच न्यायाने लोकव्यवहार निरामय बनण्यासाठी अनिवार्य असणारी इष्ट जीवनपद्धती लोकोत्तर संत त्यांच्या आचरणाद्वारे समाजपुरुषाच्या पुढ्यात प्रगट करतात. भागवत धर्माला अभिप्रेत असणारे संतत्व लोकोद्धारक व समाजाभिमुख आहे ते असे. अवघा लोकव्यवहार शुद्ध, निकोप, निर्वैर बनावा यासाठीच संत जगाच्या व्यवहारात चारचौघांसारखे जीवन व्यतीत करत समाजशिक्षकाचे व्रत पाळतात. ‘देखे प्राप्तार्थ जाहले। जे निष्कामता पावले। तयाही कर्तव्य असे उरलें। लोकांलागीं’ अशा नेमक्या शब्दांत ज्ञानदेव संतमनाच्या त्या प्रेरणेचा उच्चार करतात. समाजहितासाठी आवश्यक असणारी नीतिमत्ता लोकमानसाला शिकवणे, हेच आपले जीवितकर्तव्य असल्याचे ‘शिकवुनि हित। सोयी लावावे हे नीत’ अशा शब्दांत सांगणाऱ्या तुकोबांसारख्या आचार्यांची गरज पूर्वी कधी नव्हती तितकी आज आहे, हे कोणीतरी अमान्य करेल काय ?

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:06 am

Web Title: loksatta acharya advayabodh abn 97
Next Stories
1 मोहोर
2 लोकसंस्था
3 तरि अवधान एकलें देइजे…
Just Now!
X