15 December 2017

News Flash

छद्मविज्ञानाचा कुटिरोद्योग

आपल्या पूर्वजांनी विमाने कशी उडविली, जनुकीय अभियांत्रिकी आणि क्लोनिंग कसे पहिल्यांदा शोधून काढले

मुंबई | Updated: December 19, 2015 2:29 AM

गेल्या वर्षी परिषदेतील एका चर्चासत्रात एका माजी वैज्ञानिकाने भारतात पूर्वी विमाने उडत असल्याचा दावा केला.

आपल्या पूर्वजांनी विमाने कशी उडविली, जनुकीय अभियांत्रिकी आणि क्लोनिंग कसे पहिल्यांदा शोधून काढले किंवा आपली मिथके म्हणजे कशा विज्ञानगाथाचा आहेत, अशा बढाया माराव्याशा कुणाला वाटल्यास जरूर माराव्यात. मात्र विज्ञानसंशोधकांच्या चर्चेत वैज्ञानिक तथ्यांचीच चर्चा व्हावी, ही साधी अपेक्षा आहे. तीही पूर्ण होत नसेल तर आपल्या विज्ञान-संशोधनाचे काय होणार, हा चिंतेचा विषय असायला हवा..

आपल्याकडे प्राचीन काळी दूरचित्रवाणी होते, दूरध्वनी होते, आकाशवाणीचे बहुधा मथुरा केंद्र होते, झालेच तर अणुबॉम्ब, क्षेपणास्त्रे, टेस्टटय़ूब बेबी, क्लोनिंग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमाने होती, अशा प्रकारचे दावे या वर्षी किमान भारतीय विज्ञान परिषदेच्या मंडपात तरी ऐकू येणार नाहीत, हे विज्ञान, त्याचा भारतीय इतिहास आणि वैज्ञानिक या सर्वावरील मोठे उपकारच मानावे लागतील. गेल्या वर्षी मुंबईत झालेली विज्ञान परिषद अशा प्रकारच्या अवैज्ञानिक दाव्यांनी भलतीच गाजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताभिषेकानंतर देशात सांस्कृतिक राष्ट्रवादाची जी नव-अतिरेकी पहाट अवतरली, तिचेच प्रतिबिंब त्या परिषदेत उमटले होते. ते अर्थात स्वाभाविकच होते. आपल्याकडे पूर्वी प्लास्टिक शल्यचिकित्सा आणि जनुकीय अभियांत्रिकी होती. गणपती आणि कर्णजन्म ही त्याची उदाहरणे, असे खुद्द पंतप्रधानांनीच मुंबईतील वैद्यकजगतासमोर घोषित केल्यानंतर अशा प्रकारच्या छद्मविज्ञानकथांना राजमान्यता असल्याचे गृहीत धरले जाणे साहजिकच होते. यंदा मात्र विज्ञान परिषदेत अशा प्रकारच्या पुराणांतल्या वानग्यांना स्थान न देण्याचा निर्णय परिषदेच्या कारभाऱ्यांनी घेतला आहे. गेल्या वर्षी अशा गोष्टींमुळे परिषदेची नाचक्की झाली होती. तेव्हा यंदा हे होणे अपेक्षितच होते. परंतु बहुधा भारतीय विज्ञान क्षेत्राचे झाले तेवढे हसे पुरेसे नसल्याचे काही अतिराष्ट्रवाद्यांना वाटले असावे. त्यामुळे यंदाही परिषदेत असे पुराणगौरवगानपर परिसंवाद भरवावेत याकरिता भारतीय विज्ञान परिषद संघटनेचे अध्यक्ष अशोककुमार सक्सेना यांच्यावर दबाव आणण्यात येत होता. त्यांनी तो झुगारला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करावयास हवे. त्यांच्या या निर्णयामुळे परिषदेस गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त होईल आणि भारतीय विज्ञानविश्व विज्ञानाचा गांभीर्याने विचार करीत असल्याचे अधोरेखित होईल अशी अपेक्षा आहे. मात्र त्याचबरोबर यानिमित्ताने एका बाबीची चर्चा झाली पाहिजे. ती म्हणजे, विज्ञान परिषदेने गतवर्षी आपली प्रतिष्ठा अशा प्रकारे का पणास लावली? याचे कारण वैज्ञानिकांच्या या शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या परिषदेचे अशा प्रकारच्या सांस्कृतिक-सामाजिक दबावांपुढे झुकणे याचा संबंध थेट भारतीय विज्ञान क्षेत्राच्या दुखण्याशी आहे. हे दुखणे एक देश म्हणून आपणांस परवडणारे नाही.
गेल्या वर्षी परिषदेतील एका चर्चासत्रात एका माजी वैज्ञानिकाने भारतात पूर्वी विमाने उडत असल्याचा दावा केला. तो काही आता केला जात आहे असे नाही आणि यापुढे तो करण्यावर बंदी असेल असेही नाही. जुन्या काळी आमच्याकडे सगळेच होते, अशी पुराणगीते गाणे हा आपला ऐतिहासिक नाकर्तेपणा झाकण्याचा उत्तम मार्ग आहे. आपले पूर्वज द्रष्टे होते, ज्ञानी होते यात अणुमात्र शंका नाही. सिंधू संस्कृतीसारखी तेव्हाची अत्यंत प्रगत संस्कृती निर्माण करणाऱ्या, रामायण-महाभारतासारखी उत्तमोत्तम काव्ये रचणाऱ्या, शून्याचा शोध लावणाऱ्या आणि आयुर्वेद, योग यांसारखी शास्त्रे रचणाऱ्या आपल्या पूर्वजांचा अभिमान बाळगलाच पाहिजे. पण आपल्या त्या पूर्वजांनी जे दिले ते आपण का आणि कसे गमावले याचाही विचार आपण विवेकी आणि तर्कशुद्ध पद्धतीने केला पाहिजे. अणुबॉम्ब तयार करणारा, विमाने उडविणारा, पृथ्वीपासून सूर्याचे योग्य अंतर मोजणारा असा आपला समाज होता असे मानले, तर आक्रमकांच्या तलवारींना तो आपले पाणी का दाखवू शकला नाही याचेही उत्तर आपणांस देणे भाग आहे. परंतु तसे न करता आमचे बापजादे कसे विश्वगुरू होते असे म्हणत मिशीचे आकडे पिळायचे आणि काल्पनिक कारणे सांगत आपले आजचे पराभव झाकायचे ही प्रवृत्ती न्यूनगंडातून येत असते. ते गंड कुरवाळण्यात ज्यांना सुख मिळते ती मंडळी पुराणकथा आणि मिथके यांच्यावर आधुनिक विज्ञानाचे मुखवटे चढवत राहणारच आहेत. मुद्दा त्या प्रवृत्तीपुढे झुकण्याचा आहे. विज्ञान परिषदेचे अधिवेशन म्हणजे काही महाविद्यालयीन वार्षिक स्नेहसंमेलन नसते, की जेथे हौशी कलाकारांचे मनोरंजनाचे कार्यक्रम व्हावेत. जगभरात विज्ञान क्षेत्रात काय सुरू आहे यावर संमेलनात चर्चा व्हावी, विज्ञानविचारांचे आदानप्रदान व्हावे हा या परिषदेचा मुख्य हेतू. त्या दृष्टीने या परिषदेस अनेक नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांनाही आमंत्रित केले जाते. पं. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत देशाचे प्रत्येक पंतप्रधान आजवर या परिषदेस उपस्थित राहिले आहेत. परिषदेचा संबंध विज्ञान मंत्रालयाशी असतो वा हा प्रतिष्ठित मंच आहे म्हणून ते उपस्थित राहत नसतात, तर देशाच्या आशा-आकांक्षा, अपेक्षा विज्ञान क्षेत्रापर्यंत पोचाव्यात हा त्यामागील हेतू असतो. अशा परिषदेत मांडला जाणारा प्रत्येक संशोधननिबंध हा आधी तपासूनच घेतला जातो. त्याचे सार आधी प्रसिद्ध केले जाते. असे असतानाही गतवर्षी चर्चासत्रात छद्मविज्ञान मांडणारा निबंध वाचला गेला, याचे दोनच अर्थ असू शकतात. एक तर परिषदेच्या धुरिणांनाही त्यात काही वावगे वाटले नाही किंवा त्या शोधनिबंधाचा समावेश करावा यासाठी परिषदेवर दबाव होता. ‘मी यंदाही तशा – म्हणजे वैज्ञानिक आधार नसलेल्या किंवा कथाकथनात्मक बाबींचा समावेश करण्यासाठीच्या – प्रयत्नांना जोरदार विरोध केला,’ असे सक्सेना सांगतात. त्यातील ‘यंदाही’ हा शब्द लक्षात घेण्यासारखा आहे. हा प्रयत्न कोणाकडून झाला किंवा होत आहे याबद्दल त्यांनीच मौन बाळगले असल्याने त्याबाबत केवळ अंदाज व्यक्त करणे एवढेच प्रत्येकाच्या हाती राहते. मात्र या घटनेतून विज्ञान क्षेत्राकडे पाहण्याचा राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोन नेमका अधोरेखित होत आहे. विज्ञान हे आपल्या राजकीय, सामाजिक वा सांस्कृतिक कार्यक्रम पत्रिकेचे वहन करण्याचे साधन मानले जात असेल, तर ती गोष्ट अंतिमत: विज्ञानालाच घातक आहे. याचे भान येथील राजकीय क्षेत्राला नसणे हे समजण्यासारखे आहे. ते विज्ञान क्षेत्राने मात्र गमावता कामा नये. राहता राहिला मुद्दा विज्ञान आणि पुराणकथांचा. या पुराणकथा म्हणजे आपले राष्ट्रीय संचित आहे. समाजाला सांस्कृतिक ऊर्जा देण्याचे काम त्यातून होत असते. त्यातील मिथकांमध्ये इतिहास शोधू गेल्यास मात्र फसगत होण्याचीच शक्यता असते. याचे कारण सत्य आणि कल्पित यांचे ते बेमालूम मिश्रण असते. रामायणामध्ये विमानाचे किंवा महाभारतामध्ये अणुबॉम्ब स्फोटासारखे वर्णन येते याचा अर्थ त्या काळालाही याचे विज्ञान माहीत होते असा करायचा नसतो. त्याचा अर्थ एवढाच असतो की या कथा रचणाऱ्या कवींची कल्पनाशक्ती अफाट होती. भूस्थिर उपग्रह वा आजच्या आयपॅडची वर्णने ज्यूल्स व्हर्न यांच्या कादंबऱ्यांत वाचावयास मिळतात तेव्हा त्याचा अर्थ ते तेव्हाचे वास्तव होते असा घ्यायचा नसतो. तसेच हे. प्राचीन काळी भारताने मोठी वैज्ञानिक प्रगती केली होती हे खरेच आहे. पण त्यानंतर विज्ञान अनेक योजने पुढे आले आहे. आज प्लास्टिक शल्यचिकित्सेसाठी सुश्रुताकडे जाण्याची आवश्यकता नसते.
पण म्हणून कोणी भारतातील प्राचीन ज्ञान फेकून द्या असे म्हणणार नाही. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यात अधिक भर कोणी घालत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. परंतु ते करण्याऐवजी केवळ पुराणकथांतून छद्मविज्ञान शोधण्याचे कुटिरोद्योग चालविले जातात आणि आधुनिक ज्ञानाबाबत मात्र तिरस्काराची भावना पसरवली जाताना दिसते. नागरिकांत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याआड येणारी ही प्रवृत्ती बळावताना दिसत आहे. या दुखण्याचा सामना करणे हे शतकी परंपरेच्या विज्ञान परिषदेला जड जाता कामा नये. त्याचा श्रीगणेशा या अधिवेशनापासून नव्याने व्हावा हीच सर्वाची अपेक्षा असेल.

First Published on December 19, 2015 2:29 am

Web Title: 2015 indian science congress ancient aircraft controversy